राष्ट्रपती कार्यालय

देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी औद्योगिक प्रगतीसह बलवान सामाजिक आणि आर्थिक रचनेची आवश्यकता आहे: राष्ट्रपती कोविंद


राष्ट्रपतींच्या हस्ते राउरकेला स्टील प्लँट येथील अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन

Posted On: 21 MAR 2021 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मार्च 2021
  

देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी औद्योगिक प्रगतीसह बलवान सामाजिक आणि आर्थिक रचनेची आवश्यकता आहे,असे भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे.राउरकेला स्टील प्लांट येथील अत्याधुनिक रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती  आज (दिनांक  21मार्च 2021) बोलत होते.

राष्ट्रपती म्हणाले, की राउरकेला येथील स्टील प्लांटने आपल्या देशाच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी बलवान सामाजिक आणि आर्थिक रचनेसह औद्योगिक प्रगतीची आवश्यकता आहे,यावर राष्ट्रपतींनी भर दिला. यासंदर्भात राउरकेला येथील स्टील प्लांट सजग असल्याचे त्यांनी नमूद केले. येथे केवळ  औद्योगिक घडामोडींपुरतेच नव्हे तर आरोग्यसेवा, शिक्षण, संस्कृती, क्रीडा या सर्वच क्षेत्रात  जाणीवपूर्वक  बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. 

राष्ट्रपतींनी नमूद केले की आतापर्यंत हा भाग अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांपासून वंचित होता. सुमारे सहा वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी इस्पात जनरल हॉस्पिटल  या अत्याधुनिक रुग्णालयाची  पायाभरणी  केली होती. आणि  आज ते रुग्णालय या विभागातील लोकांच्या सेवेसाठी सज्ज  झाले आहे. हे रुग्णालय केवळ ओदिशातीलच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेची गरज भागवू शकेल  एवढेच नव्हे तर झारखंड आणि  छत्तीसगडच्या आजुबाजूच्या भागातीलही   वैद्यकीय सेवेची गरज पूर्ण करेल, असेही त्यांनी सूचित केले. 

राष्ट्रपती म्हणाले, की कोविड-19 च्या महामारीने आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे दिले आहेत. त्यापैकी एक  धडा  असा  आहे, की एक राष्ट्र म्हणून आपण आपल्या वैद्यकीय व्यवस्था सुधारण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत आणि ते सर्वांना सहजतेने उपलब्ध झाले पाहिजेत.

कृपया राष्ट्रपतींचे भाषण इथे पहावे


* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1706482) Visitor Counter : 176