आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारत सरकारच्या टेलीमेडिसिन सेवेद्वारे 30 लाख रुग्णांना आरोग्यविषयक समस्यांवर सल्ला दिला


दूरस्थ पद्धतीने आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रतिदिन 35 हजारांहून जास्त रुग्ण ई-संजीवनी सुविधेचा वापर करत आहेत

Posted On: 17 MAR 2021 11:10AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 17 मार्च 2021

 

भारत सरकारच्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने 30 लाख रुग्णांना आरोग्यविषयक समस्यांवर सल्ले देऊन एक मोठा टप्पा गाठला आहे. सध्या ही राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा देशातील 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे आणि रोज देशभरातील 35,000 हून जास्त रुग्ण आरोग्यविषयक समस्यांवर सल्ला घेण्यासाठी ई-संजीवनी ह्या अभिनव डिजिटल माध्यमाचा उपयोग करून घेत आहेत.

आरोग्य आणि समाज कल्याण मंत्रालयाने सुरु केलेल्या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेमध्ये दोन प्रकारच्या ई-संजीवनी सुविधांचा समावेश आहे- पहिला हब आणि आरोग्य प्रवक्ते नमुन्यातील  डॉक्टर ते डॉक्टर (ई-संजीवनी AB-HWC) टेलीमेडिसिन मंच आणि दुसरा  नागरिकांना त्यांच्या घरात बसून बाह्यरुग्ण सेवा मिळण्यासाठीचा रुग्ण ते डॉक्टर (ई-संजीवनी OPD) टेलीमेडिसिन मंच.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांवर ई-संजीवनी AB-HWC सुविधा लागू करण्यात येत आहे आणि डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील 1,55,000 आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही सुविधा नोव्हेंबर 2019 मध्ये सुरु करण्यात आली आणि ई-संजीवनी AB-HWC सेवा उपलब्ध करून देणारे आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात पहिले राज्य ठरले आहे. ही सुविधा सुरु झाल्यापासून विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 1000 हून जास्त हब आणि 15,000 हून अधिक आरोग्य प्रवक्ते यांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. ई-संजीवनी AB-HWC सुविधेद्वारे सुमारे 9 लाख आरोग्य सल्ले देण्यात आले आहेत.

ई-संजीवनी OPD सुविधेद्वारे देशभरात सुमारे 250 ऑनलाईन बाह्यरुग्ण केंद्रांच्या उभारणीतून नागरिकांना डिजिटल स्वरुपात आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे. या ऑनलाईन बाह्यरुग्ण केंद्रांपैकी 220 केंद्रे विशेषज्ञ स्वरूपातील आहेत तर उर्वरित केंद्रे सामान्य बाह्यरुग्ण सेवा देणारी आहेत. देशात कोविड संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीदरम्यान जेव्हा सर्व बाह्यरुग्ण विभागांच्या सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या तेव्हा 13 एप्रिल 2020 ला ई-संजीवनी OPD सुविधा सुरु करण्यात आली. आतापर्यंत 21 लाख रुग्णांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर आरोग्य सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ई-संजीवनी सुविधा राबविणारी देशातील 10 प्रमुख राज्ये पुढीलप्रमाणे आहेत आणि त्या राज्यांमधील आरोग्य सल्ल्यांची संख्या कंसात दिली आहे- तामिळनाडू (6,42,708), उत्तर प्रदेश (6,31,019), कर्नाटक(6,07,305), आंध्रप्रदेश(2,16,860), मध्यप्रदेश(2,04,296), गुजरात(1,95,281), केरळ(93,317), महाराष्ट्र(84,742), उत्तराखंड(74,776) आणि हिमाचल प्रदेश (67,352) ही सुविधा स्वीकारणाऱ्या जिल्ह्यांचा विचार केला तर ई-संजीवनी सुविधा देशभरातील 600 जिल्ह्यांमधील नागरिकांनी वापरली आहे. देशपातळीवर 31 हजारांहून अधिक डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना या सुविधेच्या परीचालनासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून यापैकी सुमारे 14,000 डॉक्टर्स ई-संजीवनी OPD सुविधेसाठी काम करतात तर 17,000 हून अधिक डॉक्टर्स आणि सामाजिक आरोग्य अधिकारी ई-संजीवनी AB-HWC सेवा देण्यासाठी उपलब्ध असतात.

राज्य सरकारांशी चर्चा करून ई-संजीवनी सेवांमध्ये अधिकाधिक अभिनव आणि जास्त परिणामकारक सेवा देण्याच्या दृष्टीने  केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रयत्नशील असून डॉक्टर्स आणि रुग्ण यांना अधिक सक्षमतेने ही सुविधा वापरता यावी यासाठी ई-संजीवनीमध्ये नव्या आणि अधिक उपयुक्त सुविधा तसेच कार्यपद्धती समाविष्ट करण्यासाठी मोहालीच्या C-DAC केंद्रातील तज्ञ सतत काम करीत आहेत.

राज्यातील नागरिकांना घरच्याघरी कोविड-19 शी संबंधित सह्व्याधींसाठी ई-प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या सुविधेचा उपयोग व्हावा म्हणून  झारखंड राज्य सरकार एका विशेष ई-संजीवनी OPD सुविधेची स्थापना करणार आहे.

***

 

UU/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705423) Visitor Counter : 305