पंतप्रधान कार्यालय

भारतीय हवाई दलाच्या कोविड संबंधित कार्याचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

Posted On: 28 APR 2021 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021

 

हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

कोविड-19 संदर्भातल्या परिस्थितीत मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल  करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. भारतीय हवाई दलाने आपल्या अवजड वाहतूक करणाऱ्या संपूर्ण ताफ्याला अहोरात्र सज्ज राहण्याचे आणि मध्यम वजनाची सामग्री वाहून नेणाऱ्या ताफ्यांना कोविड संबंधित सामग्रीची देशात आणि परदेशात ने-आण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी पंतप्रधानांना दिली. ही कामे अहोरात्र सुरू ठेवण्यासाठी या ताफ्यामधील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली आहे.

ऑक्सिजन टँकर आणि इतर आवश्यक सामग्री वाहतुकीसंदर्भातल्या कामात वेग, व्यापकता आणि सुरक्षितता वाढवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. कोविड संदर्भातल्या कार्यात भारतीय हवाई दलाचे कर्मचारी संसर्गापासून सुरक्षित राहतील हे सुनिश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोविड संबंधित कार्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

सर्व प्रांतापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय हवाई दल मोठी आणि मध्यम आकाराची विमाने तैनात करत असल्याची माहिती हवाई दल प्रमुख भदौरिया यांनी दिली. कोविड विषयक कार्यासाठी विविध मंत्रालये आणि एजन्सी यांच्याशी वेगाने समन्वय साधण्यासाठी भारतीय हवाई दलाने स्थापन केलेल्या कोविड समर्पित हवाई सहकार्य विभागाची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.

भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची पंतप्रधानांनी विचारपूस केली. भारतीय हवाई दलात लसीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारतीय हवाई दलाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात कोविड सुविधा वाढवण्यात आल्या आहेत आणि शक्य तिथे नागरिकांनाही परवानगी देण्यात आली आहे असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714660) Visitor Counter : 297