आदिवासी विकास मंत्रालय

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या सहकार्याने ट्रायफेड, आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या वतीने दोन दिवसीय जीआय(भौगोलिक संरक्षणयुक्त उत्पादने)महोत्सवाचे आयोजन

Posted On: 02 MAR 2021 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

 

पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या स्वप्नाच्या अनुषंगाने आदिवासी कल्याण  मंत्रालयाअंतर्गत  आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड (ट्रायफेड), मसुरीच्या लाल बहादूर राष्ट्रीय प्रशासन अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने 4 आणि 5 मार्च 2021 रोजी "जीआय महोत्सव" आयोजित करत आहे. निवडक जीआय उत्पादनांचे 40  हून अधिक अधिकृत विक्रेते आणि आदिवासी कारागीर यात  सहभागी होतील  आणि आपल्या वस्तू  प्रदर्शित करतील.  लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीच्या (एलबीएसएनएए)  प्रांगणात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

आयएएस अर्थात भारतीय प्रशासन सेवा प्रशिक्षणार्थींमध्ये या उत्पादनांबाबत जागरूकता  वाढवण्यासाठी आणि त्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल संवेदनशील बनवण्यासाठी  देशभरातील  विविध जीआय उत्पादनांचे प्रदर्शन भरवण्यात येत असून  त्यामुळे त्यांना आपापल्या क्षेत्रातील जीआय उत्पादनांच्या हिताचे रक्षण करणारी धोरणे आखता येतील  हे या   जीआय महोत्सवाचे उद्दिष्ट  आहे .

हा कार्यक्रम एक व्यासपीठ असेल जिथे अधिकारी प्रशिक्षणार्थी या अधिकृत उत्पादक आणि कारागीरांशी संवाद साधू शकतील आणि वेगवेगळ्या प्रदेशात उत्पादन, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विपणन योजना विकसित करण्यात मदत करतील.

5 मार्च, 2021 रोजी, एलबीएसएनएए मध्ये  ट्राईब्स  इंडिया दुकानाचे उद्घाटन केले जाईल जे जीआय उत्पादनांचे विपणन करतील आणि आदिवासी हस्तकलेच्या वस्तूना प्रोत्साहन देतील. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे  5 मार्च रोजी पोचमपल्ली इथल्या विणकरांच्या पारंपारिक भौमितिक इक्कत या शैलीत बनवलेल्या ट्रायफेड जॅकेट्सचा शुभारंभ केला जाईल.

हस्तशिल्प, हातमाग यासारख्या देशी उत्पादनांचा समृद्ध वारसा भारताकडे आहे. या संदर्भात भौगोलिक ओळख  किंवा जीआय टॅगिंगला आणखी बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादित विशिष्ट उत्पादनांसाठी भौगोलिक चिन्ह  नोंदवणे आणि त्यासाठी संरक्षण मिळविणे हे उत्पादकांना आणि कारागीरांना प्रोत्साहन  देते आणि त्यांचा व्यवसाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी प्रोत्साहित करते.

जीआय टॅग करता येतील अशा अन्य उत्पादनांचा  शोध घेण्याचे कार्य ट्रायफेड सातत्याने करत असते  आणि अशा सुमारे 54 उत्पादनांची नव्याने  निवड केली आहे .

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701978) Visitor Counter : 151