उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी तरूणांना दारिद्रय, निरक्षरता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढण्याचे केले आवाहन

नेताजी बोस यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण, पराक्रम दिवस साजरा करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे केले कौतुक

हैदराबाद येथील एमसीआर मनुष्य बळ विकास संस्थेत अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमातील संबोधन

Posted On: 23 JAN 2021 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी, असे सांगत दारिद्र्य, साक्षरता आणि सामाजिक आणि लैंगिक भेदभावाविरुद्धचा लढा, भ्रष्टाचार, जातीवाद आणि जातीयवाद निर्मूलन करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती वैंकय्य नायडू यांनी आज युवकांना केले.  

हैदराबाद येथील एमसीआर मनुष्य बळ विकास संस्थेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती, जो दिवस पराक्रम दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो, अशा कार्यक्रमानिमित्त फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी उपस्थित असलेल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी हे आवाहन केलं.

आपल्या लोकसंख्येपैकी 65 टक्के वयोगट 35 वर्षाखालील आहे, हे लक्षात घेऊन नायडू म्हणाले की, नव भारताच्या निर्मितीमध्ये– जिथे आनंद आणि भरभराट असेल, नागरिकांना समान संधी मिळतील आणि जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशा भारताचे  युवकांनी आघाडीवर येऊन नेतृत्त्व केले पाहिजे.

`पराक्रम` किंवा धैर्य या संकल्पना नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग होत्या, सरकारने नेताजींचा जन्मदिवस हा देशातील लोकांना प्रेरणा देण्यासाठी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी सरकारचे कौतुक केले. नेताजींना आदरांजली अर्पण करताना ते म्हणाले, नेताजी हे प्रभावी नेते होते आणि भारताच्या विकासाबद्दल विश्वास असणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. आपल्याला जाती, पंथ, प्रांत, आणि धर्म यांच्या पलिकडे जाण्याची गरज आहे आणि स्वतःला प्रथम भारतीय म्हणून मानले पाहिजे, असे त्यांचे मत होते.  

नेताजींना भारतातील जातीव्यवस्था नष्ट करायची होती, यावर भर देऊन नायडू म्हणाले, 1940 मध्ये, आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून सर्व जातींचे, पंथाचे, धर्माचे सैनिक एकत्र राहात होते, एकाच स्वयंपाकघरात एकत्र भोजन सेवन करीत होते आणि  ते सगळेजण  भारतीय म्हणून लढले होते.

नेताजींचे लोकशाहीवादी विचारधारा ही त्याग आणि सर्वसंग परित्याग यावर आधारित होती, हे लक्षात घेता, उपराष्ट्रपती म्हणाले की, लोकशाहीसाठी शिस्त, जबाबदारी, सेवा आणि देशभक्ती ही मूल्ये  म्हणून आत्मसात व्हावीत, अशी बोस यांची इच्छा होती.

नायडू म्हणाले की, नेताजींना केवळ राजकीय गुलामगिरीतून मुक्तता हवी नव्हती, तर संपत्तीचे समान वाटप, जातींवरील बंधने नष्ट करणे आणि सामाजिक असमानतेचे निर्मूलन यावर त्यांचा विश्वास होता.

नायडू म्हणाले की, नेताजी आणि आझाद हिंद सेना यांनी लोकांकडून मिळालेल्या लोकप्रियतेचा अंदाज  ब्रिटिश अधिकाऱ्यांना आझाद हिंद सेनेच्या सैनिकांविरुद्ध सुरु असलेल्या खटल्याच्यावेळी  त्यांना मिळालेल्या पाठबळावरूनच आला होता .

उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय असो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांना समानतेचा दर्जा देण्यावर बोस यांचा विश्वास होता. "आझाद हिंद सैन्य दलात महिलांची तुकडी झाशीची राणी  या नावाने अस्तित्वात होती, यावरून नेताजींच्या प्रगत विचारांचा अंदाज येऊ शकतो,"

एमसीआर मनुष्य बळ  विकास संस्थेचे महासंचालक हरप्रीत सिंग, अतिरिक्त महासंचालक बेनूर महेश दत्त एक्का आणि कर्मचारी तसेच अधिकारी प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते.

भाषणाच्‍या संपूर्ण मजकुरासाठी येथे क्लिक करा


* * *

Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1691612) Visitor Counter : 56