पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगाल मध्ये आयआयटी खरगपूरच्या 66 व्या पदवीदान समारंभात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 23 FEB 2021 10:39PM by PIB Mumbai

 

नमस्कार,

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रमेश पोखरियाल निशंकसंजय धोत्रे,  IIT खरगपूरचे अध्यक्ष संजीव गोयंका, संचालक व्ही. के तिवारी, अन्य अध्यापक सदस्य, सर्व कर्मचारी मित्र, पालक आणि माझ्या युवा मित्रानो!!  आजचा दिवस IIT खरगपुरच्या त्या विद्यार्थ्यांसाठीच महत्वाचा नाही ज्यांना पदवी मिळणार आहे. आजचा दिवस नवभारताच्या निर्मितीसाठी देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. तुम्हा सर्वांशी केवळ तुमचे पालक आणि तुमचे प्राध्यापक यांच्याच आशा निगडित नाहीत तर 130  कोटी भारतवासियांच्या आकांक्षांचे देखील तुम्ही प्रतिनिधी आहात. म्हणूनच या संस्थेतून देशाला  21 व्या शतकातील आत्मनिर्भर भारतात बनणाऱ्या नव्या परिसंस्थेसाठी नव्या नेतृत्वाची देखील आशा आहे. नवी परिसंस्था आपल्या स्टार्टअप्सच्या जगासाठी,   आपल्या नवसंशोधन जगतासाठी, आपल्या कॉर्पोरेट जगासाठी आणि देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी, या कॅम्पसमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला केवळ तुमचे नवे आयुष्य सुरु करायचे नाही तर तुम्हाला देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन आणणारे स्वतः  एक स्टार्ट अप देखील बनायचे आहे. म्हणूनच ही जी पदवी, हे मेडल तुमच्या हातात आहे, ते एक प्रकारे कोट्यवधी आशांचे आकांक्षा पत्र आहे, जे तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तुम्ही वर्तमानावर नजर ठेवून भविष्याचाही विचार करावा. आपल्या आजच्या गरज काय आहेत आणि  10 वर्षानंतर गरजा काय असतील, त्यादृष्टीने आज काम केले तर उद्याची नवसंशोधने भारत आज बनवेल.

 

मित्रहो,

इंजीनियर म्हणून  एक क्षमता तुमच्यात  सहजपणे विकसित होते  आणि ती म्हणजे पॅटर्नकडून पेटंट कडे नेण्याची  क्षमता ही आहे. म्हणजे एक प्रकारे तुमच्यात एखाद्या विषयाकडे अधिक विस्तृतपणे पाहण्याची , एका नव्या दूरदृष्टीची एक क्षमता असते. म्हणून आज आपल्या आजूबाजूला माहितीचे जे भांडार आहे  त्यात समस्या आणि त्यांचा पॅटर्न तुम्ही अधिक बारकाईने पाहू शकता. प्रत्येक समस्येशी पॅटर्न जोडलेला असतो. समस्यांचे पॅटर्न समजून घेऊन त्यावर काम केले तर त्या दीर्घकालीन उपायांच्या दिशेने घेऊन जातात. ही जाणीव भविष्यात नवीन शोध आणि नवीन संशोधनाचा आधार बनते. तुम्ही विचार करा, तुम्ही किती  लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकता , जीव वाचवू शकता देशाच्या  संसाधनांची बचत करू शकता, तुम्ही पॅटर्न समजून घ्या आणि त्यावर तोडगा काढा. आणि हे देखील शक्य आहे की  भविष्यात हेच उपाय तुम्हाला व्यावसायिक यश देखील मिळवून देतील.

 

मित्रहो,

आयुष्याच्या ज्या मार्गावर आता तुम्ही पुढे जाणार आहात त्यात निश्चितपणे तुमच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतील . हा मार्ग बरोबर आहे की चूक आहेनुकसान तर नाही ना होणार , वेळ वाया तर नाही ना जाणार ? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात डोक्यात येत राहतील. या प्रश्नांचे उत्तर आहे - Self Three, मी सेल्फी म्हणत नाही आहे , सेल्फ थ्री म्हणजे स्वयं -जागरूकता , आत्मविश्वास आणि जी सर्वात मोठी ताकद आहे ती आहे निःस्वार्थीपणा . तुम्ही तुमचे सामर्थ्य ओळखून पुढे जा , पूर्ण आत्मविश्वासाने पुढे चला, आणि निःस्वार्थ भावनेने पुढे मार्गक्रमण करा. आपल्याकडे म्हटले आहे -  शनैः पन्थाः शनैः कन्था शनैः पर्वतलंघनम । शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चतानि शनैः शनैः ॥ म्हणजे जेव्हा रस्ता लांबचा असेल, चादरीची शिलाई असेल किंवा पर्वतावर चढाई असेल, शिकणे असेल किंवा आयुष्यासाठी कमाई असेल, या सगळ्यासाठी धैर्य दाखवावे लागते , धीर ठेवावा लागतो.  विज्ञानाने शेकडो वर्षांपूर्वीच्या या  समस्या  आज खूपच सोप्या केल्या आहेत.

