वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
2020-21 या वर्षात भारतात सर्वाधिक 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (FDI); गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त
Posted On:
24 MAY 2021 6:51PM by PIB Mumbai
भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता व व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशात केल्या गेलेल्या परदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांनी पहिली पसंती भारताला दिल्याचे खालील ठळक घडामोडींमुळे लक्षात येईल:
◆ 2020-21 या वर्षात भारतामध्ये आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्स थेट परदेशी गुंतवणूक (FDI) करण्यात आली असून हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 मधील 74.39 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.
◆ कंपनी भागभांडवलात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये झालेली थेट परदेशी गुंतवणूक (FDI) (59.64 अब्ज अमेरिकन डॉलर्स) ही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढली आहे.(49.98 अब्ज अमेरिकन डॉलर्स)
◆ आर्थिक वर्ष 2020-21 साठी या परदेशी गुंतवणूकदारांमध्ये प्रथम क्रमांकावर सिंगापूर (29%), दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका (23%), आणि तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशस (9%) आहे.
◆ आर्थिक वर्ष 2020-21मध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली असून भागभांडवलातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 44% गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. त्याखालोखाल बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 13 % व त्यानंतर सेवाक्षेत्रात 8% इतकी गुंतवणूक झाली आहे.
◆ आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीत गुजरातचा 78%, कर्नाटकचा 9% आणि दिल्लीचा 5% वाटा आहे.
◆ 2020-21 या आर्थिक वर्षात भागभांडवलात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी गुजरात ला सर्वात जास्त म्हणजे 37%, त्याखालोखाल महाराष्ट्राला 27% व कर्नाटकला 13% गुंतवणूक प्राप्त झाली.
◆ आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गुजरातला प्राप्त झालेल्या भागभांडवलात सर्वाधिक वाटा (94%) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात असून बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 2% इतका वाटा होता.
◆ गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 या आर्थिक वर्षात बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्र, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्र, रबरी वस्तू, किरकोळ बाजारपेठ, औषधे व विद्युत उपकरणे या क्षेत्रातील गुंतवणूक 100 टक्क्यांनी वाढली आहे.
◆ सर्वात मोठ्या 10 परदेशी गुंतवणूकदारांमध्ये सौदी अरेबिया पहिल्या स्थानावर आहे. गेल्या आर्थिक वर्षातील 89.93 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत या 2020-21 च्या आर्थिक वर्षामध्ये सौदी अरेबियाने 2816.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ची गुंतवणूक केली आहे.
◆ आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अमेरिकेने केलेल्या गुंतवणुकीत 227 टक्क्यांची तर इंग्लंड ने केलेल्या गुंतवणुकीत 44 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
***
S.Tupe/U.Raikar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721342)
Visitor Counter : 3987