पंतप्रधान कार्यालय

“तौ ते” चक्रीवादळाला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली उच्च स्तरीय आढावा बैठक


नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची खात्री करून घेण्यासाठी प्रत्येक शक्य असलेला उपाय करण्याचे पंतप्रधानांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

वीज, दूरसंचार,आरोग्य,पिण्याचे पाणी अशा सर्व अत्यावश्यक सेवांची देखभाल सुनिश्चित करा: पंतप्रधान

वादळामुळे असुरक्षित असलेल्या ठिकाणी कोविड-19 व्यवस्थापनासाठी रुग्णालये, लसीच्या शीत-साठ्याची साखळी, पर्यायी वीज पुरवठा आणि अत्यावश्यक औषधांच्या साठ्याबाबत विशेष तयारीची गरज

Posted On: 15 MAY 2021 9:28PM by PIB Mumbai

 

ज्या राज्यांमध्ये तौ ते चक्रीवादळामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा राज्यांच्या सरकारांनी आणि त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयांनी/संस्थांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे उच्च स्तरीय बैठक घेतली.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौ ते चक्रीवादळ 18 मे च्या दुपारी/संध्याकाळी ताशी 175 किमीवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह गुजरात किनारपट्टीवरील पोरबंदर आणि नलिया येथे पोहोचेल. गुजरात किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 18 मे च्या दुपारी / संध्याकाळी जोरदार पाउस कोसळेल, विशेषतः जुनागढ आणि गीर सोमनाथ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल तर सौराष्ट्र, कच्छ, दीव मधील गीर सोमनाथ,दीव,जुनागढ,पोरबंदर,देवभूमी द्वारका,अमरेली,राजकोट तसेच जामनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊन पडेल. मोरबी,कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांमध्ये समुद्र सपाटीपासून 2-3 मीटर उंचीच्या आणि पोरबंदर, जुनागढ, दीव, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून 1-2 मीटर उंचीच्या लाटा उसळतील, आणि गुजरातच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये 0.5 – 1 मीटर उंच लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सर्व संबंधित राज्यांना हवामानाचा अद्ययावत अंदाज देण्यासाठी, हवामान विभाग, 13 मे पासून एक तास कालावधीची तीन बातमीपत्रे जारी करत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव देशाच्या किनारपट्टीवरील सर्व संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांच्या आणि केंद्रीय मंत्रालये तसेच संस्थांच्या नियमितपणे संपर्कात आहेत अशी माहिती देण्यात आली.

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय अहोरात्र परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व संबंधित राज्यांच्या सरकारांशी आणि केंद्रीय संस्थांशी संपर्क साधून आहे. मंत्रालयाने आधीच सर्व राज्यांना, राज्य आपत्ती निवारण निधीच्या पहिल्या हप्त्याचे आगाऊ वितरण केले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने सहा राज्यांमध्ये बोटी, झाडे कापण्याची साधने, दूरसंचाराची साधने इत्यादींनी युक्त असलेल्या 42 पथकांची नियुक्ती केली असून 26 पथके राखीव म्हणून जय्यत तयार ठेवण्यात आली आहेत.

भारतीय तटरक्षक दल आणि नौदल यांची जहाजे आणि हेलिकॉप्टर्स  अडकलेल्या नागरिकांना मदत,शोध आणि सोडवणूक यांसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत. हवाई दल तसेच लष्कराचे अभियांत्रिकी कार्य दल बोटी आणि मदत कार्यासाठी राखीव स्वरुपात तयार ठेवण्यात आले आहे. मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण दलांसह सात जहाजे पश्चिम किनारपट्टीवर राखीव स्वरुपात तयार आहेत. पश्चिम किनारपट्टीवर त्रिवेंद्रम,कन्नूर आणि इतर काही ठिकाणी आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथके राखीव स्वरुपात तयार आहेत.

केंद्रीय उर्जा मंत्रालयाने आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित केली असून वीज पुरवठा  खंडित झाल्यास तातडीने पूर्ववत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर, डीजी सेट, आणि इतर साधनांसह सिद्धता करीत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय सर्व दूरसंचार मनोरे आणि एक्स्चेंजेस यांच्या कार्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि खंडित संपर्क पुन्हा सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या वादळामुळे बाधित होण्याची शक्यता असणाऱ्या सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी बाधित प्रदेशांतील  आरोग्य क्षेत्राची तयारी आणि कोविड-19 संदर्भातील प्रतिसाद यांच्या संदर्भात सल्लेवजा सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व आवश्यक औषधांचा साठा जवळ असलेली 10 त्वरित प्रतिसाद वैद्यकीय पथके आणि 5 सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद पथके स्थापन केली आहेत. केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाने सर्व जहाजे सुरक्षित राहण्यासाठीच्या उपाययोजना केल्या आहेत तसेच आपत्कालीन जहाजे (टग्ज) कार्यान्वित करण्यासाठी तयार ठेवली आहेत.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल असुरक्षित ठिकाणी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी राज्यातील विविध संस्थांना मदत करीत आहे तसेच चक्रीवादळाच्या आपत्तीशी सामना करण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी सतत विविध जनजागृती अभियाने देखील राबवीत आहे.

चक्रीवादळाला तोंड देण्याच्या सर्व तयारीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी राज्य सरकारे नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करीत आहेत याची खात्री करून घेण्यासाठी प्रत्येक शक्य असलेला उपाय करीत असल्याचे  तसेच वीज, दूरसंचार,आरोग्य,पिण्याचे पाणी अशा सर्व अत्यावश्यक सेवांची देखभाल होत असल्याचे सुनिश्चित करण्याचे आणि  या वादळामुळे नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागला तर अशा वेळी या सर्व सेवा तातडीने पूर्वपदावर आणण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

रुग्णालयांमध्ये  कोविड-19 व्यवस्थापनासाठी, लसीच्या शीत-साठ्याची साखळी,वैद्यकीय सुविधांना पर्यायी वीज पुरवठा आणि अत्यावश्यक औषधांच्या साठ्याबाबत तसेच ऑक्सिजन टँकर्सच्या अविरत प्रवासासाठी विशेष तयारी केली आहे याची सुनिश्चिती करण्याचे आदेश देखील पंतप्रधानांनी दिले. यासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षांचे कामकाज अहोरात्र सुरु ठेवण्याचे आदेश देखील त्यांनी दिले. जामनगरला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात शक्य तितक्या कमी अडचणी येतील याची खात्री करून घेण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे असे देखील त्यांनी सांगितले. योग्य वेळी संवेदनशीलता दाखवून मदतकार्य करण्यासाठी स्थानिक समाजाला सहभागी करून घेण्याची गरज देखील  त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीला, केंद्रीय गृहमंत्री, गृह विभागाचे राज्यमंत्री, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, मंत्रिमंडळ सचिव,

गृह, नागरी उड्डयन, उर्जा,दूरसंचार,नौकानयन, मत्स्य व्यवसाय या मंत्रालये/विभागांचे सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव आणि सदस्य, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आणि हवामान विभागाचे महासंचालक आणि पंतप्रधान कार्यालयाचे, केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाचे तसेच हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718948) Visitor Counter : 247