माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत संदर्भातील जनजागृतीसाठीच्या बहुमाध्यमी प्रदर्शनकारी व्हॅनला मुंबईत हिरवा झेंडा


लसींबाबतची चुकीची माहिती व अफवा यांना आळा घालण्यासाठी लसीकरण व जनजागृती मोहिम एकाचवेळी होणे आवश्यक : प्रधान सचिव, आरोग्य विभाग, महाराष्ट्र

लसीकरणाबाबतच्या जनजागृतीसाठी ही योग्य वेळ : प्रधान सचिव, आरोग्य विभाग, महाराष्ट्र

Posted On: 16 FEB 2021 4:24PM by PIB Mumbai

मुंबई, 16 फेब्रुवारी 2021

कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या संदर्भात जनजागृती करण्यासाठीच्या बहुमाध्यमी प्रदर्शनकारी व्हॅनला आज महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवला. मुंबई येथील फिल्म्स डिव्हीजनच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा व जागतिक आरोग्य संघटनेचे मुंबईतील सर्वेक्षण आरोग्य अधिकारी विवेक आर परदेशी उपस्थित होते.

ही गाडी मुंबईत तीन मार्गावरून प्रवास करेल. 1.वांद्रे-धारावी-जुहू-अंधेरी-बोरीवली; 2.गोरेगाव-चिंचवली-मालाड-कांदिवली-चारकोप-बोरीवली-दहीसर; 3.कुर्ला-चेंबूर-घाटकोपर-मानखुर्द-तुर्भे-भांडूप-विक्रोळी हे ते तीन मार्ग.

या मोहिमेअंतर्गत, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष पद्धतीने बनवून घेतलेल्या बहुमाध्यमी 16 व्हॅन्स प्रदर्शनाच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रवास करतील. या गाड्या एलईडी स्क्रीनच्या मार्फत संदेश देतील तसेच जीपीएस ने वेध घेता येतील असे इंडिग्रेटेड डॅशबोर्ड असलेल्या या गाड्यांचा क्यूआर कोडच्या मदतीने माग घेता येईल.

यासाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (ROB) ने पुढाकार घेतल्याबद्दल प्रशंसा करताना प्रदीप व्यास यांनी सांगितले की, महाराष्ट्रात एका वर्षापूर्वी पहिला कोविड रुग्ण सापडला तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. त्यावेळी या आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती. पण आता आपल्याला या आजाराबद्दल बरीच माहिती झाली आहे, आणि लोकांना काय संदेश दिला पाहिजे याबद्दलही माहीत आहे. महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर महिन्यात संपर्क मोहिम सुरू केली, त्याचा उपयोग आता दिसून येत आहे आणि राज्यात नोव्हेंबर मध्ये राज्यातील स्थिती बरीचशी आटोक्यात आल्याचे दिसते असेही त्यांनी नमूद केले. गेल्या दहा-एक दिवसात राज्यामध्ये कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे, अश्या परिस्थितीत प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोने अगदी योग्यवेळी पुढाकार घेतलेला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

लोकांपर्यत आता काही संदेश पोचवणे अगदी महत्वाचे आहे असे व्यास म्हणाले.  ते संदेश म्हणजे (1) आताही  कोणालाही कुटुंबातील सदस्यांना देखील कोविड होऊ शकतो (2) कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी तितक्याच सुरक्षित व परिणामकारण आहेत आणि जी लस दिली जात आहे ती घ्यायला हरकत नाही. (3) गरोदर आणि स्तनदा माता तसेच 18 वर्षाहून कमी वय असणाऱ्यांना सध्या लस दिली जाणार नाही. (4) एखाद्याने लस घेतली की ती व्यक्ती स्वतःला संरक्षण मिळवते एवढेच नाही तर आजूबाजूच्या तसेच संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना असणारा धोकाही कमी होतो. (5) लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर दिला जातो.

लसीकरण आणि लसीकरणाबद्दल जागृती एकाच वेळी करणे आवश्यक आहे. त्यामुळे माहितीचा दुरुपयोग आणि लसीबाबतच्या अफवा यांना आळा बसेल आळा बसेल असे व्यास यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना फिल्म डिव्हिजनच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या, कोविड विरुद्धच्या लढ्याच्या प्रवासात आता आपण कोविड योग्य वर्तणूकबद्दल राबवलेल्या मोहिमेनंतर आता आपण लसीकरणापर्यंत आलो आहोत. या बहुमाध्यमी प्रदर्शनकारी व्हॅनचा उद्देश हा प्रत्येकाला लसीकरणाबद्दल जागरूक करणे असून ते फक्त माहितीच्याच नाही तर मनोरंजनपर माहितीच्या माध्यमातून केले जात आहे. ही बहुमाध्यमी व्हॅन ही एकास एक संवादासोबतच डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर करत आहे. प्रादेशिक जनसंपर्क ब्युरोचे कलाकार, आत्मनिर्भर भारत व लसीकरणाबाबतचे संदेश सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतील.

जनसामान्यांना व्हॅनवरील क्यूआर कोडच्या माध्यमातून अधिकृत संकेतस्थळावरून तसेच सोशल मिडिया हँडलवरून अधिक माहिती घेता येईल.

या कार्यक्रमाच्या वेळी संगीत व नाट्य विभागाच्या सांस्कृतिक कलाकारांनी पथनाट्य व नृत्य प्रस्तुत केले. हे कलाकार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व प्रदेशात त्या त्या भागातील लोकप्रिय कलेच्या माध्यमातून संदेश देणार आहेत. कोविड-19 महामारीला आटोक्यात आणण्यात संपर्क अभियानाने  मोठी भूमिका निभावली आहे. मोहिमेच्या मदतीने सरकारचा संदेश घराघरापर्यंत पोचवणे हा याच प्रयत्नांचाच एक भाग आहे. या मोहिमेतील सर्व सहभागी संस्था, वरिष्ठ अधिकारी आणि फिल्म्स डिविजनचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या अभियानाची संकल्पना आणि अंमलबजावणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुण्यातील रिजनल आऊटरीच ब्युरोतर्फे करण्यात आली आहे व या कामी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

 

 

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698450) Visitor Counter : 2824