मंत्रिमंडळ

आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 24 FEB 2021 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मंजुरी दिली आहे. आयटी हार्डवेअरच्या मूल्य साखळीत  मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रस्तावित योजनेंतर्गत यामध्ये लॅपटॉप, टॅब्लेट्स , ऑल इन वन संगणक आणि सर्व्हर्सचा समावेश आहे.

ही योजना भारतात उत्पादित आणि लक्ष्य निर्धारित क्षेत्रांतर्गत असलेल्या वस्तूंच्या निव्वळ वाढीव विक्रीवर पात्र कंपन्यांना चार वर्षांसाठी 4 टक्के ते 2% / 1% प्रोत्साहन देईल,

लॅपटॉप्स, टॅब्लेट्स, संगणक आणि सर्व्हर्ससह आयटी हार्डवेअरचे उत्पादन करणाऱ्या 5 प्रमुख जागतिक कंपन्या आणि 10 देशांतर्गत कंपन्यांना  या योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत उत्पादनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे कारण सध्या या वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात आपण आयातीवर अवलंबून आहोत .

आर्थिक परिणाम:

प्रस्तावित योजनेची एकूण किंमत  4 वर्षांसाठी अंदाजे 7,350 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 7,325 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर खर्च आणि 25 कोटी रुपये प्रशासकीय शुल्काचा समावेश आहे.

लाभ :

या योजनेमुळे देशातील इलेक्ट्रॉनिक्स सामग्रीशी संबंधित क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळेल. जागतिक मूल्य साखळीबरोबर एकत्रीकरणामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि  मॅन्युफॅक्चरिंग (ईएसडीएम)साठी  आणि आयटी  हार्डवेअरच्या निर्यातीसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताची ओळख निर्माण होईल.

या योजनेत चार वर्षांत 1,80,000 (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) रोजगार निर्मितीची क्षमता  आहे.

आयटी हार्डवेअरसाठी देशांतर्गत मूल्यवर्धनाला ही योजना प्रोत्साहन देईल जे  2025 पर्यंत 20% - 25% पर्यंत वाढेल.

पार्श्वभूमी:

सध्या भारतात लॅपटॉप आणि टॅबलेटची मागणी मोठ्या प्रमाणात आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते आणि 2019-20 मध्ये त्यासाठी  अनुक्रमे 4.21 अब्ज डॉलर्स आणि  0.41 अब्ज डॉलर्स इतका आयात खर्च करावा लागला. आयटी हार्डवेअरच्या बाजारावर जागतिक स्तरावरील  6-7  कंपन्यांचे वर्चस्व आहे जे जागतिक बाजारातील भागीदारीच्या जवळपास 70% आहे. सध्याची जागतिक स्थिती पाहता उत्पादन क्षेत्र एका मोठ्या परिवर्तनाला सामोरे जात आहे.  जगातील उत्पादन  कंपन्या एकाच बाजारावर अवलंबून राहण्याची जोखीम कमी करण्यासाठी उत्पादनाच्या ठिकाणांमध्ये विविधता आणण्याचा विचार करत आहेत.

 

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1700469) Visitor Counter : 283