शिक्षण मंत्रालय
आभासी फसवणूक करणाऱ्यांवर फेकबस्टरचा अंकूश
Posted On:
19 MAY 2021 10:14AM by PIB Mumbai
पंजाब इथल्या रोपारमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखी पडताळणी प्रणाली (डिटेक्टर) विकसित केले आहे. कोणालाही कळू न देता आभासी बैठकांमधे सहभागी होणाऱ्या आभासी चोरांना फेकबस्टर नावाची ही प्रणाली हुडकून काढते. सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) बदनामी करणे किंवा खिल्ली उडवणे अशा कामात गुंतलेल्यांचे चेहरे उघडे पाडण्याचेही काम फेकबस्टर करु शकते.
सध्याच्या महामारीच्या काळात अनेक कार्यालयीन, अधिकृत बैठका ऑनलाईनच होत असतात. अशात आभासी बैठकीत एखाद्या सहभागी सदस्याच्या चित्रीकरणात कोणी फेरफार करत असेल तर आयोजकांना ते हुडकून काढण्यात फेकबस्टर उपयोगी ठरेल. म्हणजे आभासी बैठक किंवा बेबिनारमधे कुणी एखाद्याच्या वतीने अथवा त्याच्या चेहऱ्याचा वापर करुन अवैधरित्या घुसखोरी करत असेल तर ही प्रणाली ते शोधू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन माध्यमांमधे प्रसारित होणाऱ्या साहित्यात फेरफार करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत आणि स्थायी होत चालले आहे. यामुळे व्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी अशा गैरकृत्याचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे डॉ. अभिनव धाल यांनी म्हटले आहे. फेकबस्टर विकसित करणाऱ्या चार सदस्यीय पथकाचे ते प्रमुख सदस्य आहेत.
फेकबस्टरने 90 टक्के अचूकता साध्य केली आहे असेही त्यांनी सांगितले. डॉ. धाल याच्यांसोबत सह प्राध्यापक रामनाथन सुब्रमण्यम, विद्यार्थी विनित मेहता आणि पारुल गुप्ता हे या पथकातील सदस्य आहेत.
बाईट : डॉ. अभिनव धाल
फेकबस्टर प्रणाली आभासी बैठकातील गैरसहभाग शोधून काढते. याबाबतचा प्रबंध गेल्या महिन्यात 26 तारखेला अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. इंटेलिजेंट यूजर इंटरफेसेस हा परिषदेचा विषय होता.
ही सोफ्टवेयर प्रणाली आभासी बैठकांसाठी वैयक्तिकृत व्यासपीठ असून झूम आणि स्काईप सारख्या अॅप्लीकेशनवर त्याची चाचणी घेण्यात आली आहे.
फेकबस्टर हे ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजेच इंटरनेट सुरु असताना आणि बंद असतानाही वापरता येते. सध्यातरी याचा वापर लॅपटॉप आणि संगणकावरच करता येतो. बोगस ऑडीओ म्हणजेच बोगस आवाजाच्या माध्यमातून होणारी फसवणूक शोधण्यासाठी उपकरण तयार करण्याचाही पथकाचा प्रयत्न सुरु असल्याचे सह प्राध्यापक सुब्रमण्यम यांनी सांगितले.
डिपफेक शोध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थेट प्रसारण सुरु असलेल्या आभासी बैठकीतील अवैध सहभागींना हुडकून काढणारे फेकबस्टर हे पहिले सॉफ्टवेयर व्यासपीठ असल्याचा दावा या पथकाने केला आहे. या उपकरणाची आधीच चाचणी यशस्वी झाली असून लवकरच ते बाजारात यश मिळवेल असेही ते म्हणाले.
***************
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719854)
Visitor Counter : 320