माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आसामच्या ग्रामीण भागात दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे जनतेच्या आयुष्यात येणारी संकटे आणि समस्यांचे चित्रण आमच्या ‘द ब्रिज’ चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न- चित्रपट निर्माते क्रिपाल कलिता
“चित्रपटासाठी एखादे दृश्य चित्रित करण्यासाठी आमच्या चमूला अनेकदा सात तास पुराच्या पाण्यात बुडून चित्रीकरण करावे लागले”
“त्यांच्या विचारांमुळे भारावून, त्यांचा दृष्टीकोन नव्या पिढीपर्यंत पोचवण्याच्या उद्देशानेच माहितीपट निर्मिती”- बिशप फिलीपोझ मार क्रिसोस्टोम यांच्यावरील माहितीपटाचे दिग्दर्शक ब्लेसि इप थॉमस
पणजी, 19 जानेवारी 2021
क्रिपाल कलिता यांचा आसामी भाषेतील लघुपट, ‘द ब्रिज’ आसामच्या ग्रामीण भागात दरवर्षी येणाऱ्या भीषण पुरामुळे विस्थापित होणाऱ्या गरीब नागरिकांचे दुःख प्रभावीपणे मांडतो.
“आज तरी या समस्येवर काहीही तोडगा दिसत नाही. मी ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा असल्याने, पुराचा फटका बसलेल्यांचे दुःख आणि समस्या मी स्वतः अनुभवल्या आहेत.” असे कलिता यांनी सांगितले. 51 व्या इफ्फीदरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि पटकथाकार, ब्लेसि ईप थॉमस हे ही या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. त्यांनी, ‘100 इयर्स ऑफ क्रिसोस्टोम- अ बायोग्राफिकल फिल्म’ ची माहिती दिली. हे दोन्ही माहितीपट गोव्यात सुरु असलेल्या 51 व्या इफ्फीतील इंडियन पॅनोरमाच्या नॉन फीचर फिल्म विभागात दाखवले जाणार आहेत.
दरवर्षी ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर येतो आणि या भीषण पुरात अनेक गावे आणि पिके वाहून जातात. या लघुपटाची नायिका जोनाकीला या पुरामुळे मोठ्या संघर्षमय आयुष्याला सामोरे जावे लागते. नदीवर पूल नसल्याने तिच्या समस्यांमध्ये आणखीनचा वाढ होते, मात्र अखेर ती स्वतःच सक्षम होते.. ‘आयुष्य सुरूच राहिले पाहिजे’ हा संदेश देणारा हा लघुपट आहे.
कलिता, हे स्वतंत्र चित्रपट निर्माते असून, त्यांना नाट्यक्षेत्राची पार्श्वभूमी लाभली आहे. त्यांनी या चित्रपटासाठी अनेक नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञांची निवड केली. जोनाकी ची भूमिका करणाऱ्या “शिवा रानी कलिता यांची निवड सुमारे 300 कलाकारांच्या स्क्रीन टेस्ट नंतर करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. अत्यंत मर्यादित संसाधनांच्या मदतीने तयार करण्यात आलेला हा लघुपट आसाममधील पूरस्थितीतच चित्रित करण्यात आला आहे.
आसाममधील अनेक लोक रोजगारासाठी बाहेर स्थानांतरीत होत असून, त्याचा आसामच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे, असे कलिता यांनी सांगितले.
ब्लेसि ईप थॉमस यांचा 2019 मधील माहितीपट, ‘100 इयर्स ऑफ क्रिसोस्टोम- अ बायोग्राफिकल फिल्म’ मध्ये 103 वर्षे वयाचे बिशप फिलीपोझ मार क्रिसोस्टोम मार थोमा वालिया मेट्रोपोलिटन यांचे विचार आणि जीवनकार्याची माहिती देतो. बिशप फिलीपोझ मार हे आशियातील तसेच ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील सर्वाधिक काळ बिशपपद सांभाळणारे बिशप आहेत. 2007 साली ते मार थोमा वालिया मेट्रोपोलिटन बनले. 2018 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे आयुष्य हेच, भारताच्या गेल्या शतकातील राजकीय आणि सामाजिक इतिहासाचे जिवंत रूप आहे. पहिल्या महायुद्धापासूनचा काळ त्यांनी अनुभवला आहे. “त्यांच्या विचारांनी मला खूप प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच पुढच्या पिढ्यांपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी मी हा माहितीपट बनवला”, असे दिग्दर्शक ब्लेसि ईप थॉमस यांनी यावेळी सांगितले.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690049)
Visitor Counter : 188