अर्थ मंत्रालय

निवारा, पाणी, स्वच्छता, वीज आणि स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन यांसारख्या मूलभूत गरजांची उपलब्धता या सुकर जीवनमानाच्या अनिवार्य अटी- आर्थिक सर्वेक्षण

Posted On: 29 JAN 2021 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021


आर्थिक सर्वेक्षण 2020-21 ने निवारा, पाणी, स्वच्छता, वीज आणि स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन यांसारख्या प्रत्येक कुटुंबात वापरल्या जाणाऱ्या आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांच्या उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

V1C10.jpg

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 सादर केले. या आर्थिक सर्वेक्षणात असे स्पष्ट दिसून येत आहे की बहुतेक राज्यांमध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मूलभूत गरजांची स्थिती 2012 पेक्षा 2018 मध्ये खूपच सुधारली आहे.

स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, सौभाग्य आणि उज्ज्वला योजना यांसारख्या योजनांच्या जाळ्यांच्या माध्यमातून सरकार सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांमुळे देशात सर्व राज्यांमध्ये मूलभूत गरजांच्या उपलब्धतेत 2012 च्या तुलनेत 2018 मध्ये सुधारणा झाली असल्याचे देखील या सर्वेक्षणात अधोरेखित करण्यात आले आहे. या सुविधांच्या उपलब्धतेमध्ये राज्याराज्यांदरम्यान असलेली तफावत देखील कमी झाली आहे.

विविध पैलूंमध्ये सुधारणा

  • या सर्वेक्षणानुसार बहुतेक राज्यांमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमध्ये 2012 च्या तुलनेत 2018 मध्ये सुधारणा झाली असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
  • 2012च्या तुलनेत 2018 मध्ये सर्व राज्यांमधील ग्रामीण भागांमध्ये आणि बहुतेक राज्यांमधील शहरी भागांमध्ये स्वच्छतेच्या सुविधांमध्ये सुधारणा झाल्या असल्याचे देखील या सर्वेक्षणात दिसून येते. 2012 मध्ये ज्या राज्यांमध्ये स्वच्छताविषयक सुविधा कमी होत्या त्या राज्यांमध्ये या सुविधांमध्ये वाढ झाल्याने आता स्वच्छताविषयक सुविधांच्या बाबतीत असलेली प्रादेशिक तफावत कमी झाली असल्याचे देखील त्यात नमूद करण्यात आले आहे. अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटांमध्येही स्वच्छतेच्या सुरक्षित सुविधांमध्ये वाढ झाली आहे.
  • घरांच्या उपलब्धतेत सुधारणा झाल्याकडे  निर्देश करत सर्वेक्षणात गृहनिर्माण निर्देशाकांत सुधारणा झाल्याचे आणि 2012च्या तुलनेत 2018 मध्ये  अत्यल्प उत्पन्न गटांना अधिक प्रमाणात लाभ देत या सुविधांमधील आंतरराज्य तफावत कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
  • 2012च्या तुलनेत 2018 मध्ये आसाममध्ये ग्रामीण भाग वगळता आणि आसाम आणि ओदिशामधील शहरी भाग वगळता सूक्ष्म पर्यावरणात सुधारणा झाल्याचे देखील सर्वेक्षणात सांगितले आहे. या ठिकाणी देखील अत्यल्य उत्पन्न वर्गामध्ये विशेषत्वाने सुधारणा झाली आहे.
  • तसेच स्वयंपाकघराची उपलब्धता, पाण्याचा नळ असलेले स्वयंपाकगृह, घरामध्ये उत्तम वायुवीजनाची सोय, स्नानगृहाची उपलब्धता, वीजेचा वापर आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारा इंधनाचा प्रकार यात देखील सुधारणा झाल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.

* * *

M.Chopade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693370) Visitor Counter : 288