संरक्षण मंत्रालय

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेविरुद्धच्या लढ्यात संरक्षण मंत्रालय आणि सुरक्षा दलाद्वारे सुरु असलेल्या कामांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा


अतिरिक्त आरोग्य कर्मचारी नेमणे, प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी लॉजिस्टिक पाठबळ देणे आणि नव्या ऑक्सिजन संयंत्र उभारणी यांना प्राधान्य

Posted On: 01 MAY 2021 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2021

देशातील कोविड19 विरोधातल्या लढ्यात संरक्षण मंत्रालय आणि सुरक्षा दले नागरी प्रशासनाला करत असलेल्या मदत कामांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (1 मे 2021) व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. संरक्षणदल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत, संरक्षण सचिव डॉ अजय कुमार, नौदल प्रमुख  डमिरल करमबीर सिंह, हवाईदल प्रमुख एअर मार्शल आर के एस भदोरिया, लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, सचिव संरक्षण विभाग संशोधन व विकास आणि अध्यक्ष संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) डॉ. जी सत्येश रेड्डी, महासंचालक सशस्त्र सैन्य वैद्यकीय सेवा (एएफएमएस) सर्जन व्हाइस  डमिरल रजत दत्ता, उपमुख्य एकात्मिक संरक्षण (वैद्यकीय) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि अतिरिक्त सचिव (संरक्षण उत्पादन) श्री संजय जाजू व संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 600 अतिरिक्त डॉक्टरांची विशेष उपाययोजनांच्या माध्यमातून नेमणूक केली जात आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांना यावेळी  देण्यात आली. भारतीय नौदलाने विविध रुग्णालयांमध्ये सहाय्य करण्यासाठी 200 बॅटल फील्ड नर्सिंग सहाय्यक तैनात केले आहेत. नॅशनल कॅडेट कोर्प्स (एनसीसी) ने महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणामधील विविध ठिकाणी 300 कॅडेट्स व कर्मचारी तैनात केले आहेत. आरोग्य सेवेतील ज्येष्ठ तज्ज्ञांद्वारे टेलिमेडिसिन सेवा लवकरच गृह विलगीकरणातील रूग्णांना सल्ला देण्यासाठी सुरू होईल. भारतीय सैन्याने विविध राज्यात नागरिकांकरिता 720 पेक्षा जास्त खाटा (बेड) उपलब्ध करुन दिल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने सैन्यदलाला राज्य व जिल्हा पातळीवर स्थानिक प्रशासनासह तपशीलाचे आदानप्रदान करण्याचे निर्देश दिले. स्थानिक लष्कर विभाग (कमांड) यांनी नागरी प्रशासनाला सक्रीय मदत करावी अशा सूचना जनरल बिपीन रावत यांनी दिल्या.

राजनाथ सिंह यांना माहिती देण्यात आली की, लखनौमध्ये डीआरडीओने उभारलेले 500 खाटांचे  रुग्णालय पुढील 2-3 दिवसात सुरू होईल. वाराणसीमध्ये आणखी एक रुग्णालय सुरू करण्यात येत असून ते 5 मे पर्यंत पूर्ण होणार आहे. डीआरडीओचे अध्यक्ष म्हणाले की पंतप्रधान केअर फंडाअंतर्गत तयार होणाऱ्या 380 ऑक्सिजन पीएसए (प्रेशर स्विंग अ‍ॅसॉर्पोरेशन) पैकी पहिले चार प्रकल्प पुढील आठवड्यात नवी दिल्लीतील रूग्णालयात तैनात केले जातील.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलाद्वारे परदेशातून तसेच देशभरात वापरकर्ते आणि उत्पादक यांच्या दरम्यान ऑक्सिजन कंटेनरची वाहतूक करण्यात पुरवल्या जाणार्‍या वाहतुक सहकार्याचे कौतुक केले. भारतीय वायुसेनेच्या परिवहन विमानाने (आयएएफ) सिंगापूर, बँकॉक, दुबई आणि देशामधून अनेक फेऱ्या करत पुरवठा केला. तर भारतीय नौदलाने ऑक्सिजनने भरलेले कंटेनर भारतात आणण्यासाठी चार जहाजे - दोन मध्य पूर्व आणि दोन दक्षिण-पूर्व आशियाकडे रवाना केली.  01 मे , 2021 रोजी, एएएफने परदेशातून 28 मोहिमा चालवल्या, त्यामध्ये 830 मेट्रिक टन क्षमतेसह  47 ऑक्सिजन कंटेनरची उड्डाणे करण्यात आली, तर देशांतर्गत 158 मोहिमा चालवल्या, यात 2,271 मे.टन क्षमतेसह 109 कंटेनरची उड्डाणे केली. नौदल आणि हवाई दलाने त्यांच्या साठ्यातून जवळपास 500 पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर विविध नागरी रुग्णालयात पुरवले आहेत.

डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज (डीपीएसयू) सीएसआर अंतर्गत राज्यातील विविध रुग्णालयांना पुरवण्यासाठी 40 कोटी रुपयांचे 28 ऑक्सिजन प्रकल्प आणि इतर वैद्यकीय उपकरणे खरेदी करीत आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) बेंगळुरूमध्ये 250 खाटांचे (बेडचे) रुग्णालय सुरू केले आहे. लखनऊमध्ये आणखी 250 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.

राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला की सशस्त्र सैन्यदलांनी नागरी प्रशासनास आवश्यक ती सर्व मदत पुरवली पाहिजे तसेच त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आणि तिन्ही सैन्यदलांना विविध उपाययोजनांच्या  प्रगतीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले.

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1715430) Visitor Counter : 231