पंतप्रधान कार्यालय
“आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यासाठीच्या राष्ट्रीय समितीला पंतप्रधानांनी केले संबोधित
स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी 5 स्तंभ सूचीबद्ध
सनातन भारताचे वैभव आणि आधुनिक भारताची चमक या उत्सवांमधून दिसावी : पंतप्रधान
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या केंद्रस्थानी 130 कोटी भारतीयांचा सहभाग - पंतप्रधान
Posted On:
08 MAR 2021 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2021
"आझादी का अमृत महोत्सव" अर्थात स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समितीची पहिली बैठक आज पार पडली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पॅनेलला संबोधित केले. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राजकीय नेते, वैज्ञानिक, अधिकारी, माध्यम क्षेत्रातील व्यक्ती, आध्यात्मिक नेते, कलाकार आणि चित्रपट अभिनेते, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसह राष्ट्रीय समितीच्या विविध सदस्यांनी या बैठकीत भाग घेतला.
बैठकीत मते आणि सूचना मांडणाऱ्या राष्ट्रीय समितीच्या सदस्यांमध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, नवीन पटनायक, मल्लिकार्जुन खरगे, मीरा कुमार, सुमित्रा महाजन, जे पी नड्डा आणि मौलाना वहीदुद्दीन खान यांचा समावेश होता. समितीच्या सदस्यांनी आझादी का अमृत महोत्सवाच्या नियोजन व आयोजनासाठी पंतप्रधानांचे आभार मानले.
महोत्सवाची व्याप्ती आणखी वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या सूचना व मते मांडली. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पुढील काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या आणखी बैठका होतील आणि आज मिळालेल्या सूचना व मतांवर विचार केला जाईल.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा उत्सव भव्य प्रमाणात उत्साहाने साजरा करताना ऐतिहासिक स्वरूप, वैभव आणि या प्रसंगाचे महत्त्व अबाधित राखले जाईल. समितीच्या सदस्यांकडून मिळालेल्या नवीन कल्पना आणि विविध विचारांचे त्यांनी कौतुक केले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा महोत्सव त्यांनी जनतेसाठी समर्पित केला.
पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा उत्सव हा एक असा उत्सव असावा, ज्यामध्ये स्वातंत्र्यलढ्याची भावना, हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि भारत घडवण्याच्या त्यांच्या संकल्पांचा अनुभव घेता येऊ शकेल. या महोत्सवात सनातन भारताच्या वैभवाची आणि आधुनिक भारताची चमकदेखील मूर्त स्वरुपात असायला हवी. ते म्हणाले की या महोत्सवात ऋषींच्या अध्यात्माचा प्रकाश आणि आपल्या शास्त्रज्ञांची प्रतिभा आणि सामर्थ्य देखील प्रतिबिंबित व्हायला हवे. ते म्हणाले की हा कार्यक्रम आपल्या 75 वर्षातील कर्तृत्वाचे जगाला दर्शन घडवेल आणि आपल्याला पुढील 25 वर्षांसाठी संकल्पांची एक चौकट देईल.
पंतप्रधान म्हणाले की कोणताही संकल्प साजरा केल्याशिवाय यशस्वी होत नाही. ते म्हणाले की जेव्हा संकल्प उत्सवाचे रूप घेतो, तेव्हा लाखो लोकांचे संकल्प आणि ऊर्जा यांची साथ त्याला मिळते. पंतप्रधान म्हणाले की 130 कोटी भारतीयांच्या सहभागाने 75 वर्ष साजरी केली जातील आणि हा लोकसहभाग या उत्सवाच्या केंद्रस्थानी असेल. या सहभागामध्ये 130 कोटी देशवासियांच्या भावना, सूचना आणि स्वप्नांचा समावेश आहे.
75 वर्ष साजरी करण्यासाठी 5 स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. स्वातंत्र्य लढा, 75 वर्षांच्या कल्पना, 75 वर्षातील कामगिरी, 75 वर्षातील विविध कामे आणि 75 संकल्प हे ते स्तंभ आहेत. या सर्वांमध्ये 130 कोटी भारतीयांच्या कल्पना व भावनांचा समावेश असावा.
कमी ज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आणि सन्मान करण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की देशाचा प्रत्येक कानाकोपरा देशाच्या मुला-मुलींच्या बलिदानाने परिपूर्ण आहे आणि त्यांच्या गाथा देशासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरणार आहेत. ते म्हणाले की आपल्याला प्रत्येक विभागाचे योगदान डोळ्यासमोर आणावे लागेल. असे अनेक लोक आहेत जे पिढ्यान पिढ्या देशासाठी भरीव काम करत आहेत, त्यांचे योगदान, विचार आणि कल्पना यांना राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे.
पंतप्रधान म्हणाले की, हा ऐतिहासिक उत्सव स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नांच्या पूर्ततेबद्दल आहे, त्यांना अपेक्षित असलेल्या उंचीवर भारताला घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. काही वर्षापूर्वी कल्पना देखील करू शकलो नसतो अशा गोष्टी देश साध्य करत आहे. हा उत्सव भारताच्या ऐतिहासिक वैभवाला साजेसा व्हायला हवा, असे ते म्हणाले.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703305)
Visitor Counter : 316
Read this release in:
Bengali
,
Assamese
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil