आयुष मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) 2021 रोजी  पंतप्रधान योग पारितोषिके

Posted On: 31 MAR 2021 4:58PM by PIB Mumbai

 

भारत सरकारचे आयुष मंत्रालय (MoA), 9 नोव्हेंबर 2014 या त्याच्या स्थापनादिनापासूनच जगभरात योगाचा प्रसार आणि स्वीकार व्हावा या दृष्टीकोनातून सक्रियरित्या प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संपूर्ण जगाने केलेला स्वीकार  हे या मंत्रालयाच्या पुढाकाराने झालेल्या कामांपैकी एक नोंदवण्याजोगे काम. जगाला योगाचे फायदे कळावेत आणि योगाच्या माध्यमातून बहुसंख्यांनी आरोग्य व निरामयता प्राप्त करून घ्यावी हेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये म्हणजे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी (IDY) प्रत्येक आंतरराष्ट्रीय योग दिनी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अश्या दोन श्रेणीतील पारितोषिकांची योजना जाहीर केली होती. योगाचा प्रचार आणि विकास या माध्यमातून ज्या व्यक्तींनी वा संस्थांनी समाजाला शाश्वत योगदान दिले आहे अश्या  संस्थांना वा व्यक्तींना निवडून त्यांचा सत्कार करणे हे या पारितोषिकांमागील उद्दिष्ट

कोविड-19 ची परिस्थिती ध्यानात घेऊन 2020 या वर्षात पारितोषिकांसाठी अर्ज मागवले गेले नाहीत. तरीसुद्धा गेल्या वर्षीप्रमाणेच भारत सरकारचे आयुष मंत्रालय योगाच्या परिक्षेत्रात यश मिळवलेल्या पण ज्यांचे कार्य अजूनपर्यंत फारसे कोणाला माहित नाही, अश्या देशाच्या कानाकोपऱ्यातील व परदेशातील अनेक व्यक्ती वा संस्थांना पंतप्रधान योग पारितोषिकाने (PMYA)   गौरवणार आहे. पारितोषिक वितरण My Gov  या मंचावर होईल. यामध्ये राष्ट्रीय श्रेणीत दोन भारतीय  व आंतरराष्ट्रीय श्रेणीत भारतासह इतर देशपातळीवरील दोन पारितोषिकांचा समावेश असेल.  या पारितोषिकांसाठी अर्जदार/नामांकनप्राप्त असणाऱ्यांना योगक्षेत्रातील समृद्ध अनुभव आणि सखोल समज असणे आवश्यक आहे. अर्जदारामार्फत किंवा योगाच्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती वा संस्थेमार्फत नामांकनाच्या माध्यमातून संपूर्णपणे भरलेला अर्ज या पारितोषिकांसाठी विचारात घेतला जाईल. एका विशिष्ठ वर्षासाठी अर्जदार स्वतःच्या किंवा नामांकनाच्या माध्यमातून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय यापैकी फक्त एकाच श्रेणीसाठी विचारात घेतला जाईल.

या वर्षीची नामांकन प्रक्रिया 31/03/2021 पासून सुरू होईल, आणि 30/04/2021 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. निवड प्रक्रिया ही निश्चित स्वरूपाची असून त्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून दोन समित्या स्थापन केल्या आहेत.  पारितोषिकयोग्य व्यक्ती तसेच संस्था निश्चित करण्याकरता छाननी समिती व मुल्यमापन समिती अश्या दोन समित्या निवड आणि मुल्यमापन निकष ठरवतील.   https://innovateindia.mygov.in/pm-yoga-awards/  येथे PMYA  या पानावर जाऊन अर्जदार, नामांकन प्रक्रिया व भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी माहिती करून घेऊ शकतील.

21 जून 2021 म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिनाला विजेते जाहीर होतील आणि विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र तसेच रु. 25 लाखाचे रोख बक्षिस देऊन गौरवण्यात येईल. संयुक्त विजेत्यांना पारितोषिक विभागून दिले जाईल.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708715) Visitor Counter : 333