पंतप्रधान कार्यालय

“परीक्षा पे चर्चा 2021” या कार्यक्रमाच्या दूरदृश्य प्रणाली आवृत्तीमध्ये पंतप्रधानांनी साधला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद

Posted On: 07 APR 2021 9:45PM by PIB Mumbai

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. सुमारे 90 मिनिटे चाललेल्या या संवादामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी महत्त्वाच्या वाटणाऱ्या विविध मुद्यांवर पंतप्रधानांकडून मार्गदर्शन घेतले. यावर्षी देखील देशभरातील विद्यार्थी आणि परदेशात असलेले भारतीय विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. यावर्षीचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेला पहिला कार्यक्रम असल्याचे सांगत पंतप्रधानांनी कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक प्रकारच्या नवोन्मेषाला चालना मिळाल्याकडे लक्ष वेधले. तर विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी न मिळाल्याची खंत असली तरीही या वर्षी परीक्षा पे चर्चामध्ये खंड पडता कामा नये, असे देखील सांगितले. परीक्षा पे चर्चा हा केवळ परीक्षांविषयीचा चर्चात्मक कार्यक्रम नसून आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि मित्रमंडळींशी निवांत वातावरणात संवाद साधण्याची आणि आपल्यामध्ये नवा आत्मविश्वास जागवण्याची संधी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.   

आंध्र प्रदेशातील एम पल्लवी आणि क्वालालंपूरमधील अर्पण पांडे या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना परीक्षेची भीती कमी कशी करायची याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. परीक्षा हेच सर्व काही आणि जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे असे वातावरण निर्माण केल्यामुळे परीक्षेची भीती निर्माण होते, असे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. जीवन प्रदीर्घ आहे आणि परीक्षा या जीवनातील केवळ एक टप्पा आहेत, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांवर परीक्षांचा दबाव टाकू नका अशी सूचना त्यांनी पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांना केली. आपल्या क्षमतेची चाचपणी करण्याची परीक्षा ही एक उत्तम संधी असल्याचे मानले पाहिजे आणि तिला जीवन- मरणाचा प्रश्न बनवू नये, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. जे पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देतात त्यांना त्यांच्या मुलांची क्षमता आणि त्यांच्यातील कच्चे दुवे यांची जाणीव असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कठीण धडे आणि विषयांसंदर्भात मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी प्रत्येक विषयाकडे सारख्याच भूमिकेतून पाहण्याची आणि त्याचा अभ्यास समान उत्साहाने करण्याची सूचना केली. परीक्षेत सर्वात आधी सोपे प्रश्न सोडवण्याबाबत आपला दृष्टीकोन काहीसा वेगळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या सुरुवातीलाच आपण ताजेतवाने असताना कठीण प्रश्न सोडवायला घेतले तर ते प्रश्न जास्त सोपे वाटू लागतात, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान म्हणून सध्या काम करताना आणि यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून काम करताना सकाळच्या वेळी ताजेतवाने असताना कठीण प्रश्नांची हाताळणी करण्याला आपण प्राधान्य दिले असे पंतप्रधानांनी सांगितले. सर्व विषयांवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे नसते, अगदी ज्या लोकांनी आयुष्यात खूप मोठे यश मिळवले त्यांची देखील एका विशिष्ट विषयावरच घट्ट पकड होती, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी लता मंगेशकर यांचे उदाहरण दिले. त्यांनी संपूर्ण आयुष्यात केवळ गायनावरच भर दिला, असे ते म्हणाले. एखादा विषय कठीण वाटणे हा काही दोष नाही आणि कठीण विषयांपासून पळ काढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे  पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

   पंतप्रधांनी मोकळ्या वेळेचे महत्व विशद केले. ते म्हणाले की, मोकळ्या वेळेचे मूल्य असले पाहिजे , ते नसेल तर जीवन एखाद्या रोबोट सारखे होईल . जेव्हा वेळ मिळवता  तेव्हा त्या मोकळ्या वेळेचे अधिक मूल्य तुम्हाला समजते .  सर्वात महत्त्वाचे म्हणजे,  ज्या गोष्टींमुळे हा मोकळा वेळ वाया जाईल, त्या धोकादायक  गोष्टीं टाळण्यासाठी सावधगिरी बाळगायला हवी.  या गोष्टी तुम्हाला ताजेतवाने करण्याऐवजी थकवतील.  मोकळा वेळ ही नवीन कौशल्ये शिकण्याची उत्तम  संधी आहे. व्यक्तीचे वेगळेपण प्रकट होईल अशा कार्यासाठी मोकळ्या वेळेचा  उपयोग करायला हवा.

