पंतप्रधान कार्यालय

‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’संबंधित उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते 12 मार्च रोजी उद्‌घाटन


पंतप्रधान साबरमती आश्रमातून पदयात्रेला रवाना करणार

भारत @75 अंतर्गत आयोजित विविध उपक्रमांचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन आणि साबरमती आश्रम इथे मेळाव्याला संबोधित करणार

Posted On: 11 MAR 2021 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12मार्च 2021 रोजी साबरमती आश्रम, अहमदाबाद येथे  झेंडा दाखवून  पदयात्रेला ( स्वातंत्र्य  यात्रा ) रवाना करणार आहेत.   स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाची   (भारत @75) रंगीत तालीम असलेल्या उपक्रमांचे  उदघाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. भारत @75 उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान विविध अन्य सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उदघाटन करणार आहेत. आणि ते साबरमती आश्रम येथे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. सकाळी 10:30  वाजता सुरू होणाऱ्या  या कार्यक्रमाला  गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) श्री प्रल्हादसिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित राहतील.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  कार्यक्रमांची  शृंखला आयोजित केली आहे. जन - सहकार्याच्या भावनेतून हा महोत्सव जन - उत्सव म्हणून साजरा केला जाईल.

या स्मृती महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांची धोरणे आणि नियोजन करण्याच्या अनुषंगाने  गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2022 च्या  75 आठवडे पूर्वी 12 मार्च 2021 पासून उपक्रम सुरु होतील.

पदयात्रा

पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरु होणारी  पदयात्रा अहमदाबादमधील साबरमती आश्रम ते नवसारीमधील दांडीपर्यंत 81 ठिकाणांहून  मार्गक्रमण करेल. 241 मैलांचा प्रवास करून  25 व्या दिवशी 5 एप्रिल रोजी  ही पदयात्रा समाप्त होईल.  दांडीकडे मार्गक्रमण करणाऱ्या या पदयात्रेत विविध जन समूह  सहभागी होतील. 75  किलोमीटर्सच्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री  श्री प्रल्हादसिंह पटेल  या पदयात्रेचे नेतृत्व करतील.

भारत @75 अंतर्गत उपक्रम

भारत @75 संकल्पनेअंतर्गत या कार्यक्रमात आयोजित  चित्रपट , संकेतस्थळ , गीते , आत्मनिर्भर चरखा आणि आत्मनिर्भर इन्क्युबेटर यांसारख्या उपक्रमांचे उद्‌घाटन होईल.

वरील उपक्रमांसोबतच देशाप्रति असलेली  दुर्दम्य भावना जागृत करणारा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.संगीत ,नृत्य,पठण, उद्देशिकेचे वाचन(देशातील वेगवेगळ्या प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारी प्रत्येक ओळ वेगवेगळ्या भाषेत) याचा समावेश असेल.या कार्यक्रमात युवा शक्तीचे दर्शन घडविणारे, 75 गायक आणि 75 नर्तक सहभागी होतील.

देशभरात 12 मार्च 2021 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामधील सरकारांनीही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमांव्यतिरिक्त ,संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि विभागीय सांस्कृतिक केंद्र , युवक कल्याण मंत्रालय आणि ट्रायफेड म्हणजेच आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाच्यावतीने यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

 

 

 

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704173) Visitor Counter : 292