मात्र ज्ञान आणि विज्ञानाचे प्रयोग, याबाबत हळू हळू धैर्याने , ही म्हण आजही तेवढीच शाश्वत आहे. तुम्ही सर्व विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या ज्या मार्गावर जात आहात , तिथे धांदरटपणाला अजिबात स्थान नाही. तुम्ही जे ठरवले आहे , तुम्ही ज्या नवसंशोधनावर काम करत आहात , शक्य आहे की त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळणार नाही. मात्र तुमच्या त्या अपयशाला देखील यश मानले जाईल कारण तुम्ही त्यातूनही काही शिकणार आहात. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की प्रत्येक  वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान अपयशातून एक नवीन मार्ग निघतो. , मला तुम्हाला यशाच्या मार्गावर जाताना पाहायचे आहे. अपयश हेच तुमच्या यशाचा मार्ग तयार  करू शकतो.

 

मित्रहो,

एकविसाव्या शतकातील भारताची परिस्थितीही बदलली आहे, गरजादेखील बदलल्या आहेत आणि आकांक्षादेखील बदलल्या आहेत. आता  भारतीय तंत्रज्ञान संस्थाच नव्हे तर स्वदेशी तंत्रज्ञान संस्थांच्या बाबतीत आता त्यांना  पुढच्या स्तरावर नेण्याची गरज आहे. आपली  आयआयटी जितकी  जास्त भारताच्या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन करेल, भारतासाठी उपाय शोधेल  तितकेच ते जागतिक वापराचे  माध्यमही बनेल. इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये तुमचा जो प्रयोग यशस्वी होईल तो  जगात कुठेही अपयशी ठरणार नाही.

 

मित्रहो,

तुम्हाला हे माहीत आहे की अशा वेळी जेव्हा जग जागतिक हवामान बदलांच्या आव्हानांशी झगडत आहे, तेव्हा भारताने  आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) ही कल्पना  पुढे आणली. आणि त्याला मूर्त रूपही दिले. आज जगातील अनेक देश भारताने सुरु केलेल्या अभियानात सहभागी होत आहेत.  हे अभियान पुढे नेण्याची आता आपली जबाबदारी आहे. आपण जगाला स्वस्त, किफायतशीर , पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान देऊ शकतो का जे भारताच्या या उपक्रमाला आणखी पुढे नेईल , भारताची ओळख आणखी मजबूत करेल. आज भारत त्या  देशांपैकी एक आहे जिथे प्रति युनिट सौर उर्जेची किंमत खूप कमी आहे. परंतु घरोघरी सौर उर्जा पोहचवण्यात  अजूनही  अनेक आव्हाने आहेत. मी तर एकदा म्हणालोही होतो की मी आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर जरूर सांगेन की समजा आपण जेवण बनवण्याचे स्वच्छ अभियान सुरु केले आणि सौर ऊर्जेच्या आधारे घरातच चूल पेटेल  आणि सौर ऊर्जेच्या आधारे घरासाठी आवश्यक ऊर्जा साठवणुकीच्या बॅटरीची व्यवस्था आपण बनवू शकतो. तुम्ही बघा, भारतात  25 कोटी चुली आहेत. 25 कोटी घरांमध्ये चुली आहेत.  25 कोटीची बाजारपेठ आहे. जर यात यश मिळाले तर इलेक्ट्रिक वाहनासाठी स्वस्त बॅटरीचा जो शोध सुरु आहे तो त्याला क्रॉस सब्सीडाईज करेल. आता हे काम आयआयटीच्या युवकांव्यतिरिक्त कोण करू शकते?

भारताला असे तंत्रज्ञान हवे आहे की, ते शाश्वत, टिकाऊ असेल, ज्यामुळे पर्यावरणाला कमीत कमी नुकसान होईल, आणि लोकांना त्याचा अगदी सहजतेने वापर करता येईल.

