गृह मंत्रालय
'तौते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत तसेच दमण आणि दीव व दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठकीत चर्चा करून घेतला तयारीचा आढावा
चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणच्या सर्व आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा गृहमंत्र्यांनी विशेषत्वाने घेतला आढावा
सर्व कोविड रुग्णालये,प्रयोगशाळा,लसींसाठीची शीतसाखळी आणि इतर वैद्यकीय सुविधांच्या ठिकाणी पुरेशी वीज उपलब्ध राहील, यासाठी व्यवस्था ठेवण्याचे अमित शहा यांचे राज्य प्रशासक/ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचा गृहमंत्र्यांचा सल्ला
चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गावरील सर्व आरोग्य सुविधांना हानी टाळण्यासाठी आणि रुग्णांना सुखरूप हलविण्यासाठी पुरेशा सोयी करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश
ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांजवळच्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये सुरक्षेचे उपाय योजण्याचे आणि आवश्यकता भासल्यास तिथल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्याचे अमित शहा यांचे निर्देश
महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रावर चक्रीवादळाच्या प्रभावाचा गृहमंत्र्यांनी घेतला आढावा
ऑक्सिजनचा दोन दिवसांचा अतिरिक्त साठा राहावा, यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे अमित शहा यांचे निर्देश
केंद्र सरकार आणि सर्व केंद्र सरकारी संस्थांकडून सर्वतोपरी सहकार्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे संकट यशस्वीपणे हाताळेल- अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास
केंद्रीय गृह मंत्रालयात 24x7 नियंत्रणकक्ष कार्यरत असून राज्यांनी कुठल्याही साहाय्यासाठी कधीही संपर्क साधावा -अमित शहा
भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दल तैनात करण्यात आले असून विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई गस्त सुरू
अत्यावश्यक सुविधा अबाधित राहण्यासाठी आणि नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Posted On:
16 MAY 2021 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 मे 2021 रोजी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीपाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत तसेच दमण आणि दीव व दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. 'तौते' चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/ संस्था यांच्या सज्जतेच्या आढाव्यासाठी ही बैठक होती.
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी,चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणच्या सर्व आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा विशेषत्वाने आढावा घेतला.
सर्व कोविड रुग्णालये,प्रयोगशाळा,लसींसाठीची शीतसाखळी आणि इतर वैद्यकीय सुविधांच्या ठिकाणी पुरेशी वीज उपलब्ध राहील, यासाठी व्यवस्था ठेवण्याचे निर्देश अमित शहा यांनी राज्य प्रशासक/ जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याखेरीज वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक औषधांचा,साधनांचा पुरेसा साठा ठेवण्याचा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला. चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गावरील सर्व आरोग्य सुविधांना हानी टाळण्यासाठी आणि रुग्णांना सुखरूप हलविण्यासाठी पुरेशा सोयी करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांजवळच्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये सुरक्षेचे उपाय योजण्याचे आणि आवश्यकता भासल्यास तिथल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्याचे निर्देशही अमित शहा यांनी दिले.
महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रावर चक्रीवादळाच्या प्रभावाचा गृहमंत्र्यांनी आढावा घेतला.
ऑक्सिजनचा दोन दिवसांचा अतिरिक्त साठा राहावा, यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे आणि संबंधित राज्यांकडे ऑक्सिजन टँकर्स रवाना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण झाल्यास पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. रुग्णालयांना व आरोग्य सुविधांना अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी वीज प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले. गुजरातमध्ये चक्रीवादळाचा संभाव्य धोका असलेल्या भागात औद्योगिक समूहांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे आणि उद्योगांनीही दक्ष राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार आणि सर्व केंद्र सरकारी संस्थांकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.
परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासकीय आणि खासगी अशा जास्तीत जास्त संसाधनांचा उपयोग केला पाहिजे. खाजगी उद्योगांशी समन्वय साधून त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाची शाखा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. स्थानिक पातळीवर सामाजिक हेतूसाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि स्वयंसेवकांसोबत समन्वयाने काम करावे, असे गृहमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे संकट यशस्वीपणे हाताळेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृह मंत्रालयात 24x7 नियंत्रण कक्ष कार्यरत असून राज्यांनी कुठल्याही साहाय्यासाठी कधीही संपर्क साधावा असे अमित शहा यांनी सांगितले भारतीय तटरक्षक दल , नौदल, सैन्यदल आणि हवाई दल तैनात करण्यात आले असून विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई गस्त सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. आरोग्यविषयक सुविधा, ऑक्सिजन,वीज दूरसंचार, पिण्याचे पाणी इत्यादींसह अत्यावश्यक सुविधा अबाधित राहतील याची काळजी घेण्याचे आणि नुकसान झाल्यास त्या पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलण्यास त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे कार्यान्वयन व सर्व आरोग्य सुविधांच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन गुजरात व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीला कॅबिनेट सचिव, केंद्रीय गृह, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, ऊर्जा, उद्योग व अंतर्गत व्यापार चालना विभाग, यांचे सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य भारतीय हवामानशास्त्र विभाग व एनडीआरएफचे(राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ) महासंचालक उपस्थित होते; गुजरात आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव, दमण अँड दीव व दादरा नगर हवेलीचे प्रशासक, गुजरात व महाराष्ट्रातील संबंधित जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन सचिव, केंद्रीय गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृह मंत्रालय राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित केंद्रीय संस्थांशी सतत संपर्कात असून एनडीआरएफने बोटी, वृक्षतोड करणारे, टेलिकॉम उपकरणे इत्यादींनी सुसज्ज 50 पथके तैनात केली आहेत. तर गुजरातमध्ये तैनात करण्यासाठी अतिरिक्त 15 पथके विमानांनी आणली जात आहेत.
R.Aghor/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719168)
Visitor Counter : 257