नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते ओल्ड गोवा येथे फ्लोटिंग जेट्टीचे उद्घाटन
ओल्ड गोवा आणि पणजी लवकरच फेरीबोट आणि समुद्रपर्यटन जहाजाद्वारे जोडले जातील- मनसुख मांडवीय
Posted On:
30 MAY 2021 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/ पणजी, 30 मे 2021
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार), मनसुख मांडवीय यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गोवा राज्य दिनानिमित्त ओल्ड गोवा येथील दुसर्या तरंगत्या जेट्टीचे उद्घाटन केले.
मांडवीय यांनी यावेळी आशा व्यक्त केली, की ओल्ड गोव्यातील तरंगती जेट्टी ही राज्याच्या पर्यटन क्षेत्राचे रुप पालटणारी ठरेल. पणजी आणि ओल्ड गोवा फेरीबोट आणि समुद्रपर्यटन जहाज सेवेद्वारे जोडले जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. केंद्रीय मंत्री म्हणाले, या जेट्टीमुळे पर्यटकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीचा लाभ मिळेल. पर्यटन क्षेत्राला राज्याचे विकासाचे इंजिन बनवण्यासाठी गोवा सरकारने केलेल्या कामांची मंत्रीमहोदयांनी प्रशंसा केली.
जुने गोवे आणि पणजी यांना जोडण्यासाठी भारत सरकारने मांडवी नदीवर (एनडब्ल्यू-68) दोन काँक्रीट फ्लोटिंग जेट्टी उभारण्यास मान्यता दिली आहे. मांडवी(एनडब्ल्यू-68) नदीवर बांधलेली ही दुसरी फ्लोटिंग जेट्टी आहे. यापूर्वी कॅप्टन ऑफ पोर्टस, पणजी, गोवा येथे असलेल्या पहिल्या जेट्टीचे उदघाटन मनसुख मांडवीय यांच्या हस्ते दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पणजी येथे झाले होते.
कॉंक्रीट फ्लोटिंग जेट्टीचे स्थिर स्वरुपाच्या जेट्टीपेक्षा बरेच लाभ आहेत. - त्यांची किंमत स्थिर जेट्टीच्या किंमतीच्या अंदाजे 1/5 आहे. त्याचप्रमाणे ते तयार आणि स्थापित करण्याचे काम जलद होते, तसेच ते वापरण्यास सुलभ आहेत. डिझाइन केलेल्या (अभिकल्पित) फ्लोटिंग जेट्टीचे आयुष्य 50 वर्षांपर्यंत असते. तसेच, फ्लोटिंग स्ट्रक्चर असल्याने त्यांना सीआरझेड नियमनाची आवश्यकता नाही. वापरकर्त्यांच्या आवश्यकतेनुसार किंवा जेट्टी साइटच्या हायड्रोग्राफिक प्रोफाइलमधील बदलांनुसार ते आकाराने वाढविता किंवा कमी करता येऊ शकते.
गोवा घटकराज्य दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, केंद्र सरकार राज्य सरकारांसमवेत राज्यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. ते म्हणाले, की मुरगाव बंदराचेही राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक आणि गोवा सरकारचे बंदरविकास मंत्री मायकल लोबो यांची या वेळी उपस्थिती होती.
***
S.Thakur/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722940)
Visitor Counter : 254