उपराष्ट्रपती कार्यालय

समाजात जागल्याची भूमिका बजावणाऱ्या यंत्रणेला प्रोत्साहन देण्याची उपराष्ट्रपतींची कॉर्पोरेट जगताला सूचना


येत्या काही महिन्यातच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल असा उपराष्ट्रपतींचा विश्वास

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भारतीय उद्योग जगताने पुढाकार घ्यावा – उपराष्ट्रपती

कंपनी सचिवांनी उत्तम प्रथांचा अंगीकार करत उत्तम कॉर्पोरेट प्रशासन सुनिश्चित करण्याचे आवाहन

Posted On: 18 JAN 2021 4:05PM by PIB Mumbai

 

समाजात व्हिसल ब्लोईंग अर्थात जागल्याची भूमिका बजावणाऱ्या यंत्रणेला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देण्याची आणि जागल्याचे संरक्षण करण्याची सूचना उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी कॉर्पोरेट जगताला केली आहे.

कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया संस्थेच्या ई पदवीदान कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. भागधारकांसह सर्व संबंधितांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी  कॉर्पोरेट प्रशासनातल्या सर्वच बाबींमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे महत्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

सार्वजनिक पैशाचे  रक्षण करण्याच्या गरजेवर भर देत अनियमिततेला त्यात कोणताही वाव असता कामा नये असे त्यांनी सांगितले. काही जणांच्या कृतीमुळे भारतीय व्यवसायाच्या नावाला बट्टा  लागत असल्याचे सांगून युवा कंपनी सचिवांनी कॉर्पोरेट  प्रशासनात नीती मुल्ये आणि उत्तरदायित्व जपावे, असे आवाहन त्यांनी केले. हा व्यवसाय मिशन म्हणून हाती घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

येत्या महिन्यांमध्ये अर्थव्यवस्था  पूर्वपदावर येईल असा विश्वास व्यक्त करून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भारतीय उद्योग क्षेत्राने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोना विरोधातल्या लढ्यात आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पावले उचलण्यात भारताने, विकसित देशासह इतर अनेक देशांच्या तुलनेत सरस कामगिरी केल्याचे ते म्हणाले. महामारी आणि त्याचे आर्थिक परिणाम यासंदर्भात भारताने निर्णायक पावले उचलल्याचे आयएमएफ प्रमुख  क्रिस्टलीना जॉर्जीव्हा यांच्या  वक्तव्याचा संदर्भही त्यांनी दिला. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्तम कॉर्पोरेट प्रशासनावर लक्ष केंद्रित करत भारतीय कंपनी सचिव संस्था यामध्ये  महत्वाची भूमिका बजावू शकते, असेही ते म्हणाले.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689682) Visitor Counter : 204