शिक्षण मंत्रालय

तरुण लेखकांना मार्गदर्शनासाठी ‘युवा’ या पंतप्रधानांच्या योजनेचा सरकारकडून प्रारंभ


तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना प्रशिक्षित करण्यासाठी लेखक मार्गदर्शन कार्यक्रम

इंडिया @75 साजरा करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील नायकांना युवा लेखक अभिवादन करणार

Posted On: 29 MAY 2021 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2021

 

देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजवण्याच्या आणि जागतिक पातळीवर भारताचा आणि भारतीय लिखाणाचा ठसा उमटवण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने आज तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना (30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या) प्रशिक्षण देणाऱ्या युवा या पंतप्रधानांच्या मार्गदर्शन योजनेचा प्रारंभ केला. युवा अर्थात (यंग, अपकमिंग आणि व्हर्सेटाईल) तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखकांना मार्गदर्शन करणारी ही योजना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीविषयी लिखाण करण्यासाठी तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून आहे. 31 जानेवारी 2021 रोजी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी, तरुण पिढीला स्वातंत्र्य संग्रामातील वीरांविषयी, या लढ्याशी संबंधित घटनांविषयी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांच्या भागांमध्ये घडलेल्या शौर्याच्या कथांविषयी लिहिण्याचे आणि त्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणाऱ्या सुपुत्रांना सर्वोत्तम पद्धतीने अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. यामुळे आपल्या देशाच्या भविष्याला दिशा देणारी विचारवंतांची एक श्रेणी तयार होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले होते.

युवा ही योजना इंडिया @75 (स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव) या प्रकल्पाचा एक भाग आहे. स्वातंत्र्य संग्रामातील अनाम वीर, स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय चळवळीत योगदान देणारी आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली ठिकाणे आणि इतर संबंधित विषय याविषयीचा लेखकांच्या तरुण पिढीचा दृष्टीकोन, नावीन्यपूर्ण आणि सृजनशील पद्धतीने मांडण्यासाठी एक दालन उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञान प्रणाली यांना चालना देणाऱ्या विविध विषयांवर लिखाण करण्याची क्षमता असलेली लेखकांची एक फळी या योजनेमुळे तयार होऊ शकेल.

शिक्षण मंत्रालयाअंतर्गत अंमलबजावणी संस्था म्हणून नॅशनल बुक ट्रस्ट मार्गदर्शनाच्या सुस्पस्ष्ट माहितीसह टप्प्या टप्प्याने ही योजना राबवत जाईल. या योजनेंतर्गत तयार झालेल्या पुस्तकांचे नॅशनल बुक ट्रस्टकडून प्रकाशन होईल आणि त्यांचे इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतर करण्यात येईल. जेणेकरून साहित्य आणि संस्कृती यांची देवाणघेवाण होऊन ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला चालना मिळेल. निवड झालेल्या तरुण लेखकांना जगातील सर्वोत्तम लेखकांशी संवाद साधण्याची, साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये तरुण विचारांचे सक्षमीकरण करण्यावर आणि भावी जगात नेतृत्व करण्यासाठी सज्ज होणारे तरुण वाचक/अध्ययनकर्ते तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सृजनशील विश्वातील भावी नेत्यांचा पाया घालण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

युवा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक) :

  • या योजनेअंतर्गत 1 जून ते 31 जुलै 2021 दरम्यान https://www.mygov.in/ च्या माध्यमातून एक अखिल भारतयी स्पर्धा आयोजित करून त्यातून 75 लेखकांची निवड करण्यात येईल.
  • विजेत्यांची घोषणा 15 ऑगस्ट 2021 रोजी होईल. तरुण लेखकांना नामवंत लेखक/मार्गदर्शक यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात येईल.
  • त्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रकाशनासाठी हस्तलिखिते तयार केली जातील. प्रकाशित पुस्तकांचे उद्घाटन 12 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय युवा दिनाच्या (युवा दिवस) निमित्ताने करण्यात येईल.
  • या मार्गदर्शन योजनेअंतर्गत प्रत्येक लेखकाला मासिक 50,000 रुपये या प्रमाणे सहा महिन्यांसाठी एकत्रित शिष्यवृत्ती देण्यात येईल.

 

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722693) Visitor Counter : 411