पंतप्रधान कार्यालय
अर्थसंकल्पातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो- पंतप्रधान
अर्थसंकल्पात आत्मनिर्भरता आणि प्रत्येक नागरिकाच्या समावेशाची कल्पना आहे : पंतप्रधान
हा अर्थसंकल्प व्यक्ती, गुंतवणूकदार, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणेल : पंतप्रधान
या अर्थसंकल्पात गावे आणि आपले शेतकरी केंद्रस्थानी आहेतः पंतप्रधान
Posted On:
01 FEB 2021 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात वास्तविकतेची जाणीव आणि विकासाचा आत्मविश्वास आहे आणि यातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो. या कठीण काळात हा अर्थसंकल्प जगात एक नवीन आत्मविश्वास घेऊन येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की या अर्थसंकल्पात आत्मनिर्भरता आणि प्रत्येक नागरिकाचा आणि घटकाच्या समावेशाची कल्पना मांडली आहे. मोदींनी स्पष्ट केले की अर्थसंकल्पामागील तत्त्वांमध्ये विकासासाठी नवीन संधींचा विस्तार; तरुणांसाठी नवीन संधी; मानवी संसाधनास नवीन आयाम देणे; पायाभूत विकास आणि नवीन क्षेत्रांना वाढण्यास मदत करणे. या बाबींचा समावेश आहे.
पंतप्रधान म्हणाले की, हा अर्थसंकल्प कार्यपद्धती व नियम सुलभ करुन सामान्य लोकांचे जीवनमान उंचावेल. हा अर्थसंकल्प व्यक्ती, गुंतवणूकदार, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणेल.
अर्थसंकल्प सादरीकरणाच्या काही तासांत मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाची पंतप्रधानांनी दखल घेतली. ते म्हणाले, अर्थसंकल्पाचा आकार वाढवताना सरकारने वित्तीय शाश्वतेप्रति असलेल्या जबाबदारीकडे योग्य लक्ष दिले. अर्थसंकल्पातील पारदर्शकतेच्या घटकाचे तज्ज्ञांकडून कौतुक झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कोरोना महामारी किंवा आत्मनिर्भरता मोहिमेदरम्यान सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनावर भर देताना पंतप्रधानांनी नमूद केले की अर्थसंकल्पात प्रतिक्रियात्मक दृष्टिकोनाचा लवलेश नाही. पंतप्रधान म्हणाले, “आम्ही सक्रियतेच्या पुढे गेलो आहोत आणि कृतिशील अर्थसंकल्प दिला आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
अर्थसंकल्पात सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्याबद्दल मोदी म्हणाले की हा अर्थसंकल्प संपत्ती आणि निरोगीपणा, एमएसएमई आणि पायाभूत सुविधांवर केंद्रित आहे. त्यांनी आरोग्यसेवेवर देण्यात आलेला अभूतपूर्व भर याकडे लक्ष वेधले. दक्षिणेकडील राज्ये, ईशान्य आणि लेह लद्दाखच्या विकासाच्या गरजा अर्थसंकल्पात लक्षात घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या किनारपट्टीवरील राज्यांना व्यवसाय महासत्तेत बदलण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. आसामसारख्या ईशान्येकडील राज्यांतील क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरेल.
अर्थसंकल्पाचा समाजातील विविध घटकांवर होणारा परिणाम नमूद करीत मोदी म्हणाले की, संशोधन आणि नाविन्यपूर्णतेवर यात भर दिल्यामुळे युवकांना मदत होईल. आरोग्य, स्वच्छता, पोषण, स्वच्छ पाणी आणि संधींच्या समानतेवर भर देण्यात आल्यामुळे सामान्य पुरुष आणि महिलांना फायदा होईल. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांमध्ये वाढीव तरतूद आणि प्रक्रियात्मक सुधारणेमुळे रोजगार निर्मिती आणि वाढ होईल.
पंतप्रधान म्हणाले की, अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक तरतुदी आहेत. शेतकऱ्यांना सुलभ आणि अधिक कर्ज मिळेल. एपीएमसी आणि कृषी पायाभूत सुविधा निधी मजबूत करण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. “यातून हे दिसून येते की गाव आणि आपले शेतकरी या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी आहेत” असे पंतप्रधान म्हणाले.
मोदींनी नमूद केले की रोजगार संधी सुधारण्यासाठी एमएसएमई क्षेत्राची तरतूद दुप्पट केली आहे. ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प नव्या दशकासाठी भक्कम पाया तयार करेल आणि आत्मनिर्भर भारताच्या या अर्थसंकल्पासाठी त्यांनी देशवासियांचे अभिनंदन केले.
* * *
M.Iyengar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694062)
Visitor Counter : 198
Read this release in:
Urdu
,
Odia
,
English
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam