आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या पुढील टप्प्यासाठी www.cowin.gov.in येथे कोविन 2.0 पोर्टलवर 1 मार्च 2021 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार
आयुष्मान भारत पीएमजेएवाय अंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट 10,000 पेक्षा जास्त खाजगी रुग्णालये, सीजीएचएस अंतर्गत 600 पेक्षा जास्त रुग्णालये आणि राज्यांच्या योजनांतर्गत पॅनेलमधील इतर रुग्णालये कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रे म्हणून काम करू शकतील.
सर्व सरकारी आरोग्य केंद्रांवर मोफत लसीकरणाची सुविधा
Posted On:
28 FEB 2021 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2021
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा वयोमानानुसार लोकसंख्येचे लसीकरण करण्याचा पुढील टप्पा 1 मार्च 2021 पासून( उद्यापासून) सुरू होत आहे. या लसीकरणासाठी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया (www.cowin.gov.in वर) सुरू होईल. कोविन 2.0 पोर्टलवर किंवा आरोग्य सेतू इत्यादीसारख्या इतर माहिती तंत्रज्ञान ऍप्लिकेशन्सवर नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल आणि कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी लसीकरणासाठी भेट( अपॉईंटमेंट) निर्धारित करता येईल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण(एनएचए) यांनी आयुष्मान भारत पीएमजेएवाय अंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट 10,000 पेक्षा जास्त खाजगी रुग्णालये, सीजीएचएस अंतर्गत 600 पेक्षा जास्त रुग्णालये आणि राज्य सरकारांच्या आरोग्य विमा योजनांतर्गत पॅनेलमधील इतर रुग्णालयांसाठी कोविन 2.0 संदर्भात आयोजित केलेल्या ओरिएन्टेशन कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. कोविन 2.0 या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या नव्या वैशिष्ट्यांबाबत यावेळी सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.
पॅनेलमध्ये समाविष्ट केलेल्या खाजगी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांना देखील लसीकरण प्रक्रियेशी संबंधित विविध पैलूंसंदर्भात आणि एईएफआय अर्थात रोगप्रतिकारक्षमता वृद्धीकारक उपाययोजनांनतर विपरित परिणाम झाल्यास त्यांच्या हाताळणी संदर्भात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या पाठबळाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आले आहे .
ज्या नागरिकांचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल ते नागरिक नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत, अशी माहिती या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना देण्यात आली. त्याशिवाय 1 जानेवारी 2022 रोजी ज्या नागरिकांचे वय 45 वर्षे ते 59 वर्षे आहे किंवा ते 45 वर्षांचे होणार आहेत आणि त्यांना सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या 20 पैकी कोणत्याही सहव्याधी आहेत, ते देखील लसीकरण नोंदणीसाठी पात्र आहेत.
लसीची प्रत्येक मात्रा घेण्यासाठी लाभार्थ्याला केवळ एकदा प्रत्यक्ष भेटीची वेळ दिली जाणार आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर जी सत्रे खुली करण्यात आली त्या सत्रांमध्ये भेटीची वेळ दुपारी तीन वाजता बंद होणार आहे. मात्र, एक मार्च रोजी पुढील तारखांना उपलब्ध असलेल्या सत्रांसाठी भेटीची वेळ नोंदवता येईल. लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी त्याच लसीकरण केंद्रावर पहिली मात्रा घेण्यासाठी भेटीची वेळ ज्या दिवशी घेतली आहे त्या दिवसापासून 29व्या दिवशी भेटीची वेळ नोंदवता येईल. जर एखाद्या लाभार्थ्याने लसीच्या पहिल्या मात्रेसाठी घेतलेली भेटीची वेळ रद्द केली तर त्याच्या दोन्ही मात्रांसाठीच्या भेटी रद्द होतील.
पात्र व्यक्तींना कोविन 2.0 पोर्टलवर त्यांच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेद्वारे नोंदणी करता येईल. एका व्यक्तीला जास्तीत जास्त चार लाभार्थ्यांची नोंदणी करता येईल. मात्र, ज्या एका मोबाईल क्रमांकावर ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांच्यात मोबाईल क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबी सामाईक असणार नाहीत. अशा सर्व लाभार्थ्यांचा फोटो आयडी क्रमांक वेगळा असलाच पाहिजे. ऑनलाईन नोंदणीसाठी खालीलपैकी कोणत्याही फोटो आयडी कागदपत्रांचा वापर करता येऊ शकेल.
