नागरी उड्डाण मंत्रालय

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संसदीय समितीची बैठक

Posted On: 19 FEB 2021 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2021

 

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली. नागरी उड्डाण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप एस. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये खासदार रामनाथ ठाकूर, नीरज डांगी, प्रफुल्ल पटेल, राजीव प्रताप रूढी, शवायत मलिक, सुब्रमण्यम स्वामी, विश्वंभर प्रसाद निषाद आणि विनायक भाऊराव राऊत सहभागी झाले होते.

कोविड-19 महामारीच्या कालावधीमध्ये हवाई क्षेत्राने आणि विमानसेवा देणा-या कंपन्यांनी लोकांच्या हितासाठी कोणकोणती पावले उचलली, याची माहिती मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरादाखल दिली. एका विशिष्ट मर्यादेसह ‘फेअर बँडस् आणि फ्लोअर प्राइस’ हवाई वाहतूक करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशांतर्गत हवाई वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दररोज जवळपास तीन लाख प्रवासी हवाई सेवेचा लाभ घेत आहेत, असेही हरदीप पुरी यांनी सांगितले. आता यापुढे उन्हाळ्यामध्येही देशांतर्गत प्रवासी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘फेअर बँड‘ आणि इतर काही निर्बंध दूर केले जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री पुरी यांनी ‘आरसीएस-उडान’ योजनेच्या बोली प्रक्रियेविषयी त्याचबरोबर हवाई मार्गांची माहिती दिली. या योजनेच्या बोली प्रक्रियेच्या चार फे-या पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत 700 पेक्षा जास्त मार्गांना मान्यता देण्यात आली असून या योजनेअंतर्गत 300 पेक्षा जास्त मार्गांवर हवाई सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, दरभंगा विमानतळ म्हणजे उडान योजना यशस्वी ठरल्याचे एक उदाहरण आहे. यावेळी बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातल्या खासदारांनी विमानतळांविषयी तसेच उड्डाणांविषयी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री हरदीप पुरी यांनी उत्तरे आणि माहिती दिली.

या बैठकीला उपस्थित असलेल्या खासदारांनी विमानतळांचे खाजगीकरण, नवीन विमानतळे सुरू करणे तसेच विमानतळांचा विस्तार करणे, विमान उड्डाण प्रशिक्षण संघटना याविषयी आपली मते दिली.

 

* * *

S.Tupe/S.Bedekar/D.Rane 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699434) Visitor Counter : 145