विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-सीएमइआरआय यांनी भारतात विकसित केलेले ऑक्सिजन वृद्धी तंत्रज्ञान कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यास उपयुक्त ठरु शकेल- डॉ व्ही आर शिरसाठ

Posted On: 26 APR 2021 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2021


पश्चिम बंगालमधील दुर्गापूर इथल्या सीएसआयआर-सीएमइआरआय  या संस्थेने, छत्तीसगढ, रायपूर इथल्या एमएसएमई- डीआयच्या सहकार्याने, ऑक्सिजन वृद्धी तंत्रज्ञानावर (ऑक्सिजन एन्रीचमेंट) 25 एप्रिल 2021 रोजी एका वेबिनारचे आयोजन केले होते.

यावेळी आपल्या स्वागतपार भाषणात, एमएसएमई- डीआय रायपूर चे संयुक्त संचालक आणि कार्यकारी प्रमुख, डॉ व्ही आर शिरसाठ म्हणाले की सध्या संपूर्ण देश एका अभूतपूर्व अशा महामारीच्या संकटाचा सामना करतो आहे. तसेच कोविड-19 च्या रुग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अशा स्थितीत, सीएसआयआर-सीएमइआरआय ने ऑक्सिजन वृद्धी करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल, अशी आशा शिरसाठ यांनी व्यक्त केली. या तंत्रज्ञानात मोठी क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सहभागी उद्योग/व्यावसायिकांनी या कामासाठी पुढे यावे आणि या उपकरणाचे लवकरात लवकर उत्पादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

सीएसआयआर-सीएमइआरआय चे संचालक डॉ हरीश हिरानी यांनीही यावेळी आपल्या भाषणात सांगितले की त्यांच्या संस्थेने विकसित केलेले हे ऑक्सिजन वृद्धी उपकरण तयार करण्यासाठी तेल-विरहित रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, ऑक्सिजन ग्रेड जिओलाईट चाळणी आणि हवेच्या दाबावर चालणारे (न्यूमेटिक) घटक आवश्यक असतात. हे उपकरण अगदी सहजपणे आणि सुरक्षितरीत्या अलगीकरण कक्षात।बसवता येते. ज्या रूग्णांना ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे, अशा रुग्णांना ते उपयुक्त ठरू शकेल.

रायपूरच्या उद्योग संघटनेच्या अध्यक्षांसह, उद्योग क्षेत्रातील इतर अनेक मान्यवर या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते तसेच त्यांनी या विषयावर, सहभागी वक्त्यांशी संवादही साधला. अनेक उद्योगांनी या तंत्रज्ञानात रुची दाखवत त्याचे उत्पादन करण्याची तयारी दर्शवली आहे


* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714151) Visitor Counter : 215