अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पब्लिक इशू आणि राईट्स इश्यूसाठी निधी उभारणीत अनुक्रमे 115% आणि 15% वाढ नोंदली गेली


आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉर्पोरेट रोखे बाजारातील इश्यूच्या संख्येत 10 % वाढ

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकदारांची संख्याही 10% वाढली

Posted On: 14 APR 2021 10:02AM by PIB Mumbai

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड -19 मुळे उद्भवलेली अनिश्चितता असूनही, पब्लिक इशू आणि राईट्स इश्यूसाठी निधी उभारणी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली होती. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान पब्लिक इशू आणि राईट्स इश्यूद्वारे अनुक्रमे 46,029.71 कोटी रुपये आणि 64,058.61 कोटी रुपये उभारण्यात आले. गेल्या वर्षी हीच रक्कम अनुक्रमे 21,382.35 कोटी आणि 55,669.79 कोटी रुपये होती. गतवर्षीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अनुक्रमे 115% आणि 15% इतकी वाढ झाली आहे.

कॉर्पोरेट रोखे बाजार

त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 7,82,427.39 कोटी रुपयांचे सुमारे 2003 कॉर्पोरेट रोखे बाजारात आले. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 1,821 इश्युद्वारे 6,89,686.19 कोटी रुपये उभारले होते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये इश्यूची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे, तर मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत रकमेत 13.5% वाढ झाली आहे.

म्युच्युअल फंड

भारतीय भांडवल बाजारपेठेने महामारीचा सामना करण्यात आपली लवचिकता दाखवली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेत 31 मार्च 2020 पर्यंतच्या 22.26 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 31 मार्च 2021 पर्यंत 41 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 31.43 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकदारांच्या संख्येतही 10 टक्के वाढ झाली. 31 मार्च 2020 पर्यंत ही संख्या 2.08 कोटी होती ती मार्च 31, 2021 पर्यंत 2.28 कोटींवर गेली आहे. छोट्या शहरांमध्ये म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढत्या विस्तारामुळे 31 मार्च 2021 पर्यंत अव्वल 30 शहरांखालील मुच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाच्या असेट्स अंडर मॅनेजमेंट 54 टक्क्यांनी वाढून 5,35,373 कोटी रुपये झाला आहे. 31 मार्च 2020 पर्यंत तो 3,48,167 कोटी रुपये होता. म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणूकदार 31 मार्च 2021 पर्यंत त्यांच्या गुंतवणूकीच्या उद्देशानुसार विविध श्रेणीतील 1,735 म्युच्युअल फंड योजनांमध्ये कोणत्याही गुंतवणूकीची निवड करू शकतात.

***

JPS/Sushama K/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1711705) Visitor Counter : 182