सांस्कृतिक मंत्रालय

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीपासून संपूर्ण वर्ष विविध कार्यक्रमांचे आयोजन


125 व्या जयंती वर्षाच्या उद्‌घाटन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान

Posted On: 19 JAN 2021 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात 23 जानेवारी 2021 रोजी होईल असे संस्कृती आणि पर्यटन मंत्री  प्रह्लादसिंग पटेल यांनी आज जाहीर केले.  कोलकता येथे आयोजित केलेल्या उत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील.  पटेल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली. सरकारने 23 जानेवारी हा दिवस  दरवर्षी ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना आज जारी करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्यात येणार आहे. या स्मरणोत्सवातील कार्यक्रम निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख आणि मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती गठीत केली आहे अशी माहिती पटेल यांनी दिली. ही समिती दिल्ली, कोलकाता  येथे तसेच   नेताजी तसेच आझाद हिंद फौजशी संबंधित इतर महत्वाच्या  ठिकाणी तसेच परदेशात स्मरणोत्सवातील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मार्गदर्शन करेल.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या स्मरणोत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी  एका सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर,नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित  कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग शोचे उद्‌घाटन होणार आहे.

यावेळी  नेताजी यांच्या  125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष  नाणे आणि टपाल तिकीट  यांचे विमोचन  केले जाईल असे पटेल म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, ओरिसाच्या कटक येथे नेताजींच्या जन्मस्थळी देखील संस्कृती मंत्रालय  एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

भारत सरकार अंतर्गत कार्यरत इतर मंत्रालये देखील या निमित्त मोठ्या संख्येने विविध उपक्रम राबविणार आहेत. या उपक्रमांची घोषणा आणि आयोजन  उच्चस्तरीय समितीने परवानगी दिल्यानंतर  केली जाईल असे पटेल म्हणाले .

 

Jaydevi P.S/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690178) Visitor Counter : 170