अर्थ मंत्रालय
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबई आणि भोपाळ क्षेत्रात शोध मोहीम
Posted On:
22 FEB 2021 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2021
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 फेब्रुवारी 2021 रोजी 22 ठिकाणी छापे घालून जप्तीची कारवाई केली. मध्यप्रदेशातील बैतुल इथल्या सोया उत्पादनांच्या कारखान्यात तसेच, सतना येथे आणि महाराष्ट्रात मुंबई आणि सोलापूर तसेच कोलकाता येथे ही कारवाई करण्यात आली.
या शोधमोहिमेत, 8 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 44 लाख रुपये मूल्याचे बेहिशेबी परदेशी चलन जप्त करण्यात आले. या छाप्यात, बँकेची नऊ लॉकर्स देखील आढळली आहेत.
या शोध मोहिमेत सुमारे 259 कोटी रुपयांच्या मूल्याचे बेहिशेबी उत्पन्न कोलकात्यातील बनावट कंपन्यांमध्ये भाग भांडवलाच्या रूपाने गुंतवले असल्याचे आढळले.
तसेच, कंपनीच्या लेखापुस्तकात 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचा उल्लेख असून, कोलकात्यातील आणखी एका बनावट कंपनीत भाग भांडवल म्हणून केवळ कागदोपत्री ही गुंतवणूक केल्याचे आढळले. या कंपन्यांपैकी एकही कंपनी सुरु नसून, त्यांच्या पत्यावर अशा कंपन्या आणि त्यांचे संचालक असल्याचे कुठेही सिध्द झालेले नाही. यापैकी अनेक कंपन्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बंद केलेल्या आहेत.
या शोधमोहिमेदरम्यान, नफा लपवण्यासाठी या कंपन्यांनी 52 कोटी रुपयांचा खोटा तोटा दाखवल्याचेही आढळले. तसेच, लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राईव अशा डिजिटल साधनांमधूनही कंपनीच्या गैरव्यवहारांचे अनेक पुरावे सापडले आहेत. आतापर्यंतच्या तपासानुसार, या कंपनीकडे 450 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढचा तपास सुरु आहे.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699914)
Visitor Counter : 214