पंतप्रधान कार्यालय

‘प्रबुद्ध भारत’च्या 125व्या वर्धापनदिन सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 31 JAN 2021 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021

नमस्ते!

प्रबुद्ध भारत चा 125वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत ही फार आनंदाची गोष्ट आहे. हे काही सामान्य नियतकालिक नाही. खुद्द स्वामी विवेकानंदांनी 1896 मध्ये हे सुरू केले. आणि, ते सुद्धा तेहतीस वर्षाच्या तरूण वयात. देशातील सर्वाधिक काळ चाललेल्या नियतकालिकांपैकी हे एक आहे.

प्रबुद्ध भारत, या नावामागे एक मोठा ठाम विचार आहे. स्वामी विवेकानंदांनी या नियतकालिकाचे नाव प्रबुद्ध भारत ठेवले ते देशाच्या आत्मशक्तीचे प्रगटन करण्यासाठी. त्यांना जागृत भारत निर्माण करावयाचा होता. भारताची जाण असणाऱ्यांना हे चांगलेच माहित आहे की हा देश फक्त राजकीय वा भौगोलिक अस्तित्वापलिकडे आहे. स्वामी विवेकानंदांनी मोठ्या अभिमानाने व ठळकपणे याचे उच्चारण केले. शतकानुशतके सजीव असलेली, स्पंदन पावत असलेली अशी ही सांस्कृतिक जाणीव आहे. अनेकदा कित्येक आव्हाने पेलत, अश्या प्रसंगी केल्या गेलेल्या भाकितांच्या विपरित, भारत अधिकाधिक शक्तीशाली होत गेला आहे. या भारताला ‘प्रबुद्ध’ म्हणजेच  जागृत करणे हेच विवेकानंदाचे उद्दिष्ट होते. एक देश म्हणून महानतेची महत्वाकांक्षा आपण बाळगू शकतो हा आत्मविश्वास त्यांना जागवायचा होता.

मित्रहो, स्वामी विवेकानंदांना गरीबांबद्दल अतिशय कणव होती. गरीबी हे अनेक समस्यांचे मूळ आहे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच देशातून गरीबी नष्ट व्हायला हवी होती. ‘दरिद्री नारायणा’ला त्यांनी सर्वाधिक महत्व दिले.

अमेरिकेतून स्वामी विवेकानंदांनी अनेक पत्रे लिहीली. मैसूरचे महाराज व स्वामी रामकृष्णानंदजी यांना लिहीलेल्या पत्रांचा मला खास उल्लेख करावासा वाटतो. या पत्रांमधून  गरीबांच्या सबलीकरणाबद्दल स्वामीजींच्या दृष्टीकोनातून दोन विचार स्पष्ट दिसतात. एक म्हणजे गरीब सबलीकरणाची वाट चोखाळू शकत नसतील तर त्यांच्यापर्यंत आवर्जून ते पोचवणे. त्यांनी गरीबांबद्ल मांडलेला दुसरा विचार म्हणजे, त्यांच्यापर्यंत विचार घेउन जा. त्यांच्या भोवतालच्या जगात काय चालले आहे याबद्दल त्यांचे डोळे उघडले की ते स्वतःच स्वतःच्या उद्धारार्थ काम सुरू करतील. 

आज भारत ज्या मार्गावरून पुढे जात आहे तो हाच मार्ग आहे. जर गरीब बँकेपर्यंत पोचू शकत नसतील तर बँकांनी गरीबांपर्यंत जायला हवे. जनधन योजनेने हेच केले. जर गरीबांना विमायोजनेपर्यंत जाता येत नसेल तर विमायोजनांनी गरीबांपर्यंत जायला हवे. जन-सुरक्षा योजनेने हेच केले. गरीबांना आरोग्यसेवा उपलब्ध होत नसतील तर आपण आरोग्यसेवा त्यांच्यापर्यंत पोचवायला हव्यात. आयुष्मान भारत योजनेने हेच केले. रस्ते, शिक्षण, वीज आणि इंटरनेट जोडणी या बाबी देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात आल्या आहेत, विशेषतः गरीबांपर्यंत. त्यांमुळे गरीबांमध्ये आशाआकांक्षा जागृत झाल्या आहेत. आणि याच आकांक्षा देशाच्या विकासाला चालना देत आहेत.  

मित्रहो, स्वामी विवेकानंद म्हणाले होते, दुर्बलपणाचा विचार करत बसणे हा त्यावरचा उपाय नाही तर शक्ती कमावण्याचा विचार करणे हा आहे.  आपण अडचणींचा जेवढा म्हणून विचार करू तेवढे त्यात बुडत जातो. पण जेंव्हा आपण संधींबद्दल विचार करू तेव्हा आपल्याला पुढे जाण्याचे मार्ग गवसतील. कोविड-19 या जागतिक महामारीचेच उदाहरण घ्या. भारताने काय केले? फक्त अडचणींचा विचार करत हताश होणे तर नक्कीच नाही. भारताने उत्तरांवर लक्ष केंद्रीत केले. पीपीई संच उत्पादन करण्यापासून ते जगाला औषधे देण्यापर्यंत, आपल्या देशाने सामर्थ्यापासून ते सामर्थ्यापर्यंत वाटचाल केली.  या संकटात जगाचा आधारस्तंभ बनला. कोविड-19 लस बनवण्यात भारत आघाडीवर राहिला.