 

पंतप्रधानांनी शिक्षक आणि  पालकांना सांगितले की , मुले खूप हुशार असतात. ती जेष्ठांनी दिलेल्या तोंडी निर्देशांपेक्षा निरीक्षण करतात आणि जेष्ठांच्या कृतीचे अनुसरण करतात . म्हणूनच , आपला जागतिक दृष्टीकोन , उपदेश आपल्या वर्तनातून दिसायला  हवा. जेष्ठांनी आपल्या जीवनात आदर्शांचे   अनुसरून करून  प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 

पंतप्रधानांनी सकारात्मक बळकटीकरणाच्या गरजेवर जोर दिला आणि मुलाला घाबरवून  नकारात्मक प्रेरणा देण्याविरोधात  सावध केले. त्यांनी जेष्ठांच्या सक्रिय प्रयत्नांकडेही लक्ष वेधले की , मुले वडिलधाऱ्यांचे  अनुकरणीय वर्तन  पाहतात तेव्हा त्यांना आतून प्रकाश मिळतो. ते म्हणाले, "तरुणांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सकारात्मक प्रेरणेचा अतिरेक चांगला आहे." प्रशिक्षण हा प्रेरणेचा पहिला भाग आहे आणि प्रशिक्षित मन अधिक प्रेरणा देते , असे ते म्हणाले.

स्वप्नपूर्तीसाठी संकल्प करावा असा सल्ला श्री . मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. सेलिब्रिटी संस्कृतीच्या झगमगाटामुळे त्यांनी निराश होऊ नये. ते म्हणाले की,  वेगवान बदलत्या जगाने बर्‍याच संधी  दिल्या आहेत आणि त्या संधी मिळविण्यासाठी  कुतूहल वाढवण्याची गरज आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीतील विद्यार्थ्यांनी , रोजगार तसेच  नवीन बदल या स्वरूपाच्या  सभोवतालच्या जीवनाचे निरीक्षण केले पाहिजे आणि  त्यांनी स्वतःसाठी प्रशिक्षण आणि कौशल्याचा आरंभ करायला हवा .

 एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या जीवनाचा मुख्य संकल्प करायचा असेल तर शून्यापासून संकल्प  करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. एकदा असे झाले की मार्ग मोकळा होईल, असे मोदी म्हणाले. 

 

आपण आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निश्चय करायला हवा. #PPC2021 pic.twitter.com/6TtPcjq4qd

— पंतप्रधान कार्यालय (@PMOIndia) April 7, 2021

 

पंतप्रधानांनी यावेळी पोषक अन्नाचे महत्व सांगितले तसेच पारंपरिक अन्नाचे फायदे आणि चवींचे महत्त्व ओळखण्याचा सल्लाही दिला.

गोष्टी किंवा अभ्यास लक्षात राहत नसल्याची अडचण सांगत यावर काय उपाय करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारल्यावर पंतप्रधानांनी त्यांना, “ (एखाद्या गोष्टीत)रस घ्या,आत्मसात करा, स्वतःला जोडून घ्या आणि दृश्य स्वरूपात त्याची कल्पना करा” असा मंत्र दिला. आपली स्मृतीशक्ती सक्षम करण्यासाठी हा मंत्र उपयुक्त ठरेल, असं पंतप्रधान म्हणाले. ज्या गोष्टी आपण आत्मसात करतो आणि त्या गोष्टी आपल्या विचारप्रक्रियेचा भाग बनतात, त्या आपण कधीही विसरत नाही. त्यामुळे आपण गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.

 

“ (एखाद्या गोष्टीत)रस घ्या,आत्मसात करा, स्वतःला जोडून घ्या आणि दृश्य स्वरूपात त्याची कल्पना करा #PPC2021 pic.twitter.com/PeP9OBvksb

— पंतप्रधान कार्यालय (@PMOIndia) April 7, 2021

 

विद्यार्थ्यांनी शांत, तणावमुक्त मनाने परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. “तुमचे सगळे ताणतणाव तुम्ही परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवून द्यायला हवेत”, असे मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपली परीक्षेची तयारी किंवा इतर चिंतांचा विचार न करता,तणावमुक्त मनाने, उत्तम प्रकारे उत्तरे लिहिण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. 

