आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 साठी ऑक्सिजन थेरपी म्हणजे प्राणवायू उपचारप्रणाली
Posted On:
29 MAY 2021 11:30AM by PIB Mumbai
मुंबई, 26 मे 2021
कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेच्या वेळी, रुग्णांमध्ये प्राणवायूची आवश्यकता वाढल्याचे दिसून आले आहे. याविषयी बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रविचंद्र अशी माहिती देतात, "कोविड -19 च्या रुग्णांपैकी 80% रुग्ण सौम्यलक्षण श्रेणीचे असतात, त्यांच्याबाबतीत आजार तीव्र नसतो. केवळ 15% कोविड रुग्ण मध्यम आजाराचा सामना करत असू शकतात, ज्यांच्या बाबतीत रक्तातील प्राणवायूची पातळी 94% च्या खाली उतरण्याची शक्यता असते. आणि उर्वरित 5% कोविडबाधित रुग्ण तीव्र आजारी असू शकतात. अशा तीव्र रुग्णांच्या बाबतीत श्वसनाचा वेग प्रति मिनिटाला 30 पेक्षा जास्त असू शकतो आणि रक्तातील प्राणवायूची पातळी 90% पेक्षाही कमी असू शकते.
शरीरातील प्राणवायूचा स्तर पूर्ववत करण्याच्या प्रक्रियेतील काही महत्त्वाचे घटक पाहू- प्राणवायूच्या पुरवठ्याची गरज भासणाऱ्या काही थोड्या रुग्णांना याचा निश्चित फायदा होईल.
प्राणवायूची पातळी घटण्याच्या लक्षणांविषयी सजग राहा-
प्राणवायू पातळी कमी असण्याचा धोका दर्शविणाऱ्या लक्षणांमध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो- श्वासोच्छवासास त्रास, संभ्रमावस्था, झोपेतून जागे होण्यात अडचण येणे आणि ओठ किंवा चेहरा निळा पडणे. प्रौढांच्या बाबतीत, छातीत दुखण्यास सुरुवात होते व ते दुखणे थांबत नाही. बालकांना श्वसनास त्रास होऊन त्यांच्या नाकपुड्या फेंदारल्यासारख्या होतात,श्वास घेताना ही बालके कण्हतात, किंवा त्यांना खाणेपिणे अशक्य होते.
आपण काळजी का घेतली पाहिजे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हायपोकसेमियामुळे (रक्तातील प्राणवायूची पातळी खालावल्यामुळे) मृत्यू ओढवू शकतो. कोविड-19 सारख्या आजारामुळे जेव्हा रक्तातील प्राणवायूची पातळी घसरते तेव्हा शरीरातील पेशींना त्यांची नित्यनेमाची कार्ये करण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नाही. ही पातळी दीर्घकाळ कमीच राहिल्यास, अवयवांच्या कामात बिघाड होतो आणि यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. उपचारांच्या अभावी असे होऊ शकते.
प्राणवायूची पातळी- ऑक्सिजन लेव्हल कशी मोजायची, ते समजून घ्या-
प्राणवायूची पातळी मोजण्याचे दोन सोपे मार्ग आहेत.
पल्स ऑक्सिमीटर: एखाद्या रुग्णाच्या बोटावर, पायांच्या बोटावर किंवा कानाच्या पाळीवर पल्स ऑक्सिमीटर ठेवून तुम्ही त्याची / तिची प्राणवायूची पातळी मोजू शकता. ही तपासणी अगदी दोन मिनिटात होते व यामुळे कसल्याच वेदनाही होत नाहीत.
रुग्णाच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण किंवा त्याची टक्केवारी पल्स ऑक्सिमीटर मोजते. पल्स ऑक्सिमेट्रीविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रशिक्षण-पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार प्राणवायूची पातळी 93% पेक्षा कमी असेल तर रुग्णावर त्वरित उपचार करण्याची गरज असते. तर प्राणवायूची पातळी 90% पेक्षा कमी असणे म्हणजे क्लिनिकल दृष्टीने आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली असणे.
श्वसनाचा दर किंवा वेग-: श्वसनाचा दर किंवा वेग म्हणजे एखादी व्यक्ती प्रत्येक मिनिटाला घेत असलेल्या श्वासांची संख्या. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे संचालक डॉ.सोमशेखर यासाठीची एक अतिशय साधी पद्धत शिकवितात, तीही कोणतेही उपकरण न वापरता. तुमचा हाताचा तळवा छातीवर ठेवा एका मिनिटासाठी तुमचा श्वसनाचा दर मोजा. जर तो 24 प्रति मिनिट- यापेक्षा कमी असेल तर तुमची प्राणवायूची पातळी सुरक्षित आहे. मात्र जर एखादा / एखादी रुग्ण दर मिनिटाला 30 पेक्षा अधिक श्वास घेत असेल तर त्याचा अर्थ, त्याची / तिची प्राणवायूची पातळी खालावली आहे.
