भूविज्ञान मंत्रालय

तिसर्‍या आर्क्टिक विज्ञानमंत्री स्तरीय बैठकीत भारत सहभागी; आर्क्टिक क्षेत्रात संशोधन आणि दीर्घकालीन सहकार्यासाठीची योजना सामायिक केली

Posted On: 08 MAY 2021 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2021

 

आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक व्यासपीठ (8-9 मे, 2021) असलेल्या तिसर्‍या आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठकीत भारत सहभाग घेत आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी, आर्क्टिक क्षेत्रात संशोधन, कार्य आणि सहकार्यासाठी भारताची दृष्टी आणि दीर्घकालीन योजना हितधारकांसोबत सामायिक केल्या. त्यांनी निरीक्षण यंत्रणेला बळकटी आणण्यासाठी आणि ज्ञान वाढविण्यासाठी डेटा सामायिक करण्याच्या सहकार्यांचे स्वागत केले. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “निरीक्षण, संशोधन, क्षमता बांधणी तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आर्क्टिक क्षेत्राविषयी सामायिक समन्वय वाढविण्यामध्ये भारत सकारात्मक भूमिका बजावेल.” पुढील किंवा भविष्यातील एएसएमच्या यजमानपदाची संधी भारताला दिली जाऊ शकते, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.

आर्क्टिकमध्ये निरिक्षण यंत्रणेत अव्याहत आणि दूरस्थ सेन्सिंगद्वारे योगदान देण्याची आपली योजना भारताने सामायिक केली. अमेरिकेच्या सहकार्याने एनआयएसईआर (नासा-इस्रो सिंथेटिक अपेर्चर रडार) उपग्रह अभियानाचे प्रक्षेपण होणार आहे.

पहिल्या दोन बैठका — एएसएम 1 आणि एएसएम 2 अनुक्रमे 2016 मध्ये अमेरिकेत आणि 2018 मध्ये जर्मनी येथे झाल्या. आइसलँड आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने एएसएम 3 ही आशिया खंडातील पहिली मंत्री स्तरीय  बैठक आहे. आर्क्टिक क्षेत्राविषयी सामूहिक समज वाढविण्यासाठी, निरंतर देखरेखीवर भर देण्यासाठी आणि निरिक्षणांना बळकटी देण्यासाठी विविध हितधारकांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून ही बैठक आयोजित केली गेली आहे. ‘शाश्वत आर्क्टिकसाठी ज्ञान’ ही या वर्षाची संकल्पना आहे.

आर्क्टिक क्षेत्र तापमानवाढ आणि बर्फ वितळणे ही जागतिक चिंता आहे कारण ते हवामान, समुद्राची पातळी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शिवाय, आर्क्टिक आणि हिंदी महासागर (जे भारतीय मान्सूनचे नियमन करतात) यांच्यात दुवा असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

2013 पासून आर्क्टिक कौन्सिलमध्ये इतर बारा देशांसह भारताला ‘निरीक्षक’ दर्जा प्राप्त आहे. आर्क्टिक कौन्सिल म्हणजे शाश्वत विकास आणि आर्क्टिकमधील पर्यावरणीय संरक्षणाकडे सहकार्य, समन्वय आणि संवाद वाढविण्यासाठी एक उच्च स्तरीय आंतर सरकारी मंच आहे.


* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1717130) Visitor Counter : 270