नागरी उड्डाण मंत्रालय
देशाच्या पश्चिम किनारपट्टीकडे येत असलेल्या “तौ ते” चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी विमानतळांवर सर्व प्रकारच्या सावधगिरीच्या उपाययोजना
Posted On:
15 MAY 2021 6:40PM by PIB Mumbai
देशाच्या पश्चिम किनारपट्टीकडे येत असलेल्या “तौ ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, याविषयी जारी केलेल्या तांत्रिक परिपत्रकानुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनाने आज नवी दिल्ली येथील कॉर्पोरेट मुख्यालयातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पश्चिम आणि दक्षिण विभागांतील विमानतळांवरील तयारीचा आढावा घेतला. प्राधिकरणाच्या कार्यान्वयन विभागाचे सदस्य आय.एन.मूर्ती यांनी सावधगिरीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करून त्यानुसार तयारीचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व संबंधित विमानतळ व्यवस्थापनांना दिल्या.
मुसळधार पावसामुळे लक्षद्वीप येथील अगत्ती विमानतळावरील सर्व विमानांची नियोजित वाहतूक 16 मे 2021 (सकाळी 10) पर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहेत. या प्रदेशातून वादळ निघून गेल्यानंतर ह्या विमानतळाचे परिचालन सुरु करण्यात येईल. भारतीय विमानतळ प्राधिकरण व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी इतर सर्व विमानतळांवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि आणखी कोणत्याही ठिकाणी काही विपरीत घटना घडल्याची नोंद झालेली नाही तसेच तिथे विमानांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु आहे.
सुरक्षेचा मुद्दा ध्यानात ठेवून आणि विमानतळावरील सुविधांची हानी कमी करण्यासाठी म्हणून, संबंधित विमानतळांना याविषयीच्या प्रमाणित कार्यान्वयन पद्धती (SoP) आणि मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानतळांवरील इमारती आणि सुविधा यांच्या संरक्षणासाठी, चक्रीवादळ-पूर्व आणि चक्रीवादळ-पश्चात दिशादर्शकांनुसार सर्व संबंधित विमानतळांच्या व्यवस्थापनाने सावधगिरीच्या उपाययोजनांची सुनिश्चिती केली आहे.
भारतीय हवामान विभागाने दक्षिण गुजरात आणि दीवच्या समुद्र किनाऱ्यांवर चक्रीवादळ-पूर्व हवामान अंदाज (लक्षद्वीप भागातील कमी दाबाचा पट्टा) जारी केला आहे. या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत, हे चक्रीवादळ तीव्र स्वरूप धारण करेल आणि त्यानंतरही त्याचे स्वरूप आणखी रौद्र होईल. त्यानंतर हे वादळ उत्तर-वायव्य दिशेकडे सरकेल आणि 18 तारखेच्या सकाळी गुजरात किनारपट्टीवर पोहोचेल असा अंदाज आहे. लक्षद्वीप बेटे, केरळ,तामिळनाडू (घाट असलेले जिल्हे) आणि कर्नाटक (किनारपट्टी आणि त्यालगतचे घाट असलेले जिल्हे) यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718857)
Visitor Counter : 262