रेल्वे मंत्रालय

द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन(LMO) घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे विशाखापट्टणम आणि बोकारो इथून महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशासाठी रवाना होण्यास सज्ज


या गाड्यांसाठी लखनऊ ते वाराणसी या 270 किमीच्या टप्प्यात ग्रीन कॉरिडोर निर्माण करत, 62.35 किमी/तास या सरासरी वेगाने 4 तास 20 मिनिटांत अंतर कापण्याची योजना

ग्रीन कॉरिडोरमुळे ऑक्सिजन एक्सप्रेसच्या जलद प्रवासाला मदत

Posted On: 22 APR 2021 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

 

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात रुग्णांना जलद ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे चालवत आहे. 

द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन- LMO चे  टँकर्स भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस आज रात्री विशाखापट्टणम इथून मुंबईसाठी रवाना होणार आहे. विशाखापट्टणम येथे भरलेली टॅँकर्सची भारतीय रेल्वेच्या रो- रो सेवेच्या माध्यमातून वाहतूक केली जाणार आहे.

दुसऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसने आज वाराणसीमार्गे लखनौ ते बोकारो असा प्रवास सुरु केला आहे. ही एक्सप्रेस उत्तरप्रदेशाला वैद्यकिय ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. या गाडीच्या जलद आणि निर्वेध प्रवासासाठी, लखनौ ते वाराणसी दरम्यान ग्रीन कॉरिडोर म्हणजेच मोकळा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ही ट्रेन 270 किमीचे अंतर ताशी 62.35 किमी प्रतीतास या वेगाने चार तास 20 मिनिटात पूर्ण करू शकेल.

रेल्वेगाडीच्या माध्यमातून ऑक्सिजनची वाहतूक रस्ते वाहतुकीपेक्षा जलद आहे. रेल्वेगाड्या 24 तास धावू शकतात मात्र ट्रकवाहकांना मध्ये विश्रांती घेणे आवश्यक असते.

रेल्वेच्या सपाट वॅगनवरून टँकर्स वर/खाली चढवणे उतरवणे यासाठी रॅम्प म्हणजे घसरत्या सपाट मार्गांची गरज असते. त्याशिवाय, काही ठिकाणी असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्यांवरच्या इतर बांधकांमांमुळे रस्त्यावरच्या विविध टँकर्सपैकी काही विशिष्ट म्हणजे  3320 मिलीमीटर उंचीचे T1618 मोडेलचे टँकर्सच या 1290 मिमी उंचीच्या  सपाट  वॅगनवर ठेवले जाणे शक्य होते. या सर्व गोष्टींचा विचार करत अडथळे दूर करून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस तयार करण्यात आली आहे.

गेल्यावर्षीही कोविड मुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली असताना, रेल्वेने अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करत पुरवठा साखळी कायम सुरु ठेवण्यात मोठे योगदान दिले होते.

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713428) Visitor Counter : 314