काही दिवसांपूर्वीच भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम हाती घेतली, राबवली. या क्षमता आपण इतर राष्ट्रांच्या मदतीसाठीही वापरत आहोत.

मित्रहो, हवामानबदल या अजून एका समस्येला संपूर्ण जग सामोरे जात आहे. तरीही आपण या समस्येबद्दल फक्त तक्रारी करत राहिलो नाही.  आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या रुपात आपण उत्तर शोधले. आपण नवीकरणीय उर्जास्रोतांच्या अधिक वापराला प्रोत्साहन देत आहोत. स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीकोनातील प्रबुद्ध भारत घडतो आहे. जगातील समस्यांची उकल देणारा भारत हाच आहे.

मित्रहो, भारताबद्दल स्वामी विवेकानंदांची भव्य स्वप्ने होती कारण त्यांना भारताच्या युवावर्गावर अतिशय विश्वास होता. कौशल्य आणि आत्मविश्वासाचे भंडार भारतीय युवावर्गाकडे आहे याचा त्यांनी प्रत्यय घेतला होता. मला शंभर उर्जावान युवा द्या मग मी भारताचा कायापालट करेन, असे ते म्हणाले होते. आज भारतातील अग्रणी उद्योजक, खेळाडू, तंत्रज्ञान तज्ञ, व्यावसायिक, शास्त्रज्ञ, संशोधक आणि अन्य जनांची आत्मशक्ती आपल्या नजरेला पडते आहे. त्यांनी सीमा ओलांडल्या आहेत व अशक्य ते शक्य केले आहे.

पण, या युवावर्गाकडील शक्तीला आणखी प्रोत्साहन कसे द्यायचे? व्यावहारिक वेदान्त या विषयावरील त्यांच्या व्याख्यानात विवेकानंदांनी काही सखोल अंतर्दृष्टी मांडली आहे. धक्के पचवून, त्यांच्याकडे शिक्षणाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून बघण्यावर ते बोलले आहेत. लोकांमध्ये दुसरी गोष्ट भिनवली पाहिजे ती म्हणजे निर्भयता व प्रचंड आत्मविश्वास. निर्भयतेचे पाठ आपण स्वामी विवेकानंदांच्या स्वतःच्या जीवनावरूनही घेऊ शकतो.

त्यांनी जे केलं त्यात ते आत्मविश्वासाने पुढे गेले. त्यांना स्वतःबद्दल ठाम विश्वास होता. ते शतकांच्या परंपराचे पाईक आहेत याबद्दल त्यांना विश्वास होता.

मित्रहो, स्वामी विवेकानंदांचे विचार शाश्वत आहेत. आणि आपण हे सदैव लक्षात घेतले पाहिजे की आपण अमर होणे म्हणजे जगाला मूल्यवान असे काही बहाल करणे. ज्यांनी ज्यांनी अमरत्वाचा पाठपुरावा केला त्यांना ते मिळाले नाही, अशी स्वामीजींची आपल्याला शिकवण आहे. पण, ज्यांनी सेवाभाव जोपासला ते मात्र अमर झाले. स्वामीजी स्वतःच म्हणाले, जे इतरांसाठी जगतात ते खरे जगतात. ते स्वतःसाठी काही कमवावे म्हणून बाहेर गेले नाहीत. आपल्या देशातील गरीबांसाठी त्यांचे हृदय नेहमी कंपन पावत असे.  शृंखलाबद्ध मातृभूमीसाठी त्यांचे काळीज द्रवत असे.

मित्रहो, स्वामी विवेकानंदांनी अध्यात्मिक व आर्थिक प्रगती परस्परविरोधी आहे असे मानले नाही. महत्वाची बाब म्हणजे दारिद्र्याचे उदात्तीकरण करण्याच्या वृत्तीस त्यांचा विरोध होता. व्यावहारिक वेदान्ताबद्दलच्या त्यांच्या व्याख्यानात ते म्हणतात, वेदान्त एकात्मभाव शिकवतो म्हणून धर्म आणि लौकिक जीवन यामधील अंतर मिटले पाहिजे.   

स्वामीजी म्हणजे अध्यात्मातील आभाळ होते, उतुंग अध्यात्मिक आत्मा. तरिही, त्यांनी गरीबांसाठी आर्थिक प्रगतीची संकल्पना नाकारली नाही. स्वामीजी स्वतः संन्यासी होते. त्यांनी स्वतःसाठी पैसुद्धा मागितली नाही. पण, मोठमोठ्या संस्थांच्या उभारणीसाठी निधी उभा करायला त्यांनी मदत केली. या संस्थांनी दारिद्र्याशी सामना व नवनिर्माणाला प्रोत्साहन दिले.

मित्रहो, स्वामी विवेकानंदांकडील असे अनेक खजिने आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रबुद्ध भारत हे 125 वर्षे चाललेले नियतकालिक, स्वामीजींच्या विचारांचा प्रसार करणारे. युवावर्गाला शिक्षण आणि राष्ट्रजागृती यावरील त्यांच्या दृष्टीकोनावर हे उभे आहे. स्वामी विवेकानंदाचे विचार अमर करण्यात याचा मोलाचा वाटा आहे. प्रबुद्ध भारताला त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.

धन्यवाद.

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693784) Visitor Counter : 280