- आधार कार्ड/ पत्र
- निवडणूक ओळखपत्र (EPIC)
- पासपोर्ट
- वाहनचालक परवाना
- पॅन कार्ड
- एनपीआर स्मार्ट कार्ड
- छायाचित्रासहित पेन्शन कागदपत्र
लसीकरणासाठी नागरिकांची नोंदणी व नियोजित वेळ ठरवणे यासाठीच्या मार्गदर्शक सूचनापत्रक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/UserManualCitizenRegistration&AppointmentforVaccination.pdf
सर्व खाजगी रुग्णालयांची यादी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आहे, ती खालील संकेतस्थळांवर पाहता येईल.
a) https://www.mohfw.gov.in/pdf/CGHSEmphospitals.xlsx
b) https://www.mohfw.gov.in/pdf/PMJAYPRIVATEHOSPITALSCONSOLIDATED.xlsx
केंद्रसरकार सर्व लसी ताब्यात घेऊन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांचा विनामूल्य पुरवठा करेल, मग राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारी व खाजगी कोविड लसीकरण केंद्रांना त्या लसी पुरवतील. सरकारी आरोग्य केंद्रातून लाभार्थ्यांना सर्व लसी विनामूल्य पुरवल्या जातील याचा पुनरुच्चार करत खाजगी सुविधांमधून एका डोसमागे माणशी 250 रुपयांहून (रु 150/- लसीसाठी आणि रु 100/- लसीकरण मूल्य) जास्त मूल्य आकारता येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयांना त्यांना पुरवण्यात आलेल्या एकूण लसींच्या मात्रांचे मूल्य राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या खात्यात भरावे लागतील. यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर पेमेंट गेटवे देण्यात येईल.
भारत सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य कर्मचारी (HCWs) तसेच आघाडीवरील कर्मचाऱ्यांरी(FLWs) यांना देण्यासाठी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन कोविड-19 लसी विनामुल्य पुरवल्या आहेत, आणि आता प्राधान्यक्रमातील पुढील गटाच्या लसीकरणासाठी ही लस पुरवली जाईल. हा गट म्हणजे 60 वर्षांवरील वयोगट आणि 45 ते 59 या वयोगटातील आधीपासून सहव्याधी असणाऱ्यांचा गट असेल.
कोविड लसीकरण केंद्रे (CVCs) (सरकारी तसेच पॅनेलवर असलेली खाजगी सुविधा केंद्रे) यांना लसीकरण केंद्रांपर्यंत लसींचा सुरळित पुरवठा व्हावा म्हणून ही केंद्रे व त्यांच्या नजिकची लस साठवण शीतगृहे केंद्रामध्ये दुवा प्रस्थापित करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.
विशिष्ठ सहव्याधींची यादी
लसीकरणासाठी 45 ते 59 वयोगटातील नागरीकांचे निकष ठरवण्यासाठी
- गेल्या वर्षभरात हृद्यविकाराचा धक्का आलेला असणे आणि रुग्णालयात दाखल होणे.
- पोस्ट कार्डियाक ट्रान्सप्लॅन्ट / लेफ्ट वैन्ट्रिक्युलर असिस्ट डिवाईस (LVAD)
- सिग्निफिकन्ट लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर सिस्टॉलिक डिस्फक्शन (LVEF <40%)
- हृद्याच्या झडपेशी संबधित सर्वसाधारण वा गंभीर आजार
- जन्मतः हृद्यय विकार असलेले गंभीर PAH किंवा कारण माहिती नसलेले PAH
- बायपास/अजियोप्लास्टी/मायोकार्डियल इन्फ्राक्शन केलेले हृदयाच्या वाहिनीशी संबधीत आजार असलेले व उपचाराधीन रक्तदाव वा मधुमेह
- उपचार सुरू असलेला अंजायना आणि रक्तदाब/ मधुमेह
- CT/MRI काढून नोंदवलेला स्ट्रोक आणि उपचार सुरू असलेला रक्तदाब/मधुमेह
- पल्मनरी आर्टरी उच्च रकतदाब व उपचाराखालील उच्च रक्तदाब/मधुमेह
- मधुमेह (> 10 वर्षे तसेच गुंतागुंतीचा मधुमेह) आणि उच्च रक्तदाब उपचार सुरू असलेला
- मूत्रपिंड/यकृत/हिमॅटोपोयटिक स्टेम सेल रोपण झालेले / त्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले
- शेवटच्या स्टेजमधील मूत्रपिंड विकार हिमीओडायलिसिस/ CAPD
- भरपूर काळ ओरल कॉर्टीकोस्टीरॉईड्सचे सेवन/ इम्युनोसप्रेसंट औषधोपचार
- डिकॉम्पेन्सेटेड सिऱ्हॉसिस
- गंभीर श्वसनमार्गाचे आजार आणि त्यासाठी गेल्या दोन वर्षापासून रुग्णालयात उपचाराधीन/ FEV1 <50%
- लिंफोमा/ल्युकेमिया/मायलोमा
- कोणताही गंभीर कर्करोग 1 जुलै 2020 ला व नंतर निदान झालेले वा आता उपचाराधीन कर्करोग रुग्ण
- सिकल सेल आजार/ बोन मॅरो फेल्युअर/ अप्लॅस्टिक अनिमिया/ थॅलसेमिया मेजर
- प्रायमरी इम्युनोडेफिशिअन्सि/ एचआयव्ही संसर्ग
- मानसिक वा बौद्धिक विकलांगता/ स्नायूंशी संबधीत विकलांगता आजार/ श्वसनमार्गात पोचलेला अॅसिड हल्ला/ सहकार्य आणि मदतीची गरज असणाऱ्या विकलांग व्यक्ती/ बहिरेपणा, अंधत्व अश्या अनेकस्वरूपी विकलांगता
* * *
Jaydevi PS/S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701577)