 

मित्रांनो,

आपत्ती व्यवस्थापन हाही एक असा विषय आहे, ज्यावर भारताने जगाचे  लक्ष वेधून घेतले आहे. कोणतीही मोठी आपत्ती ही जीवतहानीबरोबरच सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे नुकसान करते. हे लक्षात घेऊन भारताने दोन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये सीडीआरआय म्हणजेच आपत्ती विरोधी पायाभूत सुविधा आघाडी’  तयार करण्याचे आवाहन केले होते. आता जगभरातले अनेक देश या आंतरराष्ट्रीय आघाडीमध्ये सहभागी होत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाविषयी भारताला वाटणारी चिंता, त्यासाठी भारताने उचललेली पावले यांची माहिती इतर देशांनाही होऊ लागली आहे. भारताच्या प्रयत्नांचे स्वागत जगाकडून होत आहे. अशावेळी भारतातल्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडे सर्वांचे लक्ष असणे स्वाभाविक आहे. आपत्ती विरोधी पायाभूत सुविधा निर्माणामध्ये जगाला आपण नेमका कोणता पर्याय, उत्तर देऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. देशामध्ये आज ज्या लहान-मोठ्या घरांची निर्मिती होत आहे, इमारतींची उभारणी केली जात आहे. त्यांना आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती रोधक कसे बनवू शकतो, याविषयी आपल्याला विचार करावा लागेल. मोठे-मोठे पूल बनविण्यात येतात, एक प्रचंड वादळ घोंघावत येते आणि सर्वकाही उद्ध्वस्त होऊन जाते. उत्तराखंडमध्ये काय घडले, ते आपण अलिकडेच पाहिले आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला तशी व्यवस्था विकसित केली पाहिजे.

 

मित्रांनो,

गुरूदेव टागोर यांनी म्हटले होते -

‘‘आपल्याला राष्ट्र मिळणे म्हणजे एका अर्थाने व्यापक मार्गाने आपल्याला आत्म्याची जाणीव होणे आहे. ज्यावेळी आपण वैचारिक दृष्टीने आपल्या राष्ट्राचे पुनरूत्थान करण्यास प्रारंभ करतो, त्याचवेळी आपण आपल्या राष्ट्रामध्ये स्वतःचा आत्मा पाहू शकतो.’’

आज खरगपूरसहित देशातल्या संपूर्ण आयआयटीच्या नेटवर्ककडून देशाची अपेक्षा आहे की, त्यांनी आपल्या भूमिकेचा विस्तार करावा. तुमच्या इथे तर आधीपासूनच यासाठी एक समृद्ध परिसंस्था आहे.  उद्योग 4.0 साठीही येथे महत्वपूर्ण नवसंकल्पनांवर भर दिला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित  संस्थागत संशोधनाला औद्योगिक स्तरावर परिवर्तित करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्सअसो अथवा आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानआयआयटी  खरगपूरमध्ये कौतुकास्पद काम केले जात आहे. कोरोनाच्या विरोधात लढा देतानाही तुम्ही सॉफ्टवेयरच्या माध्यमातून उत्तर शोधून देशाला मदत करीत आहात. आता आपल्याला आरोग्य तंत्रज्ञानाच्या भविष्यकालीन पर्यायांविषयी वेगाने काम करायचे आहे. ज्यावेळी  मी आरोग्य तंत्रज्ञानाविषयी बोलतो, त्यावेळी फक्त डाटा, सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर म्हणजे उपकरणे यांच्याविषयीच बोलतो असे नाही. उलट एक परिसंस्था निर्माण करण्याविषयी मी बोलत असतो. प्रतिबंधात्मक उपायांपासून ते उपचारांपर्यंत आधुनिक उपाय आणि पर्याय आपल्याला देशाला द्यायचे आहेत. कोरोनाकाळामध्ये आपण पाहिले आहे की, वैयक्तिक आरोग्य दक्षता घेण्यासाठी वापरण्यात येणा-या उपकरणांच्या बाजारपेठेचा उदय कितीतरी  मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आधी लोक थर्मामीटर आणि आवश्यक वाटणारी औषधे घरामध्ये ठेवत होते. परंतु आता रक्तदाब तपासण्यासाठी, रक्तातली साखर तपासण्यासाठी, रक्तातले ऑक्सीजन तपासण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे घरामध्ये ठेवत आहेत. आरोग्य आणि तंदुरूस्ती यांच्याशी संबंधित असणारी उपकरणेही घरांमध्ये मोठ्या संख्येने ठेवली जात आहेत. भारतामध्ये वैयक्तिक आरोग्य दक्षता उपकरणे, सर्वांना परवडणारी असावीत, त्याचबरोबर अचूक माहिती देणारी असावीत, यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उपाय योजना विकसित कराव्या लागतील.