प्राणवायूची पातळी कमी झाली असता काय करावे?
प्रोनिंग
ज्या रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत अशांना पोटावर/ पालथे झोपण्यास सांगितले जाते. यामुळे श्वसनात सुधारणा होऊन रक्तातील प्राणवायूची पातळी उंचावते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 'प्रोनिंग फॉर सेल्फ केअर- (स्वतःच प्रकृती सांभाळताना पालथे झोपण्याचे तंत्र)' याविषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आपण येथे पाहू शकता-
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आपणांस कोविड-19 रुग्णांच्या क्लिनिकल व्यवस्थापनाची राष्ट्रीय नियमावली दिसेल. त्यानुसार, ऑक्सिजन थेरपी म्हणजे प्राणवायू उपचारप्रणालीची गरज असणाऱ्या रुग्णांना जागेपणी प्रोन स्थितीत पडण्याचा आग्रह धरला पाहिजे.
प्रोनिंगसाठीच्या अटी / निकष
|
असे असताना प्रोनिंग टाळा
|
· स्थिर/ संतुलित मानसिक स्थिती
· प्रोनिंग स्वतःचे स्वतः करण्याची शक्ती- म्हणजेच स्थिती बदलण्यासाठी बाह्य मदतीची कमीत कमी गरज भासली पाहिजे
|
· रक्ताभिसरणात अस्थैर्य/ अडथळा असल्यास
· बारकाईने देखरेख करणे शक्य नसल्यास
|
ज्या रुग्णांना नलिकेद्वारे पुरवठा सुरु नसेल त्यांच्यासाठी प्रोनिंग अंमलात आणण्याविषयी महत्त्वाच्या सूचनांचा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश आहे.
• श्वासोच्छवासास त्रास होणाऱ्या आणि रुग्णालयात दाखल करण्याइतकी गंभीर परिस्थिती असणाऱ्या कोणत्याही कोविड-19 रुग्णास, कूस बदलून वेळेवर स्वतःच प्रोनिंग करण्यास सांगता येईल.
• रुग्णाची कूस बदलताना प्राणवायूच्या प्रवाहात अडथळा न येण्याची काळजी घेतली पाहिजे.
• प्रोटोकॉल / नियमावलीनुसार प्रोन स्थितीत 30–120 मिनिटे झोपावे, त्यानंतर 30–120 मिनिटे डाव्या कुशीवर झोपावे, उजव्या कुशीवर झोपावे व सरळ ताठ बसावे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरताना
एखाद्या वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या उपस्थितीतच ऑक्सिजन थेरपी / प्राणवायू उपचारप्रणालीचावापर केला पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत/ तातडीच्या गरजेच्या वेळी, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा रुग्णवाहिका उपलब्ध होईपर्यंतही याचा अवलंब करता येणे शक्य आहे.
पुण्याच्या बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऍनास्थेशिया (भूल) विभागप्रमुख प्रा.संयोगिता नाईक सांगतात, "कोविड-19 च्या मध्यम तीव्रतेच्या -म्हणजे ज्या रुग्णांची प्राणवायूची पातळी खालावली असेल आणि प्राणवायूची गरज प्रति मिनिटाला जास्तीत जास्त 5 लिटर इतकीच असेल अशा - रुग्णांसाठीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरावेत."
"कोविड होऊन गेलेल्या रुग्णाच्या बाबतीत नंतर काही गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवल्यास प्राणवायू उपचारप्रणालीची निकड भासते अशावेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अतिशय उपयुक्त ठरतात", असेही त्या सांगतात.
वरील दोन्ही बाबतींत, रक्तातील प्राणवायूची पातळी 94% पर्यंत नेणे हेच प्राणवायू उपचारप्रणालीचे उद्दिष्ट असते. रुग्णाची प्राणवायूची पातळी 93 ते 94% पर्यंत पोहोचल्यावर प्राणवायू उपचारप्रणाली थांबविता येईल. प्राणवायूच्या आधिक्यामुळे कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढूनही काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
***
MC/JW/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722620)
Visitor Counter : 334