पंतप्रधान कार्यालय

आसाममधल्या तेजपूर विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांचे संबोधन


भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियामधला विजय म्हणजे नव युवा भारताच्या चैतन्याचे दर्शन – पंतप्रधान

नवे शैक्षणिक धोरण आपली शिक्षण व्यवस्था डाटा आणि डाटा एनलेटिक्ससाठी सज्ज करेल असा पंतप्रधानांचा विश्वास

Posted On: 22 JAN 2021 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या तेजपूर विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत समारंभाला दूर दृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. आसामचे राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आजचा हा क्षण 1200 विद्यार्थ्यांच्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे. तेजपूर विद्यापीठात घेतलेले शिक्षण आसामच्या आणि देशाच्याही प्रगतीला वेग देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत रत्न भूपेन हजारिका यांनी लिहिलेल्या विद्यापीठ गौरवगानातून तेजपूरचा महान इतिहास ध्वनित होत असल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यातल्या काव्यपंक्ती नमूद केल्या -

अग्निगड़र स्थापत्य, कलियाभोमोरार सेतु निर्माण,

ज्ञान ज्योतिर्मय,

सेहि स्थानते बिराजिसे तेजपुर विश्वविद्यालय

म्हणजे अग्निगडप्रमाणे स्थापत्य, कालिया-भोमोरा पूल, ज्ञानाचा प्रकाश ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी  तेजपूर विद्यापीठ वसलेले आहे. भूपेन हजारिका, ज्योती प्रसाद अग्रवाल, बिष्णु प्रसाद राभा यांच्यासारखी महान  व्यक्तिमत्वे तेजपूरची ओळख राहिल्याचे ते म्हणाले.

आतापासून ते भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्ष पूर्तीचा काळ हा तुमच्या आयुष्यातला सुवर्णकाळ असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तेजपुरची कीर्ती देशभरात आणि संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचे आणि आसाम आणि ईशान्य भारताला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ईशान्य भागाच्या विकासासाठी विशेषकरून कनेक्टीव्हिटी, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रात सरकारच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

तेजपूर विद्यापीठ हे नवोन्मेशाचे केंद्र राहिले आहे. तळापर्यंतच्या नवोन्मेशाने व्होकल फॉर लोकल या मंत्राला वेग दिला असून स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी याचा वापर केला जात असून यातून विकासाची नवी द्वारे खुली होत असल्याचे ते म्हणाले. स्वच्छ पेयजलासाठी कमी खर्चातले तंत्रज्ञान, प्रत्येक खेड्याने टाकाऊचे उर्जेत रुपांतर करण्याची घेतलेली शपथ, बायोगॅस आणि सेंद्रिय खते यांच्याशी संबंधित कमी खर्चातले आणि प्रभावी तंत्रज्ञान, ईशान्येतल्या जैव विविधतेचे आणि समृध्द वारसा यांचे जतन करण्यासाठीचे अभियान, ईशान्येतल्या आदिवासी समाजाच्या आणि नामशेष होण्याचा धोका असलेल्या  भाषांचे दस्तावेजीकरण, बाताद्रव थाना इथे लाकडावर कोरलेल्या आणि शतकांहून प्राचीन असलेल्या कोरीव कामाचे जतन, वसाहतवाद्यांच्या काळात लिहिलेले कागदपत्रे आणि पुस्तकांचे डीजीटायझेशन या सारख्या तेजपूर विद्यापीठाच्या नवोन्मेशाची त्यांनी प्रशंसा केली.

