निती आयोग
'पोषण ज्ञान' नामक पोषणावरील माहितीच्या डिजिटल भांडाराचा नीती आयोगाकडून प्रारंभ
Posted On:
13 APR 2021 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
आरोग्य आणि पोषणविषयक माहिती देणाऱ्या 'पोषण ज्ञान' नामक राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल भांडाराचा आज नीती आयोगाने प्रारंभ केला. या उपक्रमामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि अशोक विद्यापीठातील सामाजिक आणि वर्तनात्मक परिवर्तन केंद्र हेही भागीदार आहेत.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव राममोहन मिश्रा आणि अतिरिक्त सचिव डॉ.राकेश सरवल यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले.
पोषण ज्ञान या संकेतस्थळाची निर्मिती हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचे मत, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी संकेतस्थळाचा प्रारंभ करताना व्यक्त केले. "प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील वर्तणूक बदलूनच खरे परिवर्तन प्रत्यक्षात आणता येऊ शकते. भारत हा अन्नाचे स्वतःच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन करणारा देश असूनही, येथे प्रचंड कुपोषणही आहे. याचाच अर्थ असा, की वर्तणुकीमध्ये परिवर्तन घडून येण्याची मोठी गरज आहे. हे लक्षात घेऊन आखलेला, पोषण ज्ञान हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. पोषण हे पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार जन आंदोलन होण्यासाठी याची मदत होऊ शकेल." असेही डॉ.राजीव कुमार म्हणाले.
भारतातील पोषणविषयक आव्हानाचे सर्वोच्च प्राधान्य नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी विशद केले. "जे समाजघटक कुपोषणाला बळी पडू शकतात, उदा- गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, आणि सहा वर्षांखालील वयाची बालके, यांच्यावर भर देऊन, वर्तणूकविषयक सखोल माहिती देऊन हा प्रश्न सोडवता येईल" असे त्यांनी सांगितले.
महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव राममोहन मिश्रा यांनी पोषण ज्ञान या संकेतस्थळाच्या स्थापनेचे स्वागत केले. "समाजाची स्थिती सुधारण्यासाठी सहाय्यभूत ठरल्यावर ज्ञानाचा सर्वाधिक उपयोग होतो", असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ.राकेश सरवल यांच्या मार्गदर्शनांतर्गत, पोषण ज्ञान या माहितीभंडाराची संकल्पना विकसित झाली. आरोग्य आणि पोषणाशी संबंधित 14 पैलूंविषयी विविध भाषा, विविध माध्यमे आणि विविध जनसमुदायांसाठी तयार केलेल्या संवादात्मक साहित्यातून हवी ती माहिती शोधून घेण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. या भांडारासाठीची माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालय तसेच विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थांकडून संकलित करण्यात आली आहे.
पोषण ज्ञान नामक या माहितीभंडारात 'क्राऊडसोर्सिंग' प्रकारची एक विशिष्ट सुविधा देण्यात आली आहे. यामुळे संकेतस्थळावरील माहितीत भर घालण्याचे योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीला तसे करता येईल आणि नंतर एका समितीद्वारे त्याचे परीक्षण केले जाईल.
संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा- https://poshangyan.niti.gov.in/
S.Thakur/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711572)
Visitor Counter : 251