पंतप्रधान कार्यालय

आत्मनिर्भर बंगाल आत्मनिर्भर भारताच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावेल- पंतप्रधान


भारतात सध्या होणाऱ्या सकारात्मक बदलांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिमान वाटला असता- पंतप्रधान

Posted On: 23 JAN 2021 11:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्यासमोर एक लक्ष्य आणि क्षमता असली पाहिजे जी आपल्याला धैर्याने वाटचाल करण्याची प्रेरणा देईल या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विधानाची आठवण करून दिली. आज आत्मनिर्भर भारतात आपल्याकडे ते लक्ष्य आणि क्षमता आहे. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य आपली आंतरिक क्षमता आणि निर्धाराने साध्य होईल, असे मोदी यांनी सांगितले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विधानाचा दाखला देऊन पंतप्रधानांनी सांगितले की आपल्यासमोर आपल्या देशासाठी आपले रक्त आणि घाम गाळून योगदान देण्याचे एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे आणि आपल्या कष्टांनी आणि नवोन्मेषाने आपण भारताला आत्मनिर्भर बनवले पाहिजे. ते आज कोलकातामधील व्हिक्टोरिया स्मारकाजवळ आयोजित पराक्रम दिवस सोहळ्यामध्ये बोलत होते. नेताजींनी अतिशय धाडसाने आपली सुटका करून घेण्यापूर्वी आपला पुतण्या शिशिर बोस याला विचारलेल्या एका मर्मभेदी प्रश्नाचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले, “ जर आज प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयावर आपला हात ठेवला आणि नेताजींच्या उपस्थितीचा अनुभव घेतला तर त्यांना देखील तोच प्रश्न ऐकू येईलः तुम्ही माझ्यासाठी काही कराल का? हे कार्य, ही कृती, हे लक्ष्य आहे आज भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचे. या देशाची जनता, या देशाचा प्रत्येक भाग, या देशाचा प्रत्येक व्यक्ती याचा भाग आहे.”

जगातील सर्वोत्तम उत्पादने तयार करण्यासाठी “झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट’ सह उत्पादन क्षमता विकसित करण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले. नेताजी म्हणाले होते, स्वतंत्र भारताच्या स्वप्नावरील विश्वास कधीही ढळू देऊ नका, जगातील कोणतीही शक्ती भारताला जखडून ठेवू शकत नाही. खरोखरच अशी कोणतीही शक्ती नाही जी 130 कोटी भारतीयांना आत्मनिर्भर भारत बनण्यापासून रोखू शकते .

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दारिद्र्य, निरक्षरता, रोगराई  या देशासमोरच्या सर्वात मोठ्या समस्या वाटायच्या याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते नेहमीच गरिबांचा विचार करायचे आणि त्यांनी शिक्षणावर मोठा भर दिला होता. दारिद्र्य, निरक्षरता आणि शास्त्रीय उत्पादनाचा अभाव या आपल्या सर्वात मोठ्या समस्या असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाजाला एकत्र आले पाहिजे आणि आपल्याला एकत्र प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

आज देश शोषित आणि वंचित घटकांच्या आणि आपल्या शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अथक काम करत आहे, याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. आज प्रत्येक गरिबाला मोफत वैद्यकीय उपचार आणि आरोग्य सुविधा मिळत आहेत, शेतकऱ्यांना बीबियाण्यापासून बाजारापर्यंत आधुनिक सुविधा मिळत आहेत आणि त्यांचा लागवडीचा खर्च कमी होऊ लागला आहे, दर्जा सुधारण्यासाठी आणि युवकांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे, 21व्या शतकाच्या गरजांना अनुरुप अशा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासोबत नव्या आयआयटी आणि आयआयएम्स आणि एम्सची उभारणी केली जात आहे.

 

भारताच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही हा नेताजींचा विश्वास अगदी सार्थ होता. आज भारतामध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिमान वाटला असता, असे पंतप्रधान म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये भारत स्वयंपूर्ण बनत चालला असल्याचे पाहून, बड्या जागतिक कंपन्यांमध्ये, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये भारतीयांचे वर्चस्व वाढत असल्याचे पाहून, नेताजींना काय वाटले असते, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. एकीकडे भारताच्या संरक्षण दलांकडे राफेलसारखे अत्याधुनिक विमान आहे तर दुसरीकडे तेजस या अत्याधुनिक लढाऊ विमानाची निर्मिती देखील भारतात होत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या दलांचे सामर्थ्य वाढत असल्याचे पाहून आणि ज्या प्रकारे देशाने महामारीला तोंड दिले आणि  देशी बनावटीच्या लसींसारखा आधुनिक वैज्ञानिक उपाय शोधला आणि इतर देशांना देखील मदत केली ते पाहून नेताजी आशीर्वाद देत असतील,असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या स्वप्नातील सामर्थ्यशाली भारताची प्रचिती जगाला एलएसीपासून एलओसीपर्यंत येत आहे. आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

नेताजी सुभाष आत्मनिर्भर भारतासोबत सोनार बांगलासाठी देखील सर्वात मोठी प्रेरणा आहेत, असे मोदी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी यांनी जी भूमिका बजावली तीच भूमिका पश्चिम बंगालला आत्मनिर्भर भारताच्या पूर्ततेमध्ये बजावायची आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर बंगाल आणि सोनार बांगला चालना देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बंगालने पुढे पुढे वाटचाल करावी आणि आपले स्वतःचे आणि देशाचे वैभव वाढवावे, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691744) Visitor Counter : 165