अनेक स्थानिक आवश्यकतांवर काम करण्याची प्रेरणा तेजपूर विद्यापीठाचा परिसर देत असल्याचे ते म्हणाले. इथल्या भागातल्या नद्या आणि पर्वतांची नावे वस्तीगृहांना दिली आहेत. ही केवळ नावे नव्हेत तर जीवनाची प्रेरणा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जीवनाच्या आपल्या प्रवासात आपल्याला अनेक अडचणी, अनेक डोंगर, नद्या पार कराव्या लागतात. प्रत्येक पर्वतानंतर आपल्या कौशल्यात वाढ होऊन आपण नव्या आव्हानाला सज्ज होतो. अनेक उपनद्या एका नदीला येऊन मिळतात, आणि त्यानंतर समुद्रात विसर्जित होतात, आपणही वेगवेगळ्या लोकांकडून ज्ञान घेऊन आपले उद्दिष्ट साध्य करत ज्ञानाची शिदोरी घेऊन पुढे वाटचाल करतो. हा दृष्टीकोन घेऊन वाटचाल केल्यास देशाच्या विकासात ईशान्य भाग आपले योगदान देऊ शकेल.

आत्मनिर्भर अभियानाची संकल्पना त्यांनी विशद केली. संसाधने, पायाभूत, तंत्रज्ञान, यामध्ये परिवर्तन झाले  आहेच, सर्वात मोठे परिवर्तन आहे ते अंतःप्रेरणा, कृती आणि प्रतिसाद यामध्ये आहे  जे आजच्या  युवकांच्या मनोवृत्तीशी साधर्म्य राखणारे आहे.

आव्हाने स्वीकारण्याची आजच्या युवा भारताची स्वतंत्र शैली आहे. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी भारताच्या युवा क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातल्या  कामगिरीचे उदाहरण दिले. भारतीय क्रिकेट संघाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पराभवाला सामोरे गेल्यानंतरही त्यांनी त्यातून वेगाने सावरत पुढचा सामना जिंकला. जायबंदी असूनही खेळाडूंनी निर्धाराचे दर्शन घडवले. कठीण परिस्थितीत निराश न होता त्यांनी आव्हान स्वीकारत त्यावर उपाय शोधला. खेळाडू अननुभवी होते मात्र त्यांचे मनोधैर्य उच्च होते आणि त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. कौशल्य आणि स्थिरचित्त राखत त्यांनी बलाढ्य संघाला नमवले.

खेळाडूंची ही शानदार कामगिरी केवळ क्रीडा विश्वाच्या दृष्टीकोनातूनच महत्वाची आहे असे नव्हे तर आपल्याला यातून जीवनासाठी महत्वाचा बोध घेता येतो असे पंतप्रधान म्हणाले. पहिला म्हणजे आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास हवा, दुसरा सकारात्मक मनोवृत्ती राखल्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होतो, तिसरे आणि महत्वाचे म्हणजे आपल्याकडे दोन पर्याय असतील त्यापैकी एक सुरक्षित आणि दुसरा विजयाकडे नेणारा मात्र कठीण मार्ग असेल तर आपण निश्चितच दुसरा मार्ग स्वीकारला पाहिजे. प्रसंगी येणारे अपयश नुकसानकारक नसते, आपण आव्हाने स्वीकारण्यासाठी डगमगता कामा नये. अपयशाच्या भितीवर आणि अनावश्यक ताण आपण मात केली तर आपण निडर होऊ. हा नवा भारत, आत्मविश्वास आणि आपल्या उद्दिष्टांप्रती समर्पित आहे. केवळ क्रिकेट विश्वातच हे चित्र दिसते असे नव्हे तर आपण सर्व जण या चित्राचा भाग आहात असे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

हाच आत्मविश्वास आणि अनवट वाटा चोखाळण्यासाठीची निडर वृत्ती आणि युवा उर्जा, कोरोनाविरोधातल्या लढ्यात देशाचे सामर्थ्य बनल्याचे ते म्हणाले. सुरुवातीच्या धारणांवर भारताने मात करत निर्धार आणि लवचिकता असेल तर संसाधने निर्माण होण्यासाठी फार वेळ लागत नाही यांचे दर्शन घडवले. भारताने वेगाने आणि तत्पर निर्णय घेत विषाणूशी प्रभावी लढा दिला. मेड इन इंडिया उपायांनी प्रादुर्भाव रोकण्यासाठी मदत झाली आणि आरोग्य पायाभूत ढाचा सुधारला. लसीसंदर्भात आपले संशोधन आणि उत्पादन क्षमता भारतासह जगातल्या अनेक देशांना सुरक्षा ढाल असल्याचा विश्वास देत असल्याचे पंतप्रधानानी सांगितले.

