नागरी उड्डाण मंत्रालय

जळगाव येथे सुरु होणार नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी


देशात आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरु होणार

Posted On: 02 JUN 2021 8:22PM by PIB Mumbai

 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मुक्त हवाई उड्डाण प्रशिक्षण संघटना धोरणाअंतर्गत भारतात 8 नव्या हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरु होणार आहेत. जळगाव, बेळगाव, कलबुर्गी, खजुराहो आणि लीलाबारी या ठिकाणी ही प्रशिक्षण केंद्रे सुरु होणार आहेत.

भारताला जागतिक पातळीवरील विमानोड्डाण प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी उड्डाण प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी या अकादमींची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच, भारताच्या शेजारी देशांतील विद्यार्थ्यांच्या हवाई उड्डाण प्रशिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने  देखील या केंद्रांची रचना करण्यात आली आहे.

हवामानविषयक समस्या उद्भवण्याचे आणि नागरी तसेच लष्करी हवाई वाहतुकीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे प्रशिक्षण केंद्रांसाठी अत्यंत काळजीपूर्वकरित्या या पाच विमानतळांची  निवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे, आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारतीय हवाई उड्डाण क्षेत्र अधिक स्वावलंबी होण्यास मदत होईल.

या हवाई प्रशिक्षण केंद्रांना निविदाकारांसाठी अधिक आकर्षक बनविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केंद्रांच्या वार्षिक भाडेशुल्कात लक्षणीय कपात करून ते 15 लाख रुपये केले आहे. त्याशिवाय, हे उपक्रम अधिक व्यवसाय-स्नेही व्हावेत म्हणून विमानतळ मानधनाची संकल्पना देखील मोडीत काढण्यात आली आहे.

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723895) Visitor Counter : 212