शिक्षण मंत्रालय
पहिल्या आसियान -इंडिया हॅकेथॉन 2021 चा समारोप
आसियान -इंडिया हॅकेथॉन एपीएएसटीआय 2016--2025 च्या कल्पनेशी सुसंगत आहे: केंद्रीय शिक्षण मंत्री
आसियान -इंडिया हॅकेथॉन, तरुणांसाठी बुद्धी आणि शक्ती एकत्रित करण्याचे एक वैशिष्ठ्यपूर्ण व्यासपीठ आहे : परराष्ट्र व्यवहार मंत्री
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2021 5:18PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर हे आसियान देशांमधील मंत्री व मान्यवरांसह आसियान-इंडिया हॅकेथॉन 2021 च्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. या हॅकेथॉनमध्ये 10 आसियान देश आणि भारतातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थी, मार्गदर्शक आणि अधिकारी सहभागी झाले होते.

हॅकेथॉनमधील सहभागींना संबोधित करताना केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले, “ पहिली आसियान-इंडिया हॅकेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो,. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात भाग घेतल्याबद्दल सर्व आशियाई देशांचा मी आभारी आहे. गेल्या 3 दिवसांपासून, सर्व 54 संघांनी 11 समस्या निवेदनांवर खरोखरच कठोर परिश्रम घेतले आणि मला परीक्षक आणि मार्गदर्शकांनी सांगितले की या हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर ते फार खूश आहेत. आसियान - इंडिया हॅकेथॉन हे आसियान -विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधन कृती आराखडा (एपीएएसटीआय ) 2016-2025 शी सुसंगत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि आसियान देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्याचे पोखरीयाल म्हणाले. या हॅकेथॉनच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे आपल्या राष्ट्रांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी रोजगार निर्मितीच्या शाश्वत विकासासाठी काम करणे हे आहे.
परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर म्हणाले की, “आसियान इंडिया हॅकेथॉन आपल्या तरूणांची बुद्धी आणि शक्ती एकत्रित आणण्यासाठी एक वैशिष्ठ्यपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करुन देते.

विजेत्या संघांना पुरस्कार, उपविजेते तसेच इतर सहभागी संघांना प्रोत्साहन पुरस्कार जाहीर करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
आसियान देशांतील खालील मान्यवर देखील आसियान-इंडिया हॅकेथॉनच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
⮚ यांग बेरहोरमॅट डेटो सेरी सेतिया आवंग हाजी हमजा बिन हाजी सुलेमान, शिक्षणमंत्री, ब्रुनेई.
⮚ चिआ वंदेथ, टपाल व दूरसंचार मंत्री, कंबोडिया
⮚ दातुक सेरी डॉ. नोरैनी अहमद, उच्च शिक्षण मंत्री,मलेशिया
⮚ लॉरेन्स वोंग, शिक्षण मंत्री, सिंगापूर.
⮚ अनेक लाओथमॅटस, मंत्री, उच्च शिक्षण, विज्ञान, संशोधन आणि नाविन्यता मंत्रालय , थायलंड.
⮚ प्रा. अर निजाम, इंडोनेशियाच्या शिक्षण व संस्कृती मंत्रालयाच्या उच्च शिक्षण महासंचालक.
⮚ डॉ. फऊट सिमलाव्होंग, उपमंत्री, शिक्षण व क्रीडा मंत्रालय, लाओ पीडीआर
⮚ गुयेन व्हॅन फुक, उपमंत्री, शिक्षण व प्रशिक्षण मंत्रालय .व्हिएतनाम
⮚ ग्रेगोरिओ बी. होनसन द्वितीय , सचिव, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान विभाग, फिलीपिन्स.
भारतीय शिक्षण मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीविषयी आसियान आणि भारतातील सहभागी विद्यार्थी खूप आनंद व्यक्त केला. .
नील अर्थव्यवस्था अन शिक्षण या दोन विस्तृत संकल्पनांतर्गत आव्हानांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना पुरवण्याच्या या अनोख्या उपक्रमात सर्व आसियान देशांनी भाग घेतला.
शिक्षण मंत्रालयाच्या नवसंशोधन विभाग आणि अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि आसियान देशांच्या सहकार्याने पहिल्या आसियान-इंडिया हॅकेथॉनचे आयोजन केले . कोविड -19 च्या निर्बंधांमुळे, हॅकेथॉनचे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाइन आयोजन करण्यात आले हा प्लँटफॉर्म शिक्षण मंत्रालयाच्या नवसंशोधन विभागाने देशातच विकसित केला आहे.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1695532)
आगंतुक पटल : 273