थेट लाभ हस्तांतरण शक्य करणारा डिजिटल पायाभूत ढाचा, फिनटेक डिजिटल, स्वच्छतागृहे बांधण्याची जगातली सर्वात मोठी मोहीम, प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवण्याची मोठी मोहीम, जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आणि आता जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम म्हणजे उपाय शोधण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, मोठे प्रकल्प घेण्यासाठी न डगमगण्याच्या भारताच्या वृत्तीची साक्ष आहे. हे प्रकल्प आसाम आणि ईशान्य भारताला लाभदायक आहेत.

नव्या संधी निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाबाबतही त्यांनी विचार मांडले. भविष्यातली विद्यापीठे कदाचित पूर्णपणे व्हर्च्युअल असतील जी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना जगातल्या कोणत्याही विद्यापीठाचा भाग होण्याची संधी उपलब्ध करून देतील. अशा परिवर्तनासाठी नियामक ढाच्यावर त्यांनी भर दिला. नवे शैक्षणिक धोरण म्हणजे या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. हे धोरण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर, बहु शाखीय शिक्षण आणि लवचिकतेला प्रोत्साहन देत आहे. लवचिकता पुरवत आहे. नवे शैक्षणिक धोरण आपली शिक्षण व्यवस्था डाटा आणि डाटा एनलेटिक्ससाठी सज्ज करण्यावर भर देत आहे. प्रवेश ते अध्यापन आणि मुल्यांकनापर्यंतच्या प्रक्रियेत डाटा एनलेटिक्समुळे मोठी सुधारणा होईल.

तेजपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केवळ आपल्या भविष्यासाठी नव्हे तर देशाच्या उज्वल भविष्यासाठीही काम करावे. आपले उद्दिष्ट उच्च असेल तर जीवनातल्या चढ-उतारांचा त्यावर परिणाम जाणवणार नाही. आगामी 25-26 वर्षे विद्यार्थ्यांसाठी आणि देशासाठीही महत्वाची असल्याचे सांगून विद्यार्थी देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जीवनातला महत्वाचा टप्पा यशस्वीपणे पार करून विविध क्षेत्रात काम करण्यासाठी आणि रोजगार प्राप्त करण्यासाठी पात्रता प्राप्त केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. या विद्यार्थ्यांमध्ये झिम्बाबे, घाना, इथीओपिया या देशातल्या अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला. वसुधैव कुटुंबकम म्हणजेच अवघे जग हे एक कुटुंब आहे याचीच प्रचीती यातून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाला मोझेक संस्कृती असून यात आश्चर्य वाटण्याजोगे नाही कारण हे विद्यापीठ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाणी वसलेले आहे. रूपकंवर ज्योती प्रसाद अगरवाला, बिष्णुप्रसाद राभा, नटसुर्य फणि सरमा आणि डॉ. भूपेन हजारिका यासारख्या मान्यवरांचे कार्य  तेजपुरशी जोडले गेल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थी आपल्या राज्याबरोबरच देशाच्या विकासातही महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रीफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म हे सूत्र घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले असून या क्षेत्रात आवश्यक असलेले गुणात्मक परिवर्तन यामुळे लाभणार आहे. समावेशी, प्रभावी आणि कल्पक शिक्षणावर या धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आले असून यातून भारतात बौद्धिक विकासाच्या नव्या युगाची पहाट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूण 1218 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्राप्त झाल्या 371 पदवीधर,725 पदव्युत्तर,36 पदव्युत्तर पदविका आणि 86 विद्यार्थ्यांना पीएचडी प्राप्त झाली. 46 पदवीधर आणि पदव्युत्तर धारकांना सुवर्ण पदकांने गौरवण्यात आले. सर्वोत्तम पदवीधर आणि सर्वोत्तम पदव्युत्तर  धारकालाही सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691312) Visitor Counter : 128