PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 24 FEB 2021 7:42PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 24 फेब्रुवारी 2021

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

देशात वाढत असलेल्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण पाहता, निरोगी जीवनशैली अंगिकारणे आणि बैठ्या पद्धतीने कामाची सवय आणि जंक फूड टाळण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी नागरिकांना, प्राधान्याने युवकांना केले. हैद्राबाद येथील डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स केंद्राला भेट दिल्यानंतर तेथील शास्त्रज्ञांना संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 61 टक्के मृत्यू हे हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यासारखे असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे आहेत, असे दर्शविले होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 व्यवस्थापन : अनुभव, उत्तम पद्धती आणि पुढची वाटचालयावरच्या कार्यशाळेला संबोधित केले. भारतातले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारी यांच्यासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, पाकिस्तान, सेशल्स, श्रीलंका या दहा शेजारी राष्ट्रामधले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारीही कार्यशाळेला उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील  वेबिनारला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. वेबिनारला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की यावर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद अभूतपूर्व आहे आणि प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याप्रति सरकारची वचनबद्धता यातून दिसून येते. महामारीमुळे गेल्या वर्षात किती कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती होती याची मोदी यांनी आठवण करून दिली आणि या आव्हानांवर मात करून अनेकांचे जीव वाचवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या कामगिरीचे श्रेय त्यांनी सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांना दिले. भारताने काही महिन्यांतच 2500 प्रयोगशाळांचे जाळे कसे उभारले आणि केवळ डझनभर चाचण्यांपासून सुरुवात करत 21 कोटी चाचण्यांचा मैलाचा दगड कसा गाठला याचेही  पंतप्रधानांनी स्मरण करून दिले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारताने सक्रिय रुग्णसंख्या 1.50 लाखांखाली ठेवण्यात यश मिळवले आहे.देशातील सक्रिय रुग्णसंख्या आज  1,46,907 इतकी आहे. सध्याची सक्रिय रुग्णसंख्या भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.33 टक्के इतकी आहे. गेल्या 24 तासांत 13,742 इतक्या नवीन रुग्णांची  नोंद झाली असून 14,037 रुग्ण बरे झाले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्येत  399  इतकी निव्वळ  घट झाली आहे. खाली दिलेल्या तक्त्यात गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत झालेला बदल दाखवला  आहे.  महाराष्ट्रात 298 रुग्णांची  भर पडली आहे, तर केरळमध्ये 803 रुग्णांची घट झाली आहे. गेल्या एका आठवड्यात 12 राज्यांमध्ये दररोज सरासरी  100 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. महाराष्ट्र त्यापैकी एक आहे. आज 24 फेब्रुवारी,2021 रोजीसकाळी 7  वाजेपर्यंत एकूण 2,54,356 सत्रांद्वारे एकूण 1,21,65,598 लाभार्थ्यांचे  लसीकरण झाल्याचा अंदाज आहे.   यामध्ये  64,98,300 एचसीडब्ल्यू (1 ला डोस), 13,98,400 एचसीडब्ल्यू (2 रा डोस) आणि 42,68,898 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) समाविष्ट आहे. आज भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,07,26,702 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज  97.25 टक्के आहे. बरे झालेले एकूण रुग्ण  आणि सक्रिय रूग्णामधील अंतर सतत वाढत आहे आणि आज ते 1,05,79,795 इतके  आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

इतर अपडेट्स:

  • केंद्र सरकारने कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनासाठी तसेच महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये मदत म्हणून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये  उच्चस्तरीय बहु-शाखीय पथके तैनात केली आहेत. तीन-सदस्यांच्या बहु-शाखीय  पथकांचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव स्तरीय अधिकारी करत आहेत. ही पथके राज्ये / केंद्रशासित प्रदेश प्रशासनाबरोबर समन्वयाने काम करतील आणि कोविड-19  प्रकरणांमध्ये अलिकडे होत असलेल्या वाढीची कारणे शोधतील. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक कोविड  नियंत्रण उपायांसाठी ते राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य प्रशासनाशी समन्वय साधतील. कोविड व्यवस्थापनात आतापर्यंत झालेली प्रगती कायम राहील हे सुनिश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा नियमितपणे गंभीर आढावा घेण्याची सूचना राज्ये / केंद्र शासित प्रदेशांना करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

  • भारताने 22 फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणीत नवा विक्रम केला आहे. या दिवशी देशभरातील चाचण्यांच्या संख्येने 21.15 कोटींचा (21,15,51,746) टप्पा ओलांडला. देशातील चाचण्यांच्या प्रयोगशाळा आणि इतर साधनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चाचण्यांची संख्या वाढवण्यात या प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका आहे. या प्रयोगशाळांमुळे देशाची चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र अपडेट्स

मुंबई महानगर क्षेत्रातील पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेतला.  वनमंत्र्यांनी ज्या ठिकाणी पूजा केली त्या धार्मिक स्थळावर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होणाऱ्या मेळाव्याचे आयोजन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्हा प्रशासनाला दिले. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, डब्ल्यूएचओ, आयएमए आणि यासारख्या इतर सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल टॅब्लेटची विक्री महाराष्ट्रात करू दिली जाणार नाही. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी दररोज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत राहील. जालना जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, कोचिंग वर्ग आणि निवासी शाळा बंद राहतील. औरंगाबादमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी असेल. सातारा जिल्ह्यातील दहीवाडी गाव व परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

 

JPS/ST/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700560) Visitor Counter : 176


Read this release in: English , Hindi , Manipuri , Bengali