“तुमचे सगळे ताणतणाव तुम्ही परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवून द्यायला हवेत”#PPC2021 pic.twitter.com/XjhtAuLzrh

— पंतप्रधान कार्यालय (@PMOIndia) April 7, 2021

 

महामारीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोना विषाणूने आपल्याला योग्य शारीरिक अंतर राखायला भाग पाडले पण त्याचबरोबर त्याने कुटुंबातील भावनिक बंध देखील दृढ केले. ते म्हणाले की या महामारीदरम्यान आपण खूप काही गमावले असेल पण जीवनातील चांगल्या गोष्टी आणि नातेसंबंधाच्या रुपात आपण खूप कमावले देखील आहे. कुणालाही किंवा कशालाही गृहीत न धरण्याचे महत्व आपल्याला समजले आहे. कोरोना काळाने आपल्याला कुटुंबाची खरी किंमत आणि मुलांचे आयुष्य घडविण्यात कुटुंबाची भूमिका दाखवून दिली आहे.

पंतप्रधान म्हणाले की जर मोठ्या माणसांनी मुलांचे आणि त्यांच्या  पिढीचे प्रश्न समजून घेतले तर पिढीतील अंतर ही गोष्टच नाहीशी होईल. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी कुटुंबातील मोठी माणसे आणि लहान मुले यांच्यात मोकळेपणा असण्याची गरज आहे. मोकळ्या मनाने मुलांशी वागले पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपण आपल्यात बदल घडवून आणण्याची तयारी दाखविली पाहिजे.

तुम्ही जे शिकता केवळ तेच जीवनातील तुमच्या यशाचे किंवा अपयशाचे एकमेव मोजमाप असू शकत नाही असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. तुम्ही आयुष्यात काय करता यावर तुमचे यश किंवा अपयश ठरते. म्हणून, मुलांनी आजूबाजूचे लोक, पालक आणि  समाज यांच्या दबावातून बाहेर पडले पाहिजे.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना ‘व्होकल फॉर लोकल’ अर्थात स्थानिक गोष्टींच्या प्रसारासाठी सुरु असलेल्या अभियानात त्यांचे योगदान देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळवून उत्तीर्ण व्हावे आणि भारताला आत्मनिर्भर करावे. विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील घटनांविषयी माहिती मिळवावी आणि त्याबद्दल लिखाण करून ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी’ सोहोळ्यात  सहभागी व्हावे अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी खालील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली:

एम.पल्लवी- सरकारी माध्यमिक विद्यालय, पोडीली, प्रकाशम,आंध्र प्रदेश; अर्पण पांडे- ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूल,मलेशिया; पुण्यो सून्य- विवेकानंद केंद्र विद्यालय,पपुंपारे, अरुणाचल प्रदेश; श्रीम.विनिता गर्ग (शिक्षिका) SRDAV सरकारी शाळा, दयानंद विहार,दिल्ली; नील अनंत के.एम.-श्री अब्राहम लिंगडम,विवेकानंद केंद्र विद्यालय मॅट्रीक,कन्याकुमारी, तामिळनाडू; आशय केकतपुरे(पालक)- बेंगळूरू, कर्नाटक; प्रवीण कुमार, पाटणा,बिहार; प्रतिभा गुप्ता (पालक) लुधियाना, पंजाब; तनय- परदेशी विद्यार्थी,सामिया इंडियन मॉडेल स्कूल,कुवेत; अश्रफ खान- मसुरी, उत्तराखंड; अमृता जैन, मुरादाबाद, उत्तर प्रदेश; सुनिता पॉल(पालक), रायपुर, छत्तीसगड; दिव्यांका,पुष्कर, राजस्थान; सुहान सेहगल,अल्कॉन इंटरनॅशनल, मयूर विहार, दिल्ली; धारवी बोपट- ग्लोबल मिशन इंटरनॅशनल स्कूल, अहमदाबाद; क्रिष्टी सैकिया- केंद्रीय विद्यालय IIT गुवाहाटी आणि श्रेयान रॉय, सेन्ट्रल मॉडेल स्कूल, बराकपूर,कोलकाता.

Jaydevi PS/SP/SC/RA/SC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710337) Visitor Counter : 226