 

मित्रांनो,

कोरोनानंतरच्या काळात वैश्विक परिस्थितीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवसंकल्पना यामध्ये भारत एक मोठा वैश्विक स्तरावरचा खेळाडू बनू शकतो. या विचारातूनच यावर्षी विज्ञान आणि संशोधन यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये खूप मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून तुमच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांसाठी संशोधन क्षेत्रामध्ये नवीन माध्यम उपलब्ध झाले आहे. आपल्या नवकल्पनांच्या इन्क्यूबेशनसाठी स्टार्टअप इंडिया मिशनमुळेही तुम्हा सर्वांना मदत मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच आणखी एका महत्वपूर्ण धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेविषयी विशेषत्वाने तुम्हा सर्वांना मी काही सांगू इच्छितो. सरकारने नकाशा आणि भौगोलिक डाटा यांच्यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. असे पाऊल उचलल्यामुळे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्टार्टअप परिसंस्था खूप चांगली बळकट होऊ शकणार आहे. तसेच यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानही अधिक वेग घेऊ शकणार आहे. अशी पावले उचलल्यामुळे देशातल्या युवकांच्या  स्टार्टअप्सना  आणि नवसंशोधकांना अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे.

 

मित्रांनो,

जिमखान्यामध्ये तुम्ही मंडळी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक आणि इतर उपक्रम राबविता आणि त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सक्रिय सहभागीही होत असता, असे मला सांगण्यात आले आहे. अशा गोष्टी खूप आवश्यक आहेत . आपले लक्ष फक्त स्वतःपुरते पाहण्याकडे सीमित असता कामा नये. आपले ज्ञान आणि दृष्टिकोन यांचा व्यापक विस्तार झाला पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येही यासाठी एक बहुशाखीय दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. आयआयटी खरगपूर याबाबतीत आधीपासूनच खूप चांगले काम करीत आहे, हे पाहून मला आनंद झाला आहे. आयआयटी खरगपूरचे मी आणखी एका गोष्टीसाठी अभिनंदन करणार आहे.  तुम्ही मंडळी भविष्यातल्या नवसंकल्पनाची एक ताकद म्हणून आपल्या भूतकाळाचे, आपल्या प्राचीन ज्ञान-विज्ञानाचे ज्या प्रकारे अन्वेषण करीत आहात, ही गोष्ट खरोखरीच अतिशय कौतुकास्पद आहे. वेदांपासून ते उपनिषदांपर्यंत आणि इतर संहितांमध्येही जे ज्ञानाचे भांडार आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देत आहात. तुमच्या या कामाची  मी खूप कौतुक, प्रशंसा करतो.

 

मित्रांनो,

यावर्षी भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या  वर्षामध्ये प्रवेश करणार आहे. आयआयटी खरगपूरसाठी हे वर्ष विशेष आहे. कारण हे स्थान, जिथे तुम्ही साधना करता, जिथे तुम्ही जीवनाला नवीन वळण देता, त्या या स्थानाला स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा, खूप महान भूतकाळ लाभला आहे. या भूमीवर आंदोलनातल्या युवकांनी हौतात्म्य पत्करले आहे. टागोर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नैतिकतेची साक्ष ही भूमी देते. माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की, गेल्या वर्षांमध्ये जे 75 मोठे, महत्वाचे नवीन संशोधन झाले, आयआयटी खरगपूरमधून समस्यांवर नवीन उपाय, पर्याय शोधले गेले, त्यांचे संकलन तुम्ही करावे. त्यांची माहिती देशात आणि संपूर्ण जगात पोहोचवावी. भूतकाळातल्या या प्रेरणादायी गोष्टींमुळे आगामी वर्षांसाठी देशाला नव्याने प्रोत्साहन मिळेल. नवयुवकांना नव्याने आत्मविश्वास मिळेल. आपण अशाच आत्मविश्वासाने पुढे जात राहू, देशाच्या आशा-अपेक्षांचे कधीही विस्मरण होवू द्यायचे नाही. देशाच्या आकांक्षा म्हणजेच आज आपल्याला मिळालेले प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र काही केवळ भिंतीवर टांगण्यासाठी अथवा करियरसाठी फक्त पाठविण्यासाठी नाही. हे जे तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले आहे, ते 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे एक प्रकारे मागणीपत्र आहे. विश्वासपत्र आहे, आश्वासनपत्र आहे. आपल्या  सर्वांना आजच्या या शुभदिनी मी अनेक अनेक शुभेच्छा देतो. आपल्या माता-पित्यांच्या तुमच्याविषयी काही अपेक्षा आहेत. तुमच्या प्राध्यापकांनीही तुमच्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्या सर्व गोष्टींविषयी तुम्ही आपल्या पुरूषार्थाने, आपल्या स्वप्नांनी, आपल्या संकल्पांनी, आपल्या भविष्यातल्या वाटचालीतून आनंद प्राप्त करावा. या अपेक्षेबरोबरच सर्वांना खूप-खूप शुभेच्छा व्यक्त करतो.

 

खूप-खूप धन्यवाद !!

 

Jaydevi PS/S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700312) Visitor Counter : 153