उपराष्ट्रपती कार्यालय

मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणामुळे मुलांचा आत्मसन्मान व सृजनात्मकता वाढीस लागते : उपराष्ट्रपती


बहुभाषिकत्व राष्ट्रीय एकात्मतेला मजबूत करू शकते : उपराष्ट्रपती

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त वेबीनारचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 21 FEB 2021 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2021

मुलांना किमान पाचव्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांनी आज केले. जी भाषा घरात बोलली जात नाही त्या भाषेतून शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांसाठी विशेषत: प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील मोठा अडथळा ठरू शकतो, असे ते यावेळी म्हणाले.

यासंदर्भात  झालेल्या अनेक अभ्यासांचा उल्लेख करत नायडू यांनी शिक्षणाच्या सुरुवातीला मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असल्यामुळे मुलांचा आत्मसन्मान सुखावतो व सृजनात्मकता वाढीला लागते, असे सांगितले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालयाने संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या वेबिनारच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी मातृभाषेच्या उन्नतीसाठी पाच महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाशिवाय प्रशासनात, न्यायालयांच्या कामकाजात तसेच न्यायदानात स्थानिक भाषेचा वापर करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. उच्च शिक्षण तसेच तंत्रज्ञान शिक्षणातही स्वदेशी भाषांचा वापर हळूहळू वाढवण्याच्या आवशयकतेबद्दलही त्यांनी सांगितले.

राज्यव्यवस्थेत मातृभाषेचे महत्व अधोरेखित करतानाच नायडू यांनी राज्य आणि स्थानिक पातळीवर स्थानिक भाषांचा वापर वाढवण्याची सूचना केली. भारतीय भाषांचे उपयोजन वरच्या स्तरावर नेण्याची सूचना करताना नायडू यांनी राज्यसभेचे उदाहरण दिले. राज्यसभेत  सदस्यांना  22 अनुसूचित भाषांपैकी कोणत्याही भाषेत स्वत:ला व्यक्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आजच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनी हैदराबादच्या मुच्चिथलमधील स्वर्ण भारत ट्रस्टने आज सकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय भाषांचा वापर उच्च शिक्षणातसुद्धा करण्याचे महत्व अधोरेखित केले.

काही भाषा कायमच्या नष्ट होणार आहेत याबद्दलही नायडू यांनी वेबिनार मध्ये चिंता व्यक्त केली.  जागतिकीकरण आणि समावेशीकरण याचा नायडूनी  उल्लेख केला.  प्रत्येक पंधरवड्यात एक भाषा स्वत:मधील परंपरागत शहाणपण आणि संपूर्ण संस्कृती  यांच्यासह नष्ट होते, या संयुक्त राष्ट्रांच्या इशाऱ्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जगातील धोक्यात आलेल्या भाषांपैकी जास्तीत जास्त भाषा या 196 भाषांची समृद्धी असलेल्या भारतातील आहेत हे देखिल त्यांनी अधोरेखित केले. यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने धोक्यात आलेल्या भाषांचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या योजनेचे (SPPEL) कौतुक केले.

बहुभाषिकत्वाचे महत्त्व विशद करताना उपराष्ट्रपतींनी, शक्य तेवढ्या सर्व भाषा आपण शिकल्या पाहिजेत आणि मातृभाषेचा पायाही बळकट केला पाहिजे अशी सूचना केली.

एकमेकांच्या भाषेबद्दल आदर आणि प्रेम वाढीला लागले तर आपणास त्यातून राष्ट्रीय एकता साधता येईल आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उदयाला येईल, असे ते म्हणाले.

याप्रसंगी नायडू यांनी  आभासी पद्धतीने भरलेल्या आंतरराष्ट्रीय सुलेखन प्रदर्शनाचे उद्घाटन केले. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, IGNCAचे सदस्य सच्चिदानंद जोशी हे मान्यवर या दूर संवादपद्धतीने भरलेल्या सोहळ्याला उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

 Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699795) Visitor Counter : 271