रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्स्प्रेसनी वैद्यकीय वापराच्या 25000 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचे वितरण करून ओलांडला महत्त्वाचा टप्पा
वैद्यकीय ऑक्सिजन भरलेल्या टँकर्सच्या देशभरातील वाहतुकीने देखील पार केला 1500 टँकर्सचा टप्पा
368 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी आतापर्यंत ऑक्सिजन वितरणाचे काम पूर्ण करून 15 राज्यांना दिलासा दिला
Posted On:
05 JUN 2021 4:37PM by PIB Mumbai
मार्गात येणारे सर्व अडथळे पार करत आणि समस्यांवर नव्या पद्धतीने मात करत भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापराच्या द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करून त्यांना दिलासा देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी देशसेवेसाठी वैद्यकीय वापरासाठीच्या 25000 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचे वितरण करून महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.
आतापर्यंत, रेल्वे विभागाने देशभरातील विविध राज्यांना 1503 टँकर्सच्या वाहतुकीतून वैद्यकीय वापरासाठीच्या 25,629 मेट्रिक टनांहून अधिक द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
आतापर्यंत 368 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवून दिलासा दिला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.
हे पत्रक जारी होईपर्यंत, 30 टँकर्समध्ये 482 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरलेल्या 7 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यां प्रवासात होत्या.
42 दिवसांपूर्वी, सर्वप्रथम 24 एप्रिलला महाराष्ट्रासाठी 126 मेट्रिक टन ऑक्सिजन वाहून आणण्यापासून ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी त्यांच्या ऑक्सिजन वितरण कार्याची सुरुवात केली ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या राज्यांना शक्यतो अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त प्रमाणात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.
देशातील उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या 15 राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे या राज्यांना दिलासा मिळाला आहे.
हे पत्रक जारी होईपर्यंत, महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन उतरविण्यात आला आहे, सुमारे 3797 मेट्रिक टन उत्तर प्रदेशात, 656 मेट्रिक टन मध्य प्रदेशात, 5790 मेट्रिक टन दिल्लीत, 2212 मेट्रिक टन हरियाणा राज्यात, 98 मेट्रिक टन राजस्थानात, 3097 मेट्रिक टन कर्नाटकात, 320 मेट्रिक टन उत्तराखंडात, 2787 मेट्रिक टन तामिळनाडू राज्यात, 2602 मेट्रिक टन आंध्र प्रदेशात, 225 मेट्रिक टन पंजाबमध्ये, 513 मेट्रिक टन केरळात, 2474 मेट्रिक टन तेलंगणामध्ये, 38 मेट्रिक टन झारखंड राज्यात आणि 400 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन आसाम राज्यात उतरविण्यात आला आहे.
आतापर्यंत देशातील 15 राज्यांमधील 39 शहरे आणि नगरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी द्रवरूप ऑक्सिजन उतरविला आहे.
रेल्वे विभागाने ऑक्सिजनच्या पुरवठ्याची ठिकाणे आणि तिथे पोहोचण्याचे विविध मार्ग निश्चित केले आहेत आणि कोणत्याही राज्याला गरज भासली तर तिथे तातडीने ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी जय्यत तयारी ठेवली आहे. द्रवरूप ऑक्सिजन भरून आणण्यासाठी राज्य सरकारे रेल्वेला टँकरचा पुरवठा करीत आहेत.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724701)
Visitor Counter : 277