शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज आसियान इंडिया हॅकेथॉनच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले
Posted On:
01 FEB 2021 1:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2021
भारत आणि आसियानमधील संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने आज आसियान-इंडिया हॅकेथॉनचा प्रारंभ केला. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी स्मरण करून दिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये सिंगापूर इंडिया हॅकेथॉन दरम्यान आसियान देशांसोबत अशा प्रकारचे हॅकेथॉन आयोजित करण्याचा विचार बोलून दाखवला होता. ते म्हणाले की हे हॅकेथॉन भारत आणि आसियान देशांना “नील अर्थव्यवस्था ” आणि “शिक्षण ” या दोन व्यापक संकल्पनांतर्गत सामायिक आव्हाने सोडवण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करुन देईल आणि त्यायोगे शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानात सहकार्याद्वारे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध पुढे नेण्याची संधी उपलब्ध करेल. हे हॅकेथॉन आपल्या संस्कृतीतील सहा मूलभूत गुणांवर- आदर, संवाद, सहकार्य, शांतता, समृद्धी आणि नवसंशोधन यावर आधारित असेल.
पोखरियाल म्हणाले की, भारत-आसियान संबंधांचा पाया समान विश्वास, धर्म आणि संस्कृतीमध्ये आहे. ते म्हणाले की, भारत हा या प्रदेशातील सर्वात मोठा लोकशाही व लोकसंख्या असलेला देश असल्यामुळे आशियाई समुदायाचे नेतृत्व करण्याची नैतिक जबाबदारी त्याच्यावर आहे. या संदर्भात त्यांनी नमूद केले की भारत कोविड लस पुरवून आसियान देशांना मदत करत आहे. मजबूत शैक्षणिक आणि संशोधन संबंध अधोरेखित करताना ते म्हणाले की आयआयटी-दिल्ली आणि तेजपूर विद्यापीठ यासारखी अनेक भारतीय विद्यापीठे आपल्या आसियान भागीदार देशांतील विद्यार्थ्यांचे भारतात स्वागत करत आहेत. केंद्र सरकारने देखील आशियाई नागरिकांसाठी 1000 आसियान पीएचडी फेलोशिप सुरू केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 बाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की 34 वर्षानंतर आलेले एनईपी 2020 केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी नव्या संधी घेऊन येईल.
पोखरियाल म्हणाले की वसुधैव कुटुंबकमच्या तत्त्वज्ञानाचे पालन करत भारत आसियान प्रदेश आणि संपूर्ण जगासाठी सकारात्मक भूमिका निभावण्यासाठी कटिबद्ध आहे.
आसियान-इंडिया हॅकेथॉनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा:
* * *
U.Ujgare/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693874)
Visitor Counter : 229