वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
फुलशेती, बियाणे आणि तृणधान्ये यांच्यासंदर्भात अपेडाच्या उत्पादन समितीची पहिली बैठक संपन्न
Posted On:
03 FEB 2021 5:37PM by PIB Mumbai
देशात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील, आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा पार करत, वर्ष 2020-21च्या पहिल्या तिमाहीत भारताने तृणधान्य निर्यातीत उल्लेखनीय वाढ नोंदविली आहे. तृणधान्यांच्या निर्यातीत एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 53% वाढ नोंदविली आहे. बासमती तांदळाची निर्यात 5.31% ने वाढून 22,038 कोटी रुपये झाली तर बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 122.61% इतकी प्रचंड वाढ होऊन ती 22,856 कोटी रुपये झाली. गव्हाची निर्यात 456% वाढून 1,870 कोटी रुपये झाली. तर मका, बाजरी यासारख्या इतर भरड धान्यांच्या निर्यातीत 177% वाढ होऊन ती 3,067 कोटी रुपयांवर पोहोचली.
अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणातर्फे होणाऱ्या एकूण निर्यातीत तृणधान्यांचा वाटा 48.61% आहे. देशातील तृणधान्य उत्पादनांच्या एकंदर निर्यातीचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले आहे.
फुलशेती, बियाणे आणि तृणधान्ये यांच्यासंदर्भात अपेडाच्या उत्पादन समितीची पहिली बैठक 3 फेब्रुवारी 2021 ला झाली. अपेडाचे अध्यक्ष डॉ.अंगमुथू या बैठकीच्या अध्यक्षपदी होते.
फुलशेती, बियाणे आणि तृणधान्ये, विशेषतः बिगर-बासमती तांदूळ, बाजरी यासारख्या पौष्टिक तृणधान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल समितीच्या सदस्यांनी चर्चा केली.
फुलशेती, बियाणे आणि तृणधान्ये, बासमती तसेच बिगर-बासमती तांदूळ, तृणधान्य आणि इतर भरड धान्ये यांच्या निर्यातीत होऊ शकणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन अपेडा या धान्यांच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी आगामी 5 वर्षांच्या कालावधीसाठी कृती आराखडा तयार करीत आहे. या आराखड्यानुसार दिलेल्या कालमर्यादेत सर्व संबंधितांना निर्यात वाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक कृती करणे शक्य होईल.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694819)
Visitor Counter : 187