पंतप्रधान कार्यालय
पीएम केअर्सच्या माध्यमातून ऑक्सिकेअर यंत्रणेची 1.5 लाख एकके खरेदी होणार
पीएम केअर्स निधी 322.5 कोटी रुपये खर्चून ऑक्सिकेअर यंत्रणेची 1,50,000 एकके खरेदी करणार
रुग्णाला प्राणवायू पुरविताना त्याची एसपीओटू पातळी समजून घेऊन त्यानुसार पुरवठ्याचे नियमन करणारी सर्वंकष यंत्रणा डीआरडीओकडून विकसित
डीआरडीओकडून हे तंत्रज्ञान भारतातील विविध उद्योगांना हस्तांतरित, ऑक्सिकेअर यंत्रणा देशभर वापरली जाण्यासाठी त्यांच्याकडून होणार उत्पादन
ऑक्सिकेअर यंत्रणेमुळे नित्याची मोजणी आणि ऑक्सिजन प्रवाहाचे मानवी समायोजन करण्याची गरज रद्दबातल, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील भार आणि त्यांचा रुग्णांशी संपर्क कमी होण्यास मदत
Posted On:
12 MAY 2021 9:00PM by PIB Mumbai
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या 'ऑक्सिकेअर' यंत्रणेची 1,50,000 एकके, 322.5 कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यास पीएम केअर्स निधीने मान्यता दिली आहे. एसपीओटू म्हणजेच रुग्णाच्या रक्तातील प्राणवायूची पातळी समजून घेऊन त्यानुसार पुरवठा केला जात असलेल्या प्राणवायूचा प्रवाह नियंत्रित करणारी ही सर्वंकष यंत्रणा डीआरडीओने विकसित केलेली आहे.
या यंत्रणेचे दोन प्रकार तयार करण्यात आले आहेत. प्राथमिक प्रकारात प्राणवायूचा 10 लिटरचा सिलेंडर, दाब व प्रवाह-नियंत्रक, आर्द्रताजनक आणि नाकातील नळी यांचा समावेश आहे. या मानवचलित प्रकारामध्ये एसपीओटूच्या आकड्यानुसार प्राणवायू प्रवाहाच्या नियमनाचे माणसाला करावे लागते. तर दुसऱ्या 'स्वयंप्रज्ञ' प्रकारात प्राणवायूच्या प्रवाहाचे स्वयंचलित नियमन होते. यासाठी अल्पभार नियामक, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली आणि एसपीओटू प्रोब (रुग्णाला जोडावयाचे साधन) या उपकरणांच्या मदतीने आपोआपच प्राणवायूच्या प्रवाहाचे नियमन केले जाते.
एसपीओटूवर आधारित प्राणवायू पुरवठा यंत्रणेमुळे रुग्णाच्या रक्तातील प्राणवायूच्या पातळीनुसार प्राणवायूचा उचित वापर केला जाऊ शकतो. परिणामी प्राणवायूचे सिलेंडर अधिक टिकू शकतात. "रक्तातील प्राणवायूची पातळी किती असता रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा सुरु झाला पाहिजे?" ही मर्यादा आरोग्य कर्मचाऱ्यांना समायोजित (ऍडजस्ट) करायची असते. एसपीओटू पातळीवर यंत्रणेचे सातत्याने लक्ष असते व ती पातळी सतत दाखविलीही जाते. या यंत्रणेमुळे नित्याची मोजणी आणि ऑक्सिजन प्रवाहाचे मानवी समायोजन करण्याची गरज रद्दबातल होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांवरील भार आणि त्यांचा रुग्णांशी संपर्क कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे दूर-वैद्यकसल्ला देणेही शक्य होते. स्वयंचलित यंत्रणेत असलेली आणखी महत्त्वाची सुविधा म्हणजे धोक्याच्या परिस्थितीत वाजविण्यात येणारी इशाराघंटा. रुग्णाची एसपीओटू पातळी खालावत जाणे किंवा यंत्रणेकडून रुग्णाच्या शरीराला जोडलेले 'प्रोब' सुटून जाणे- अशा धोकादायक परिस्थितीत स्वयंचलित यंत्राकडून वाजणाऱ्या इशाराघंटेमुळे मोठा धोका टाळता येऊ शकतो. ही ऑक्सिकेअर यंत्रणा गृह-विलगीकरण, विलगीकरण केंद्रे, कोविड देखभाल केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये वापरली जाऊ शकते.
नॉन-रिब्रीदर प्रकारचे प्राणवायू पुरवठ्यास उपयुक्त असे मास्क हे या ऑक्सिकेअर यंत्रणेचाच एक भाग असून यामुळे प्राणवायूची 30-40% बचत होते.
डीआरडीओने भारतातील अनेक उद्योगाना हे तंत्रज्ञान पुरविले असून त्यांच्यामार्फत देशभरात वापरता येण्याच्या दृष्टीने ऑक्सिकेअर यंत्रणांचे उत्पादन होणार आहे.
सध्याच्या वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार कोविड-19 ची तीव्र लक्षणे असणाऱ्या व गंभीर अशा सर्व रुग्णांसाठी प्राणवायू-उपचार प्रणाली वापरावी अशी शिफारस करण्यात आली आहे. प्राणवायू निर्मितीची सद्यस्थिती पाहता, तसेच वाहतूक आणि साठवणूक स्थिती विचारात घेता, ऑक्सिजन सिलेंडर अतिशय प्रभावी व उपयुक्त ठरल्याचे दिसून येते. आता कोविडच्या बहुसंख्य रुग्णांना प्राणवायू उपचार प्रणालीची गरज भासत आहे. हे लक्षात घेता, प्राणवायू पुरविणारी केवळ एकाच प्रकारची यंत्रणा उपलब्ध असणे व्यवहार्य नाही. कारण त्यासंबंधीची प्राथमिक सामग्री तयार करणारे सर्व कारखाने आता सध्याच्या पेक्षा अधिक उत्पादन करू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत यंत्रणांचे वैविध्य हा चांगला पर्याय ठरू शकतो. कार्बन-मँगनीज-पोलादाचे सिलेंडर तयार करणाऱ्या कारखान्यांची आताची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे पर्याय म्हणून डीआरडीओने हलक्या द्रव्यापासून बनविलेले व सहज हलवता येतील असे सिलेंडर विकसित केले असून, सध्याच्या सिलेंडरना तो उत्तम पर्याय ठरू शकतो.
***
M.Chopade/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718153)
Visitor Counter : 214
Read this release in:
Telugu
,
English
,
Malayalam
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada