संरक्षण मंत्रालय
कोविड-19 च्या नव्याने आलेल्या लाटेविरुद्ध उभारलेल्या लढ्यात, हवाई दलाकडून ऑक्सिजन कंटेनर, अत्यावश्यक औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांची हवाई मार्गाने वाहतूक
Posted On:
23 APR 2021 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेविरुद्ध उभारलेल्या लढाईत, कोविड रुग्णालये आणि सुविधा केंद्र स्थापन उभारण्यासाठी तसेच कार्यरत असलेली रुग्णालये आणि केंद्रांना पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन कंटेनर, सिलेंडर, अत्यावश्यक औषधे, उपकरणे आदींचा पुरवठा करण्यासाठी भारतीय हवाई दल अतिशय तत्परतेने कार्यरत झाले असून देशाच्या विविध भागातून हवाई मार्गाने ही सामग्री घेऊन निर्धारित ठिकाणी पोहोचवण्यासाठी उड्डाणे करत आहे. यासाठी हवाई दलाच्या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. सी-17, सी-130जे, आयएल-76, एन -32 आणि ऍवरो या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा त्यात समावेश आहे. या कामासाठी चिनूक आणि एमआय -17 ही हेलिकॉप्टर राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कोची, मुंबई, वायझॅग आणि बंगळुरू येथील डॉक्टर आणि परिचारिकांना दिल्लीतील रुग्णालयात सेवेत दाखल होण्यासाठी हवाई मार्गे दिल्लीला पोहचविण्याच्या कामाचा समावेश आहे.
अतिशय गरजेच्या असलेल्या ऑक्सिजनचे वितरण वेगाने व्हावे यासाठी, भारतीय हवाई दलाच्या सी-17 आणि आयएल-76 या विमानांमधून मोठे रिकामे ऑक्सिजन टँकर त्यांच्या वापराच्या ठिकाणाहून देशभरातील ऑक्सिजन भरणा केंद्रांवर नेण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, लेह येथे अतिरिक्त कोविड चाचणी केंद्र उभारण्यासाठी सी-17 आणि आयएल-76 या विमानांनी बायोसॅफ्टी कॅबिनेट्स आणि ऑटोक्लेव्ह यंत्रांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली आहे. अतिशय तातडीने उड्डाण करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मालवाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत.
2020 मध्ये कोविड-19 च्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय हवाई दलाने कोरोना विषाणू साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी हवाईमार्गे आवश्यक औषधे, वैद्यकीय आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला तसेच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते.
* * *
S.Patil/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713606)
Visitor Counter : 327