संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि कझाकस्तानचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल नुरलॉन येर्मेकबायेव्ह यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा


द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर विचार विनिमय

Posted On: 09 APR 2021 7:09PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि  रिपब्लिक ऑफ कझाकस्तानचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल नुरलॉन येर्मेकबायेव्ह यांच्यामध्ये आज, 9 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी प्रशिक्षण, संरक्षण सराव आणि क्षमतावृद्धी यांचा समावेश असलेले द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचे संबंध अधिक मजबूत करण्याबाबत परस्परांच्या विचारांचे आदान-प्रदान केले. परस्परहित साधण्याच्या दृष्टीने संरक्षण उद्योगाच्या सहयोगाच्या शक्यतेवर विचार करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये यावेळी सहमती झाली.

लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतरीम सेनेतील भारतीय लष्करी दलाच्या तुकडीचा भाग म्हणून कझाक सैन्यदलाला तैनात करुन संधी दिल्याबद्दल येर्मेकबायेव्ह यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले.

वार्षिक भारत-कझाकिस्तान (KAZIND) सरावाबद्दलही दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक  मूल्यमापन केले.

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख अडमिरल करमबीर सिंग, संरक्षण सचिव अजय कुमार, संरक्षण उत्पादन सचिव राज कुमार तसेच संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी व  लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लेफ्टनंट जनरल नुरलॉन येर्मेकबायेव्ह 7 ते 10 एप्रिल 2019 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी  जोधपूर येथील 12 व्या लष्करी कॉर्प्स मुख्यालयाला तसेच जैसलमेर येथील  लोंगेवाला सेक्टरला भेट दिली. संरक्षण  मंत्री राजनाथ सिंग यांच्या आमंत्रणावरून कझाक संरक्षण मंत्री भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710723) Visitor Counter : 183