सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

कोविड -19 च्या दुसऱ्या टाळेबंदी काळात सरकारने खादी ग्रामोद्योग आयोगाकडे 45 कोटी रुपयांच्या खरेदीची मागणी नोंदवल्याने खादी कारागिरांना मोठा दिलासा

Posted On: 29 MAY 2021 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2021

 

देशातील बहुतांश भागात कोविड19 महामारीच्या दुसऱ्या लाटे दरम्यान टाळेबंदी सुरु असताना, खादी कारागिरांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याने, आर्थिक अडचणींवर मात करण्यात त्यांना मदत झाली आहे.  यावर्षी मार्च आणि मे महिन्या दरम्यान उत्पादन आणि सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला. मात्र, सरकारने, खादी ग्रामोद्योग आयोगाकडे 45 कोटी रुपये किंमतीच्या खरेदीची मागणी नोंदवली. यामुळे लाखो खादी कारागिरांच्या जगण्याला हातभार लागला आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारतीय रेल्वे आणि एअर इंडीयाने खरेदीची मागणी नोंदवली आहे.

आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि खादी ग्रामोद्योग आयोगामधला आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या 6.38 लाख मीटर पॉली खादी कापडाच्या खरेदीचा करार, एप्रिल मध्ये वाढवण्यात आला.  कपड्यांची ऑर्डर वाढवून 8.46 लाख मीटर करण्यात आली असून त्याची किंमत 20.60 कोटी रुपये आहे.

या मागणीचे काम उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हरियाणा इथल्या अनेक खादी संस्थामधे विभागून दिले आहे. या वर्षी जूनपर्यंत या उत्पादनाचा पुरवठा केला जाईल.

याचप्रकारे, रेल्वे मंत्रालयानेही एप्रिल आणि मे दरम्यान खादी ग्रामोद्योग आयोगाकडे 19.50 कोटी रुपयांच्या खरेदीची मागणी नोंदवली आहे. याचा थेट लाभ देशभरातील 100 खादी संस्थामधल्या नोंदणीकृत कारागिरांना होणार आहे. चादरीचे कापड, पंचे, पलंगावर अंथरायची चादर, फलकासाठीचे कापड, पुसण्यासाठी वापरले जाणारे कापड, दोसुती खादी, इत्यादी कापडाच्या उत्पादनात निष्णात या कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उत्पादनाचा पुरवठा जून आणि जुलै 2021 मधे केला जाईल. भारताच्या राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाने देखील आपल्या विशेष आणि व्यावसायिक श्रेणीच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 4.19 कोटी किंमतीच्या 1.10 लाख सुविधायुक्त वस्तुंच्या संचाची मागणी नोंदवली आहे.

कोविड -19 च्या काळात हवाई वाहतुक क्षेत्राला मोठा फटका बसला, विशेषत: आंतरराष्ट्रीय उड्डाणांना. अशातही एप्रिल महिन्यात ही ताजी मागणी नोंदवण्यात आली. या सुविधायुक्त संचात छोट्या खेड्यांमधे उत्पादन होणाऱ्या खादी हँड सॅनिटायझर, खादी मॉइस्चराइजर लोशन, खादी लेमन ग्रास तेल, खादी हस्तनिर्मित साबण, खादी लिप बाम, खादी रोज (गुलाबाचे) फेसवॉश, आवश्यक तेल इत्यादी दर्जेदार नैसर्गिक प्रसाधन उत्पादनांचा समावेश आहे. 

कोविड19 च्या कसोटीच्या काळात या मोठ्या मागणीमुळे खादी कारागिरांना अधिक रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या  तसेच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आयोगाच्या  प्रयत्नांना चालना मिळेल असे खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी सांगितले. टाळेबंदीच्या काळात कारागिरांना शाश्वत रोजगार उपलब्ध करणे आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावणे हे सर्वात मोठे आव्हान आयोगासमोर होते असे ते म्हणाले.

आदीवासी व्यवहार मंत्रालय, भारतीय रेल्वे आणि एअर इंडीयाने नोंदवलेल्या खरेदीच्या या मोठ्या मागणीमुळे खादीचा चरखा फिरता राहिला आहे. अर्थात विणकरांसह संबंधित कारागिर आणि ग्रामोद्योगात सक्रीय प्रचंड मनुष्यबळाला रोजगार आणि उत्पन्न उपलब्ध झाले आहे.

 

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722706) Visitor Counter : 157