अर्थ मंत्रालय

लॉकडाऊन दरम्यान झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सेवाक्षेत्रातील मुख्य निर्देशांक इंग्रजी ‘व्ही’ अक्षराप्रमाणे उभारी दर्शवित आहेत

Posted On: 29 JAN 2021 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021


सेवा खरेदी व्यवस्थापकांचे निर्देशांक, हवाई प्रवासी वाहतूक, रेल्वे मालवाहतूक, बंदर वाहतूक, परदेशी पर्यटकांचे आगमन आणि परकीय चलन यासारखी महत्वाची क्षेत्रे आता पुन्हा उभारी घेत असून या सर्व क्षेत्रांमध्ये इंग्रजी व्ही अक्षराप्रमाणे उभारी दिसून येत आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेमध्ये सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये हे निरीक्षण नोंदविले आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये व्यक्तींमधील संपर्क हा मुख्य भाग असल्यामुळे कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान या क्षेत्रामध्ये लक्षणीय घट दिसून आली. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या क्षेत्रामध्ये सुमारे 16 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मागणी कमी असली तरीदेखील देशांतर्गत प्रवासी हवाई वाहतूकीमध्ये देखील हळूहळू वाढ होत आहे. सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे संपर्क-आधारित सेवा क्षेत्रामध्ये पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.

भारतात थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह :

सर्वेक्षणानुसार, जागतिक पातळीवरील अडथळे असताना देखील एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत भारतातील सेवा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह 34 टक्क्यांनी वाढून 23.6 बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उप-क्षेत्रात मोठ्या प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक झाल्यामुळे याच काळात थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह 336 टक्क्यांनी वाढला. किरकोळ व्यापार, कृषी सेवा आणि शिक्षण यासारख्या उप-क्षेत्रातही थेट परदेशी गुंतवणूकीच्या (एफडीआय) प्रवाहात वाढ झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. जागतिक गुंतवणूक अहवाल 2020 नुसार जगातील सर्वात मोठ्या एफडीआय प्राप्तकर्त्यांच्या यादीत 2018 मधील 12 व्या स्थानावरून 2019 मध्ये 9 व्या स्थानावर पोहोचत भारताने आपली स्थिती सुधारली आहे.

स्टार्ट-अप कार्यप्रणाली:

कोविड-19 साथीच्या आजारामुळे देशभर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये देखील भारतीय स्टार्ट अप कार्यप्रणाली चांगली प्रगती करत आहे. कार्यप्रणालीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गेल्या वर्षी युनिकॉर्नच्या यादीमध्ये एकूण 12 स्टार्ट-अपची नोंद करत हा आकडा आता 38 वर पोहोचवला आहे.

नौवहन:

या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की बंदरांवरील नौवहन वेळ 2010-11 मधील 4.67 दिवसांवरून 2019-20 मध्ये 2.62 दिवसांवर आली आहे. यूएनसीटीएडच्या ताज्या आकडेवारीनुसार, जागतिक पातळीवर सरासरी नौवहन वेळ 0.97 दिवस आहे, ज्यावरून असे सूचित होते की बंदरांवरील कार्यक्षमता सुधारण्यासाठी भारताकडे बराच वाव आहे.

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693356) Visitor Counter : 373