पंतप्रधान कार्यालय
दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधानांनी संबोधित केले
अलीकडील राष्ट्रीय शिक्षण धोरणात खेळांना सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे- पंतप्रधान
युवा खेळाडूंनी ते आत्मनिर्भर भारताचे ब्रँड अॅम्बॅसेडर असल्याची जाणीव ठेवावी असा पंतप्रधानांचा आग्रह
Posted On:
26 FEB 2021 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आजपासून सुरू होत आहेत, असे त्यांनी सांगितले. हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा ठसा उमटवण्यासाठी जम्मू काश्मीरला प्रमुख केंद्र बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या आणि देशभरातील सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये विविध राज्यांमधून येणाऱ्या खेळाडूंची संख्या आता दुप्पट झाली आहे, यातून या स्पर्धांविषयी वाढत चाललेला उत्साह दिसून येत आहे, असे ते म्हणाले. या क्रीडा स्पर्धांमधून मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी होईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या या हिवाळी स्पर्धांमुळे एक नवी क्रीडा व्यवस्था विकसित व्हायला मदत होईल, असे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये या क्रीडास्पर्धांमुळे एक नवी भावना आणि उत्साह निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्रीडा क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये विविध देश त्यांच्या सुप्त उर्जेचे दर्शन घडवतात, असे पंतप्रधान म्हणाले. क्रीडा क्षेत्राला वैश्विक आयाम आहेत आणि हाच दृष्टीकोन समोर ठेवून अलीकडेच क्रीडा क्षेत्रात विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. खेलो इंडिया अभियानापासून ते ऑलिम्पिक पोडियम स्टेडियमपर्यंत एक समग्र दृष्टीकोन राखला असल्याचे त्यांनी नमूद केले. तळागाळाच्या स्तरात असलेल्या गुणवत्तेला हेरून त्या खेळाडूंना सर्वोच्च जागतिक स्तरापर्यंत नेण्याचे काम करत व्यावसायिक क्रीडापटूंना पाठबळ दिले जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. गुणवत्तेला हेरण्यापासून ते संघाची निवड करेपर्यंत पारदर्शकता राखण्याला सरकार प्राधान्य देत आहे, असे त्यांनी सांगितले. अलीकडेच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात क्रीडा क्षेत्राला सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. एकेकाळी एक अवांतर उपक्रम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या खेळांना आता आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग बनवण्यात आले आहे आणि बालकांच्या शिक्षणामध्ये खेळांमधील श्रेणीची गणना करण्यात येणार आहे. खेळांसाठी आता उच्च शिक्षण आणि क्रीडा विद्यापीठांची स्थापना करण्यात येत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. शालेय स्तरावर क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापनाचा समावेश करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. यामुळे युवकांच्या करियरविषयक पर्यायांमध्ये वाढ होईल आणि क्रीडा अर्थव्यवस्थेमध्ये भारताची उपस्थिती ठळकपणे दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. आपण आत्मनिर्भर भारताचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत याची जाणीव तरुण खेळाडूंनी ठेवावी, असे पंतप्रधानांनी आग्रहाने सांगितले. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे जग भारताचे मूल्यमापन करत आहे, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
S.Thakur/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701083)
Visitor Counter : 279
Read this release in:
Urdu
,
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Manipuri
,
Odia
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam